पीएम किसान मानधन योजना 2024 केंद्र आणि राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वेळोवेळी अनेकानेक कल्याणकारी योजना राबवत असते. बळीराजाला आर्थिक सुरक्षा देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनांचा उद्देश असतो. पीएम किसान सन्मान निधी योजना, किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या अनेक योजना केंद्र सरकारद्वारे सध्या कार्यान्वित आहेत.
आता एक नवीन योजना सुरू झाली असून योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे, जी एक पेन्शन योजना आहे. इतर सरकारी नोकरांना निवृत्तीवेतन मिळत असते. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या उतारवयात कुठलाही आधार नसतो. परिणामी पीएम किसान मानधन योजना शेतकऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आली असून या योजने अंतर्गत वृद्ध शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. चला तर जाणून घेऊया पी एम किसान मानधन योजना संदर्भातील सविस्तर माहिती.
पीएम किसान मानधन योजनेचे स्वरुप
पीएम किसान मानधन योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली की त्यांना मासिक निवृत्तीवेतन सुरू होईल. केंद्र सरकार दर महिन्याला या योजनेतून प्रती पात्र लाभार्थी शेतकऱ्याला एकूण तीन हजार रुपये पेन्शन देणार आहे. वार्षिक ३६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळून वृद्धापकाळात त्यांचे जीवन सुरळीत चालण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य त्यांना लाभणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत देशभरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर करत आहेत.
पीएम किसान मानधन योजना संदर्भात शासनाचे उद्दिष्ट
वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा, तसेच या कासोशीच्या काळात त्यांना त्यांचे जीवन जगण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये हा पीएम किसान मानधन योजना कार्यान्वित करण्याचा सरकारचा हेतू आहे. या योजनेअंतर्गत करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यासाठी अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्यास सुरुवात सुद्धा केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असून या कल्याणकारी योजनेमुळे बळीराजाला त्यांच्या पडत्या काळात मदतीचा हात मिळून शेतकऱ्यांना वृद्धापकाळ अवस्थेत सुद्धा स्वाभिमानाने जगता यावे हे पीएम किसान मानधन योजनेचे उद्दिष्ट आहे.
पीएम किसान मानधन योजना अंतर्गत लाभासाठी वयाची पात्रता
पीएम किसान मानधन योजना ही एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय हे १८ ते ४० वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे. या वयोगटातील इच्छुक शेतकरी या पेन्शन योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात. 40 वर्षापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांचे वय आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरमहा किती रक्कम भरावी लागेल?
प्रधानमंत्री किसान मानधन योजना अंतर्गत लाभासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या वयोमानानुसार किमान 55 ते कमाल 200 रुपये दर महिन्याला या योजनेचा हफ्ता म्हणून भरावे लागणार आहेत. शेतकऱ्याचे वय जितके जास्त तितका हफ्ता जास्त आणि शेतकऱ्याचे वय जितके कमी तितकाच हफ्ता कमी भरावा लागणार आहे. वृद्धापकाळात भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून दर महिन्याला 200 रुपयांच्या आत असलेला हा हफ्ता भरणे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
असे मिळणार शेतकऱ्यांना योजनेंतर्गत मासिक पेन्शन
पीएम किसान मानधन योजना अंतर्गत पेन्शन शेतकऱ्यांना त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये आजन्म मिळणार आहेत. त्या शेतकऱ्यांनी भरलेले हफ्ते आणि त्यात केंद्र शासन सुद्धा विशिष्ट रक्कम जमा करत जाईल. अशाप्रकारे त्यांच्या या हफ्त्यांचा परतावा म्हणून अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूपात हो रक्कम मिळून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. 18 ते 40 वयोगटाच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीएम किसान मानधन योजना अंतर्गत लाभार्थी होऊन वयाच्या साठीनंतर आजन्म पेन्शनचा लाभ घ्यावा, अशाप्रकारचे आवाहन शेतकऱ्यांना केल्या जात आहे.
महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशिन, असा करा अर्ज
पीएम किसान मानधन योजना अर्ज नोंदणी प्रक्रिया
पीएम किसान मानधन योजनेसाठी प्रथम तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. सदर अर्जात तुम्हाला तुमची, कुटुंबाची माहिती, वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे उदा. सात बारा, नमुना आठ अ इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतील. यासोबतच पैसे घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर सीएससी सेंटर वर भरलेला अर्ज तुम्हाला तुमच्या आधार सोबत लिंक करावा लागेल.अर्ज यशस्वीरीत्या भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पेन्शन खाते क्रमांक देण्यात येणार आहे. त्या खात्यात आपण दरमहा योजनेसाठी असणारा मासिक हफ्ता भरू शकाल. याशिवाय तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी तहसील कार्यालयात असलेल्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल. आणि त्यांच्याकडे ऑफलाईन अर्ज अचूकपणे भरून आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडून त्यांच्याकडे अर्ज सादर करता येईल.
पीएम किसान मानधन योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्याचे आधार कार्ड, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शेताचा सात बारा, आठ अ नमुना, फेरफार, बँक तपशील आणि पासबुक, रहिवासी दाखला, वयाचा पुरावा, उदा. जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत सादर करावे लागतील.
शेतकऱ्याचा 60 वर्षाआधीच मृत्यू झाल्यास…
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत दरमहा हफ्ता भरत असलेल्या शेतकऱ्याचा जर दुर्दैवाने मृत्यू झाल्यास अशा शेतकऱ्याच्या पत्नीला साठीनंतर दर महिन्याला १५०० रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक ही शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या इतकी लाभदायक असेल की त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात इतर कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून राहावे लागणार नाही.