भदावरी म्हैस बद्दल संपुर्ण माहिती : शेतकरी मित्रांनो शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय खूपच फायदेशीर ठरत असतो. आजच्या या चंचल हवामानाच्या काळात शेतीत नुकसान झाले तरी दुग्ध व्यवसाय आपल्याला तारू शकतो. शिवाय शेतीतील गवत, कडबा, कुटार यांचा आपण पशुखाद्य म्हणून उपयोग करून या व्यवसायासाठी कमीत कमी भांडवल लागते. दुग्ध व्यवसाय म्हटलं की सर्वात आधी शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की कोणत्या गायी किंवा म्हशी पाळाव्यात ज्या जास्त प्रमाणात दूध देतील. मागील लेखात आपण दररोज 25 लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या मुऱ्हा म्हशीबद्दल संपूर्ण माहिती बघितली. आज या माहितीपूर्ण लेखातून आपण भादावरी जातीच्या म्हशीची माहिती जाणून घेणार आहोत. भदावरी म्हैस ही सर्वात जास्त दूध देणाऱ्या म्हशींपैकी एक उत्तम म्हैस आहे.
भदावरी म्हैस पालन का आहे फायद्याचे?
अन्य जातीच्या म्हशी पाळण्याच्या तुलनेत भदावरी म्हैस पालन खूपच सोईस्कर आहेत. भदावरी जातीच्या म्हशी आकाराने लहान आणि वजनाने कमी असतात. कमी संसाधने असलेले भूमिहीन तसेच अल्पभूधारक शेतकरी सुद्धा भदावरी म्हैस आरामात पाळू शकतात. कुठ्ल्याही प्रकारच्या वातावरणात ही म्हैस आरामात स्वतःला जुळवून घेत असते. त्यामुळे महाराष्ट्रात देखील भदावरी म्हैस पालन करून दुग्ध व्यवसायात प्रगती करून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. भदावरी जातीच्या म्हशी कमी खाद्य खावून सुद्धा भरघोस दूध देऊ शकतात. त्यांची हीच विशेषता या जातीच्या म्हशींना इतर जतींपासून वेगळे करते. मात्र भदावरी म्हैस पालन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. आपण भादावरी म्हैस पालन करताना काय काळजी घ्यावी याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
अशी ओळखा भदावरी म्हैस
भदावरी म्हैस कशी ओळखावी हा बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल. कारण बाजारात या जातीची म्हैस विकत घेण्यास जात असताना या जातीच्या म्हशी बाबत योग्य ती माहिती असणे आवश्यक असते. अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो मध्यम आकाराची असलेली ही भदावरी म्हैस दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीत एक मैलाचा दगड ठरते. या जातीच्या म्हशीचा रंग तांबूस असतो. तसेच या म्हैशीच्या खुराचा रंग काळा असतो. या म्हशीच्या शरीरावर छोटे छोटे केस असतात आणि माथा छोटा असतो. तलवारीसारखे अणुकुचीदार काळ्या रंगाची शिंगे असलेल्या या म्हशीच्या पापण्या भुरकट रंगाच्या असतात. तसेच पायाच्या घुटण्याखालील भाग हलका पिवळसर पांढरा असतो. भदावरी म्हैस जास्तकरून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पाळतो.
भदावरी म्हशी खूपच कमी खर्चात पाळल्या जाऊ शकतात
शेतकरी मित्रांनो भदावरी म्हैस पालनासाठी खूपच कमी खर्च येतो. ही म्हैस कमी खाद्य खावून सुद्धा दुधावर याचा जास्त परिणाम होत नाही. आणि भरघोस दूध देऊन ही म्हैस मालकाचे दुग्ध उत्पादन वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देते. भदावरी जातीच्या म्हशीचा मृत्युदर सुद्धा इतर जातींच्या म्हशीच्या तुलनेत खूपच कमी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा होण्याची शक्यता कमी होते. या जातीच्या म्हशींत रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे म्हशीच्या दवाखान्यावर होणाऱ्या खर्चाला मोठ्या प्रमाणात आळा बसतो.
रोज किती दूध देते ही म्हैस?
भदावरी जातीची म्हैस ही उच्च गुणवत्तेच्या तुपासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या जातीच्या म्हशी दररोज सुमारे 8 ते 10 लिटर दूध देतात. खाद्यान्न पद्धती योग्य असल्यास दूध देण्याची क्षमता निश्चितच वाढते. आजकाल बऱ्याच राज्यातील शेतकरी बांधव भदावरी जातीच्या म्हशी पालन करण्याकडे आकर्षित झालेले दिसून येतात. कारण या जातीच्या म्हशींची कुठलीही झंझट नसते. अगदी मालक जे खाद्य देईल ते खायचे आणि भरपूर दूध द्यायचे इतकी प्रामाणिक ही भदावरी म्हैस असते असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
रोजचे 25 लिटर दूध देणारी मुऱ्हा जातीची म्हैस आहे दुग्ध व्यवसायासाठी वरदान
कशी घ्यावी या म्हशीची काळजी
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर दुग्ध व्यवसायासाठी भदावरी म्हैस पाळायची असेल तर या म्हशीची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती हवीच. या म्हशीचा गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा लागतो. तसेच दूध काढताना सुद्द्धा दूध काढायचे भांडे स्वच्छ करून तसेच आधी शेण वगैरे काढून ती जागा स्वच्छ करून घ्या. म्हणजे या जातीच्या म्हशी अधिकचे दूध देतात. याशिवाय तुमच्या गावातील पशू वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन भदावरी म्हैस बद्दल अधिक माहिती आपण मिळवू शकतात.
भदावरी म्हशीची किंमत किती असते?
या जातीच्या एका म्हशीची किंमत सुमारे 60 हजार ते 1 लाख या दरम्यान असते. योग्य भाव केला तर यापेक्षा कमी किंमतीत सुद्धा भदावरी म्हैस खरेदी करता येऊ शकते. या म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आवडती अशी ही म्हशीची जात आहे. मात्र म्हैस खरेदी करताना त्या म्हशीचे वय, दूध देण्याचे प्रमाण यासंबधी माहिती घेणे आवश्यक असते. आपण विकत घेत असलेली म्हैस शारिरीक दृष्ट्या सुदृढ आहे की नाही हे सुद्धा पडताळून पहावे लागते. जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही.