कोथिंबीर महागला, एक किलोची जुडी तब्बल 400 रुपयांना

मागील काही दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी राज्यात भाजपाला महागण्यास कारणीभूत ठरत आहे. पालेभाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याने आवक घटली असून रविवार दि.८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मागच्या वर्षी टमाटरने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले होते. तसेच यावर्षी कोथिंबीरच्या भावाने सर्वसामान्य जनतेला कोथिंबिरीची खरेदी करताना विचार करायला भाग पाडले आहेत. राज्यात सध्या कोथिंबीर महागला असून कोथिंबीरचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्वाचा भाग असलेली कोथिंबीर आता त्याच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य गृहिणींना विकत घेणे दुष्कर बनले आहे.

कोथिंबीर दरात प्रचंड वाढ

भाजीपाल्याचे भाव कडाडले

सततच्या पावसामुळे पालेभाज्या उत्पादन घटले असून त्यामुळे या पालेभाज्यांची आवक सध्या कमी झाली आहे. परिणामी पालेभाज्यांचे बाजारभाव वधारले आहेत . नाशिक बाजार समितीत रविवार रोजी पार पडलेल्या लिलावात सायंकाळी गावठीकोथिंबीर किमान ,65 रुपये जुडी ते सर्वाधिक 400 रुपये जूडी,चायंना कोथिंबीर किमान 40 तर सर्वाधिक 280 रुपये जूडी, मेथी किमान 50 तर सगळ्यात जास्त 130 रुपये जूडी, शेपू किमान 22 तर सर्वाधिक 57 रुपये जूडी, कांदा पात किमान 15 तर सर्वाधिक 42 रुपये जूडीला इतका दर मिळाला आहे.

पालेभाज्यांच्या वाढत्या किंमतीमुळे गृहिणींचा बजेट विस्कळित

अनेक किरकोळ व्यापारी सध्या कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची झूडी छोटी करून बाजारभावाच्या दुप्पट किंमतीने विकत आहेत.पालेभाज्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीच्या घरातील किचनचे बजेट मात्र विस्कळीत झाले आहे.

नाशिक बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादला पाठविला जातो. सध्याच्या काळात पालेभाज्या आवक घटल्यामुळे पालेभाज्या प्रचंड महागल्या आहेत.

शेतकऱ्याच्या कोथींबीर ला मिळाला उत्तम भाव

नाशिक जिल्ह्यातील सोयखेडा गावातील शेतकरी दिगंबर बोडके बाजार समितीत त्यांची कोथिंबीर विकायला आले होते. त्यांच्या कोथिंबिरीला छान भाव मिळाला असल्याचे सांगून त्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले मी बाजार समितीत २०५ जुड्या गवाठी कोथिंबीर घेऊन आलो होतो. चाळीस हजार रुपये प्रति क्विंटल या दराने मला आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला. मला 205 कोथिंबीर जुड्यांचे एकूण ८२ हजार रुपये प्राप्त झाले. कोथिंबिरीचे उत्पादन सुरू केल्यापासून पहिल्यांदाच एवढा घसघशीत बाजारभाव मिळाल्याचा आनंद मात्र त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

लसूण दर चारशे रुपये प्रति किलो

स्वयंपाक घरातील आवश्यक सामग्री पैकी एक असलेल्या लसणाची फोडणी पुन्हा एकदा गृहिणींना महाग पडणार असल्याचे चित्र आहे . किरकोळ बाजारात लसूणाचे दर ४०० रुपये प्रती किलोच्या वर गेले असल्यामुळे सामान्य महिलांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे . यावर्षी लसूणचे भाव ४०० रुपये प्रती किलोच्या वर जाण्याची ही दुसरी वेळ असल्यामुळे लसूण खरेदी करताना मध्यमवर्गीयांना विचार करणे भाग पडत आहे. आपल्या रोजच्या जेवणात लसूण शिवाय रंगत येतच नाही. लसूण विना डाळीची, भाजीची, भाताची फोडणी अपूर्ण मानल्या जाते. परिणामी लसूण खरेदी करावाच लागतो. मात्र सामान्यपणे एक किलो घेणारे लोक सध्याच्या काळात मात्र पाव अन् अर्धा पाव लसूण खरेदी करताना दिसत आहेत .

फळभाज्या सुद्धा महागल्या

मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे टमाटे, मिरची, घेवडा इत्यादी फळभाज्या खराब झाल्या असून, त्यांचा दर्जा सुद्धा खालावला आहे. मेथी, पालक, शेपू, कोथिंबिरीची आवकही कमी होत आहे. चांगल्या प्रतीचा भाजीपाला कमी येत असून, त्यासाठी जास्त किंमत द्यावी लागत आहे. राज्यात सध्या फळभाज्यांचे भावात सुद्धा कमालीची वाढ झाली आहे. घेवडा २० रुपये, तर वाघ्या घेवडा ३० रुपये पावकीलो किंमतीने विक्री होत असल्याचे जात आहे. हिरवी मिरची ४० रुपये पावशेर अशी मिळत आहे. गेल्या महिन्यात सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. त्यामुळे भाज्यांच्या वाढीवर परिणाम झाला, तसेच काही शेतकऱ्यांच्या भाज्यांची उगवणच झालेली नाही. त्यामुळे सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांची चणचण भासत आहे. साहजिकच याचा परिणाम त्यांच्या दरवाढीवर झाला आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्याचे परिणाम शेतीपिकावर झाल्यामुळे बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान तर झालेच आहे शिवाय आता आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला या महागाईची चांगलीच झळ सोसावी लागत आहे. पालेभाज्यांच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्यामुळे भावात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा आता घरखर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment