शेतकरी मित्रांनो शेती हा व्यवसाय परवडत नाही हे बदलत्या हवामानामुळे काही अंशी खरे असले तरी प्रतिकुलतेवर मात करून राज्यातील एक गाव असे आहे की या गावातील प्रत्येक जण शेतकरी असून करोडपती असून या गावाची ओळख करोडपती शेतकऱ्यांचं गाव म्हणून संपूर्ण देशात अशीच प्रचलित आहे. एकेकाळी खूपच दयनीय अवस्था असलेल्या या गावाचा कायापालट कसा झाला तसेच कोणते आहे हे गाव याबद्दल सविस्तर माहिती आपण या माहितीपूर्ण लेखातून जाणून घेणार आहोत.
हिवरे बाजार आहे प्रगत शेतीचे गाव म्हणून प्रसिद्ध
तर शेतकरी मित्रांनो या गावचे नाव आहे हिवरे बाजार. अहिल्या नगर म्हणजेच आधीच्या अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव असून या गावाला महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. हिवरे बाजार गावाची एकूण लोकसंख्या 1250 पेक्षा जास्त आहे. गावात एकूण 305 कुटुंबे राहतात. त्यापैकी 80 कुटुंबे चक्क करोडपती आहेत. या गावातील कुटुंबापैकी 50 कुटुंबांचे एकूण वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

एकेकाळी खूपच खराब अवस्था या गावातील लोकांची होती. मात्र आपल्या मेहनतीने त्यांचं संपूर्ण आयुष्याचं पालटल आणि आज त्यांची ओळख झीरो टू हिरो म्हणजेच सामान्यांपासून ते चक्क करोडपती शेतकऱ्यांचं गाव अशी झाली. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की गावातील लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेती हा आहे. या गावातील सर्व लोकांनी मिळून शेतीकडे आपले लक्ष वळवले आणि त्यांच्या मेहनतीचे फळ मिळून हिवरे बाजार गावाचा जीडीपी वाढला.
एकेकाळी होती प्रचंड गरिबी
शेतकरी मित्रांनो या गावाची ही किमया काही सहजासहजी झालेली नाही . तर यामागे गावातील सर्वच शेतकरी बांधवांनी म्हणजेच सर्वच लोकांनी अतिशय कठोर परिश्रम घेऊन स्वतःची आणि त्याचबरोबर गावाची प्रगती साधली आहे. हे करोडपती शेतकऱ्यांचं गाव एकेकाळी गरीबीशी झुंज देत होते. हिवरेबाजार गावात एक काळ असा होता की गावातील बहुतांश लोकांवर उपासमारीची वेळ येऊन चरितार्थ चालवण्यासाठी गाव सोडायची वेळ येथील लोकांवर आली होती. हिवरे बाजार गावात सर्वत्र प्रचंड गरिबी पसरली होती. त्यामुळे गावातील बहुतांश लोक उपजीविकेच्या शोधात हिवरे बाजारातून शहरांकडे वळू लागले होते.
गोष्ट आहे 1990 सालाची. 1990 मध्ये हिवरे बाजार गावातील 90 % कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. हिवरे बाजार गावात 1980 तसेच 1990 या 2 दशकात भीषण दुष्काळग्रस्त चित्र पाहायला मिळाले होते. अवर्षणाचा प्रभाव इतका होता की गावात कोरडा दुष्काळ पडून गावातील एकूण त्यावेळी असलेल्या 90 विहिरी आटल्या होत्या. परिणामी पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय हिवरे बाजार गावात राहिली नव्हती. या सर्व परिस्थितीतून हे गाव गेले असल्यामुळे आज या गावचे रूप कसे बदलले याबद्दल नक्कीच तुमच्या मनात कुतूहल निर्माण झाले असेल. त्यांच्या कार्याबद्दल आपण या लेखातून जाणून घेणारच आहोत.
जिद्दीने केली संकटांवर मात
मित्रांनो कोरड्या दुष्काळामुळे आज करोडपती शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरे बाजार गावात भूजल पातळी सुद्धा 110 फुटांनी खाली गेली होती. यामुळे त्रस्त होऊन रोजगाराच्या शोधात येथील काही लोकांनी कुटुंबासह हे गाव सोडले. मात्र राहिलेल्या बाकी कुटुंबांनी जिद्दीने एकत्र येऊन वन व्यवस्थापन करायचे पक्के केले. गावातील लोकांच्या अती प्रयासाने तसेच मेहनत घेण्याच्या तयारीने दुष्काळाचा सामना करण्यासाठी 1990 मध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करुन हे सध्याचं करोडपती शेतकऱ्यांचं गाव लागले कामाला. गावात विहिरी खोदणे, वृक्षारोपण करण्याचे काम सार्वत्रिक श्रमदानातून यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्याची किमया हिवरे बाजार गावातील सर्व नागरिकांनी केली.
