पूर्णाथडी म्हैस आहे विदर्भात लोकप्रिय

पूर्णाथडी म्हैस : शेतीला पूरक व्यवसाय म्हटल मी सर्वात जास्त केला जाणारा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय.या व्यवसायासाठी आपल्याला जास्त दूध देणाऱ्या म्हशी पाळाव्या लागतात. आपण आतापर्यंत नागपुरी, पंढरपुरी, मूर्रा, भदावरी, सुरती या जातीच्या म्हशींची माहिती पाहिली. आज या लेखात आपण पूर्णाथडी म्हशीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पूर्णाथडी म्हैस ही नागपुरी म्हशीची एक उपजात असून पूर्णाथडी म्हैस ही नागपुरी म्हशीपेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळी आहे. चला तर बघुया या जातीच्या म्हशीची वैशिष्ट्ये, प्रजोत्पादन, दूध देण्याची क्षमता यांसारख्या महत्वाच्या बाबींची माहिती.

पूर्णाथडी म्हशीचे उगमस्थान

शेतकरी मित्रांनो विदर्भातील पूर्ण नदीकाठच्या अकोला, बुलढाणा, अमरावती यांसारख्या विविध जिल्ह्यात तुम्हाला राखाडी रंगाच्या म्हशी दिसून येतील. या म्हशीला विदर्भात भुरी किंवा राखी म्हैस असेही म्हटल्या जाते.

पूर्णाथडी म्हैस अशी ओळखा

रंगाने राखाडी असलेली पूर्णाथडी म्हैस ही जन्मतः पांढरीशुभ्र असते. मात्र जसजशी ती मोठी होते तसतसा तिचा रंग राखाडी होऊ लागतो. प्रौढ म्हशीचा रंग पूर्णपणे राखाडी असतो. तुम्हाला तर माहीत आहेच की विदर्भातील वातावरण किती उष्ण असते. सूर्य जणू या भागात आग ओकतो. पूर्णाथडी म्हशीचा राखाडी रंग या उष्णतेला सहन करण्यास अनुकूल असतो. तसेच या भागात ही म्हैस चांगल्याप्रकारे जुळवून घेते. या जातीच्या म्हशीच्या नाकपुड्या फिकट गुलाबी असून काही म्हशींच्या नाकपुड्यांचा रंग काळा असतो. पूर्णाथडी म्हैस काकट स्वरूपाची असून या म्हशीची शिंगे लांब निमुळते असतात तसेच शेपटी हुक सारखी वक्राकार वरच्या बाजूस असते.

पूर्णाथडी म्हशीच्या शेपटीचा रंग पांढरा दिसून येतो. पूर्णाथडी म्हैस ही विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाळत असतात या जातीच्या म्हशींची शिंगे सुद्धा राखाडी तपकिरी रंगाची असतात. प्रौढ म्हशीच्या शिंगाची सरासरी लांबी 58 सेंटिमीटर इतकी असते. सरळ डोके असणारी पूर्णाथडी म्हैस ही कानांच्या लांबीबाबत बोलायचे झाल्यास या जातीच्या म्हशींची कानाची लांबी सरासरी 25 ते 26 सेंटिमीटर एवढी असते. पूर्णाथडी म्हशीच्या कासेची घट्ट असते तसेच कास ही मध्यम आकाराची असते. या जातीच्या म्हशीचे सड गोलाकार तसेच लांबट असतात. तर सरासरी 15 ते 17 टक्के म्हशींची कास ही गुलाबी रंगांची पाहायला मिळते.

पूर्णाथडी म्हैस बद्दल संपुर्ण माहिती

पूर्णाथडी म्हशीचे सरासरी वजन

पूर्णाथडी म्हैस ही आकर्षक असून या जातीच्या म्हशीचे जन्मतः वजन हे 25 किलो असते. प्रौढ म्हशीचे वजन सरासरी 347 किलोपर्यंत दिसून येते. या जातीच्या म्हशीचा छातीचा घेर हा 187 सेंटिमीटर असतो. तसेच 119 सेंटिमीटर उंच असलेली पूर्णाथडी म्हैस 126 सेंटिमीटर लांब असते.

दूध देण्याची क्षमता आणि वैशिष्ट्ये

पूर्णाथडी म्हैस दर दिवसाला सरासरी 3 ते 5 लिटर दूध देते. या जातीच्या म्हशीच्या एका वाटतील दूध उत्पादन जवळपास नऊशे लिटर असते. पूर्णाथडी म्हशीचा भाकड काळ 141 दिवसांचा असतो. दुधात 8 टक्क्यांपेक्षा जास्त फॅट असलेली या जातीच्या म्हशीच्या दुधाचा भाव छान मिळतो. तसेच या जातीच्या म्हशींच्या दुधातील स्निग्धांत विरहित घनाचे प्रमाण सुद्द्धा 8 टक्क्यांपेक्षा अधिक असते.

पूर्णाथडी म्हैस प्रजोत्पादन माहिती

पूर्णाथडी म्हैस ही व्याल्यानंतर 134 दिवसांनी पुन्हा गाभण राहते. या जातीच्या म्हशीचे प्रथम माजावर येण्याचे वय 42 ते 54 महिने इतके असते. 54 ते 66 महिन्यांनी ही म्हैस पहिल्यांदा विते. पूर्णाथडी म्हशीच्या 2 वेतातील अंतर 439 दिवसांचे असते. पूर्णाथडी म्हैस साधारणतः 42 ते 54 महिन्याची झाली की पहील्यांदा गर्भ धारण करण्याचा क्षमतेची होते. या म्हशीचा गाभण काळ 305 दिवसांचा आढळून येतो. या जातीच्या म्हशीच्या ऋतू चक्राचा कालावधी 21 दिवसांचा असतो.

पूर्णाथडी म्हशीची लोकप्रियता जास्त का आहे?

पूर्णाथडी म्हैस ही विदर्भातील तसेच राज्यातील इतर भागांतील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असण्याचे काही कारणे आहेत. या जातीच्या म्हशी मध्यम अकराच्या असतात तसेच त्यांच्या दुधात स्निग्ध प्रमाण जास्त असते. याशिवाय विदर्भातील उष्ण हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या म्हशींच्या प्रकृतीत असते. या म्हशीच्या संगोपनासाठी जास्त खर्च येत नाही. या सर्व बाबींमुळे पूर्णाथडी म्हैस ही विदर्भातील शेतकरी वर्गात कमाल लोकप्रिय आहे. या जातीच्या म्हशी तुम्हाला संपूर्ण विदर्भात असंख्य शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या दिसून येतील.

पूर्णाथडी म्हशीची किंमत आणि बाजार

शेतकरी मित्रांनो तुम्ही या जातीच्या म्हशीची सविस्तर माहिती पाहिली. आता जाणून घ्या या म्हशींची किंमत किती असते याची माहिती. तर पूर्णाथडी जातीच्या प्रौढ म्हशीची किंमत 35 हजार ते 80 हजाराच्या दरम्यान असते. तसेच विदर्भातील कुठ्ल्याही पशू बाजारात तुम्हाला या जातीची म्हैस अगदी सहज विकत घेता येईल. मात्र म्हैस विकत घेताना योग्य आणि आवश्यक त्या माहितीची विचारपूस करूनच म्हैस विकत घ्यावी म्हणजे फसवणूक होणार नाही. चांगली सुदृढ असलेली म्हैस तसेच म्हशीच्या प्रजोत्पादन आणि दूध देण्याची क्षमता जाणून घेऊनच कुठ्ल्याही जातीच्या म्हशीची खरेदी केलेली बरी.तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment