सुरती म्हैस बद्दल आपण एकलेच असेल. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेती व्यवसायाला दुग्ध व्यवसायाची जोड दिली तर तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होऊन तुम्हाला आर्थिक दृष्ट्या हातभार लागू शकतो. दुग्ध व्यवसाय हा अलीकडच्या काळात एक जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्यवसाय म्हणून नावारूपाला येत आहे. सुरती म्हैस ही जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हशिंपैकी एक लोकप्रिय म्हैस असून या जातीच्या म्हशी बद्दल आज आपण या लेखातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. सुरती म्हैस किती दूध देते याबद्दल तुमच्या मनात कुतूहल असेलच. याशिवाय सुरती म्हैस का पालवी याचे महत्व सुद्धा तुम्हाला हा लेख वाचल्यानंतर कळून येईल.
सुरती म्हैस भारतातील जास्तीत जास्त पालन केल्या जाणाऱ्या म्हशीची एक प्रगत जात आहे. या जातीचा म्हशी अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाळतात. तसेच दूग्ध व्यवसाय करणाऱ्या उद्योजक पासून ते शेतमजूर यांच्यामध्ये सुरती म्हैस खूपच लोकप्रिय आहे. या म्हशीचे पालन करून निश्चितच उत्पन्नात दुप्पटीने वाढ होऊन शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळता राहतो. या म्हशीचे पालन सर्वात आधी म्हैस गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र सध्याच्या काळात या जातीच्या म्हशीचे पालन उत्तर भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात केले जाऊन दुधाचा व्यवसाय वाढविण्यासाठी उत्तम असा पर्याय म्हणून सुरती म्हैस प्रसिद्ध झाली आहे.
दूध उत्पादनासाठी सुरती म्हैस का महत्वाची?
शेतकरी मित्रांनो सुरती म्हशीचा आकार इतर म्हशींच्या तुलनेत थोडा छोटा असतो. या जातीच्या म्हशीचे एक वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या म्हशीला चांगले पशुखाद्य तसेच चांगली सुविधा दिल्यास वर्षभरात म्हणजेच एका वेतात 1600-1800 लिटर दूध देण्याची क्षमता या सुरती म्हैस मध्ये असते. सुरती म्हैस पालन करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात आपल्या राज्यात सुद्धा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सुरती म्हशीची ओळख अशी करा
सुरती म्हैस ही एक भारतीय म्हशीची उत्तम प्रजाती आहे. या म्हशींचा शरीरबांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात व भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. उत्तम प्रजातीच्या म्हशीमध्ये सुरती म्हशीचा समावेश होतो. सुरती म्हैस ही दिसायला आकर्षक असते.
दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या एकूण दूध उत्पादनात म्हशींच्या दुधाचा वाटा खूप महत्वाचा आहे. निकृष्ट प्रतीचा चारा खावून सुद्धा उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये जास्त असते. त्यामुळे अनेक दूध व्यावसायिक तसेच शेतकरी जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन मिळवून उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूने म्हशी पालन करत आहेत. त्यामानाने सुरती म्हैस ही किंमतीच्या आणि देखरेखीच्या मनाने किफायतशीर असते यामुळेच सुरती म्हशींचे संगोपन करण्याचे क्रेझ सध्या राज्यातील शेतकऱ्यांत वाढलेले दिसून येते.

मित्रांनो सुरती म्हशी सारख्याच पंढरपुरी, मुर्हा, भदावरी या जातीच्या म्हशी सुद्धा भरघोस दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दुग्ध व्यवसायासाठी अतीशय लाभदायक अशा या म्हशी असून या म्हशींचे पालन करून दुधाच्या व्यवसायात फार कमी वेळेत जास्तीत जास्त प्रगती केल्या जाऊ शकते. पशुपालन करताना त्यांची योग्य ती काळजी घेणे सुद्धा अतिशय आवश्यक असते हे विसरून चालणार नाही बरं का.
सुरती म्हशीचा आहार आणि निगा
दुग्ध व्यवसाय करत असलेल्या किंवा सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या मित्रांना सुरती म्हशीची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. लक्षात घ्या क्षमतेइतके दूध मिळण्यासाठी सामान्यतः 400 किलो वजन असलेल्या म्हशीला प्रत्येक दिवशी 25 किलो हिरवा चारा तसेच 7 ते 8 किलो कोरडा चारा इतका आहार म्हशीची भूक भागविण्यासाठी आणि पोषणासाठी देणे आवश्यक आहे. उत्तम दूध उत्पादन मिळविण्यासाठी, सुरती म्हैस रोज जेवढे दूध देते त्याच्या 50% खुराक द्यावा लागतो. असे केल्यास दूध उत्पादनात सातत्य टिकून राहण्यास मदत होते. या जातीच्या म्हशीला दर दिवशी पिण्यासाठी 60 ते 75 लिटर पाणी लागते.
दूध उत्पादन वाढविण्यासाठी टिप्स
तुम्हाला जर स्वच्छ आणि भरघोस दुग्ध ऊत्पादन पाहिजे असेल तर त्यासाठी काही बाबींची माहिती असणे क्रमप्राप्त आहेत. खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही सुरती म्हैस पाळून दुधाच्या उत्पन्नात प्रचंड वाढ करू शकाल.
जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी ठेवा.
दूध काढताना गोठा तसेच सभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा.
दुभते जनावर इतर प्राण्यांपासून वेगळे करून त्याचा कमरेचा भाग, मागील मांड्या, शेपटी यावरून खरारा करा तसेच कास आणि सड खरबरीत साफ कपड्याने किंवा टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या. असे केल्याने म्हशीचे रक्ताभिसरण वाढून ती अधिक दूध देण्यास अनुकूल होईल.
सुरती म्हशीला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशिअम परमॅंगनेटचे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने त्याची कास व सड धुवा आणि लगेच स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या.
दूध काढण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक केलेली भांडी, एक छोटासा कप व दूध गाळण्याचे स्वच्छ पांढरे कापड जागेवर आणून ठेवा.
कोमट पाण्याने कास धुतल्यानंतर गाय, म्हैस पान्हा सोडते आणि जास्त प्रमाणात दूध देते.
जो व्यक्ती दूध काढणार आहे त्याने आपले हात पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणात स्वच्छ धुवून घ्यावे आणि दूध नंतरच दूध काढावे.
दूध काढताना लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा स्वतंत्र कपात काढा आणि मग दुधाच्या बाटलीत दूध काढून घ्या.
सुरती म्हशीचे दूध काढण्याची प्रक्रिया पूर्ण मूठ पद्धतीने अंदाजे 7 ते 8 मिनिटांत पूर्ण करा.
दूध काढण्यासाठी विशिष्ट आकाराची भांडी वापरा.
सुरती म्हशीचे दूध काढत असताना त्यांना वाळलेली वैरण, घास खायला घालू नये, फक्त आंबोण खायला घाला.
सुरती म्हशीची किंमत किती असते?
मित्रांनो इतकी सगळी माहिती मिळाल्यावर तुमच्या मनात सुरती म्हशीची किंमत किती असते हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर आहे 40 हजार ते एक लाख रुपये. मित्रांनो एका प्रौढ सुरती म्हशीची किंमत 40 हजारांपासून सुरू होते. म्हशीच्या शरीरयष्टी तसेच दुधाच्या क्षमतेनुसार एक लाख रुपयांपर्यंत बाजारात या म्हशीची विक्री केल्या जाते. तुम्हाला जर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायात पदार्पण करायचे असेल तर आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.