मिळाले आदर्श ग्राम योजने अंतर्गत सहाय्य
गावातील लो ही मेहनत आणि जिद्द पाहून सरकार सुद्धा या लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. या कामाला महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत निधी देण्यात उपलब्ध करून देण्यात आला. सन 1994-95 मध्ये आदर्श ग्राम योजना कार्यान्वित झाली. त्यामुळे हिवरे बाजार गावातील सर्वच कामांच्या विकासाला गती मिळाली.
गावातील ही दुष्काळी परिस्थिती हळूहळू कमी होत असताना या गावातील स्थापन समितीने हिवरे बाजार गावात जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या पेरणीवर बंदी घातली. अशाप्रकारे नियोजनबद्ध तसेच एकी दाखवून केलेल्या मेहनतीमुळे हे करोडपती शेतकऱ्यांचं गाव लवकरच प्रगत गावाच्या यादीत येऊ लागले. या गावातील लोकांच्या मेहनतीचे आणि एकजुटीचे फळ म्हणजे सध्याच्या घडीला या गावात 300 पेक्षा जास्त विहिरी दिसून येतात.
शेतकऱ्याचा मुलगा झाला प्रसिद्ध रील स्टार, वाचा प्रेरणादायी यशोगाथा
तेव्हापासून या गावाने कधीच मागे वळून पाहिले नाही. गावातील सर्व कुटुंबे शेतीतून भरघोस उत्पादन घेऊन लाखो रुपयाचं अर्थार्जन प्राप्त करतात. हिवरे बाजार गावातील लोक भाजीपाला पिकवून दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळवून आर्थिक दृष्ट्या अधिकाधिक सधन होत गेले आणि आज हिवरे बाजार हे गाव करोडपती शेतकऱ्यांचं गाव म्हणून संपूर्ण भारतात कमालीचं लोकप्रिय झालं आहे.
सरासरी उत्पन्नात झाली 20 पटीने वाढ
मित्रांनो जगात कुठलीही गोष्ट अशक्य नसते. मात्र जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी असणे आवश्यक असते. हिवरे बाजार गावातील शेतकऱ्यांनी मेहनत, सातत्य आणि संयम या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे वापर करून आज हे दैदिप्यमान यश आणि नावलौकिक प्राप्त केले आहे. मागील दोन दशकांत गावातील लोकांचे सरासरी उत्कांनात तब्बल 20 पटीने भरघोस वाढ झाली आहे. हिवरे बाजार गावातील लोकांच्या एकजुटीमुळेच खर तर या गावातील दारिद्र्य संपून भरभराट झाली. गावातील प्रगती पाहून शहराकडे गेलेले लोक सुद्धा परत गावात आले आणि त्यांनी सुद्धा गावातील ही परिस्थिती बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली. याच मेहनतीचे फळ म्हणजे आज या गावाला करोडपती शेतकऱ्यांचं गाव अशी ओळख मिळाली आहे.

सरपंचांच्या अभूतपूर्व कामगिरीतून दिसले वैभव
शेतकरी मित्रांनो कुठ्ल्याही चळवळीला यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी प्रभावी नेतृत्व असणे एक अनिवार्य बाब असते. याची प्रचिती सुद्धा या गावातील एक जाणकार गृहस्थ पोपटराव पवार यांच्या दूरदृष्टीतून दिसून आली. हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार हे आज आपल्या देशातील अशा मोजक्या लोकांमध्ये गणले जातात, ज्यांच्यामुळे संपूर्ण गावाची हलाखीची अवस्था बदलून ती गावे यशाच्या आणि प्रगतीच्या शिखरावर पोहोचली. पोपटराव पवार यांनी गावातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण आणि प्रगतिशील शेती शिकवली आणि त्याचेच फळ म्हणजे आज हिवरेबाजार गावातील सर्वच शेतकरी त्यांच्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. परिणामी त्यांच्या उत्पन्नात सुद्धा कमालीची वाढ होताना दिसून येत आहे.
64 वर्षीय महिला रेशीम शेती करून बनली लखपती, आज देते इतरांना रोजगार
विचार बदला तरच जग बदलेल
शेतकरी मित्रांनो करोडपती शेतकऱ्यांचं गाव असलेल्या हिवरे बाजार गावाची ही यशकथा ऐकून तुम्ही सुद्धा अचंभित झाले असालच. मात्र या गावाच्या यशातून काही गोष्टी लक्षात घेऊन अंमलात आणण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे कुठलीही गोष्ट किंवा यश साध्य करायचं असेल तर त्यासाठी सर्व प्रथम ती डोक्यात असायला पाहिजे. एकदा का माणूस पेटून उठला की जगातील कुठलीही शक्ती त्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. याशिवाय एकीचे बळ हे कधीही श्रेष्ठ ठरते याची सुद्धा प्रचिती हिवरे बाजार या करोडपती शेतकऱ्यांचं गाव असलेल्या गावाच्या माध्यमातून येते.