दुधाच्या व्यवसायासाठी पाळा नागपुरी म्हैस, मिळेल अपेक्षित उत्पन्न

नागपूर भागात उगमस्थान असलेल्या नागपुरी म्हैस दुग्ध व्यवसायासाठी का वापराव्या याबद्दल आपण या लेखातून सविस्तर माहिती बघणार आहोत. नागपुरी म्हैस किती दूध देते, या म्हशीची वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल जाणून घेऊया. आजकाल शेतीवर अवलंबून राहून चालत नाही. शेतीतून उत्पन्न मिळेलच याची फारशी हमी देता येत नाही. परिणामी शेतीतून झालेल्या नुकसानापासून शेतकरी बांधवांना सावरता यावे यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करणे एक उत्तम पर्याय असून यासाठी नागपुरी म्हैस पालन करून हा दुग्ध व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवून अधिक उत्पन्न मिळवता येऊ शकते.

शेतीच्या कामासाठी सुद्धा वापर

शेतकरी मित्रांनो नागपुरी म्हैस ही गौळणी तसेच आर्णी या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. विदर्भात तसेच वर्धा जिल्ह्यात नागपुरी जातीच्या म्हशी अनेक शेतकऱ्यांकडे तसेच दुग्ध व्यवसायिकांकडे दिसून येतात.शेजारील राज्य आंध्र प्रदेशात सुद्धा नागपुरी म्हैस मोठ्या प्रमाणावर पाळल्या जाते. नागपुरी म्हैस ही दुग्ध व्यवसायासोबतच शेतीच्या कामासाठी सुद्धा वापरण्यात येते हे या जातीच्या म्हशीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बैल नाहीत अशा शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी या जातीच्या म्हशीचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. नागपुरी म्हैस अत्यंत मेहनती असल्याचे पाहायला मिळते. तुम्हाला जर दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर या नागपुरी म्हशीचा समावेश तुमच्या गोठ्यात करण्याचा विचार केल्या जाऊ शकतो.

नागपुरी जातीच्या म्हशीची वैशिष्ट्ये

नागपुरी म्हशींचा रंग काळा असून डोके, पायाखाली भाग तसेच शेपटीचा गोंडा पांढरा असतो. नागपुरी म्हैस ही अर्धचंद्री, चंद्री तसेच कपाळभोरी या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. कारण या म्हशीच्या कपाळाचा तसेच नाकाचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो. इतर म्हशींच्या तुलनेत या जातीच्या म्हशीचा बांधा लहान असतो. नागपुरी म्हशीची शेपटी मध्यम लांबीची असते. नागपुरी म्हशींचा चेहरा बाजूने सरळ, लांब आणि निमुळता दिसून येतो. या म्हशीची शिंगे लांब चपटी असून ती मानेच्या खांद्याच्या भागाकडे वाकलेली असतात. मात्र एखाद्या तलवारी सारखा आकार या शिंगांना असतो. मध्यम आकाराचे कान असलेली नागपुरी म्हैस ही दूध उत्पादन वाढविण्यासाठी एक उत्तम मार्ग असून या जातीच्या म्हशीचे कान मध्यम आकाराचे तसेच शेंड्याला टोकदार असे असतात. कानांची सरासरी उंची 24 सेंटिमीटर एवढी असते.

नागपुरी म्हशीच्या वजनाबाबत माहिती

नागपूरी म्हैस ही इतर म्हशीच्या तुलनेत दीर्घ आयुष्य जगते. या जातीच्या म्हशीचे सरासरी आयुष्यमान 32 वर्ष इतके असते. आपल्या आयुष्यात नागपुरी म्हैस सुमारे 23 वेळा वेत देते. नागपुरी म्हशीच्या मादी वासराचे वजन जन्मतः 28 किलो असते. तसेच प्रौढ म्हशीचे वजन 349 किलो असते. या म्हशींच्या छातीचा घेर 175 सेंटिमीटर असतो. तसेच नागपुरी म्हशीची उंची 123 सेंटिमीटर आणि लांबी 121 सेंटिमीटर एवढी असते. नागपुरी म्हैस काकट असते. या म्हशी जास्त आजारी पडत नाहित. पडल्या तरी त्या लवकरात लवकर बऱ्या होतात. नागपुरी म्हैस पालन करून दुधाच्या व्यवसायात यशस्वी होता येणे अगदी सहजशक्य असल्यामुळें विदर्भातील असंख्य शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून नागपुरी म्हैस पाळतात. आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यात यशस्वी होतात.

नागपुरी म्हैस

नागपुरी म्हैस देते इतके दूध

नागपुरी म्हशी या विदर्भात खूपच प्रचलित असून या जातीच्या म्हशी दर दिवसाला 5 ते 7 लिटर दूध देतात. त्यांच्या एका वेतातील दुधाचे उत्पादन 1400 ते 1500 लिटर एवढे असते. दूध उत्पादन काळाबाबत सांगायचे झाल्यास नागपुरी जातीची म्हैस सरासरी 303 दिवस दूध देते. या जातीच्या म्हशीचा भाकड काळ 122 दिवसांचा असतो.

या जातीच्या म्हशींचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यांच्या दुधात फॅटचे प्रमाण 8 टक्क्यांपेक्षा जास्त असते. विदर्भासह राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार स्वतः ला जुळवून घेणारी ही म्हशीची उत्तम प्रजाती असून या म्हशीचे संगोपन करण्यासाठी खूप कमी खर्च लागतो. अगदी शेतातील चाऱ्यापासून ते सुक्या ओल्या गवतावर या जातीच्या म्हशी दूध देण्याचा बाबतीत खूपच सरस ठरतात.

नागपुरी जातीची म्हैस ही शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक असल्यामुळे या जातीच्या म्हशींना खूपच मागणी असल्याचे पाहायला मिळते. या म्हशीमध्ये निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यापसून सुद्धा उत्तम आणि सकस दूध निर्मिती करण्याचे विशेष गुणधर्म असतात. नागपुरी म्हैस नियमित प्रजोत्पादन करते. तसेच या म्हशींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.

नागपुरी म्हशीची प्रजनन गुणवैशिष्ट्ये

नागपुरी जातीची म्हैस 45 महिन्यांनी पहिल्यांदा माजावर येते. या म्हशीचे प्रथम गर्भधारणेचे वय हे सुमारे 46 महिने असते. साधारणतः 57 महिन्यांनी ही म्हैस पहिल्यांदा विते. या जातीच्या म्हशीचे दोन वेतामधील अंतर हे 426 दिवसांचे असते. एकदा व्याल्यानंतर पुन्हा गर्भधारणा होण्याचा कालावधी 97 दिवसांचा असतो. नागपुरी म्हशीचा गाभण काळ 310 दिवसांचा असतो. तसेच ऋतू चक्राचा कालावधी 21 दिवसांचा आढळून येतो.

नागपुरी म्हशीची किंमत आणि बाजार

मित्रांनो आपण नागपुरी म्हशीची वैशिष्टये, प्रजोत्पादन कालावधी तसेच इतर महत्वाची माहिती पाहिली. आता आपण या जातीच्या म्हशीची किंमत किती असते आणि या जातीच्या म्हशींचा बाजार कोठे आहे याबद्दल अधिक माहिती बघणार आहोत. नागपुरी म्हशीची किंमत 40 हजारापासून ते 90 हजार रुपयांपर्यंत असते. म्हशीची शारीरिक स्थिती आणि दूध देण्याची क्षमता, एकूण वेत यांच्यानुसार म्हशीची किंमत ठरविल्या जाते.

नागपुरी म्हैस

नागपूरच्या परिसरात तसेच विदर्भातील कुठ्ल्याही बाजारात तुम्हाला नागपुरी म्हैस अगदी सहज विकत घेता येईल. या म्हशीचा दूध व्यवसायासाठी वापर करून तुम्हाला निश्चितच लाभ होईल. मित्रांनो आपण मागील लेखांमध्ये भदावरी, मुर्रा, पंढरपुरी, सुरती या जातींच्या म्हशींची माहिती घेतली आहे. तर नागपुरी म्हशीबद्दल या महत्वपूर्ण लेखात दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment