कृषी पुरस्कार वितरण निधिला मंजुरी, मागील तीन वर्षातील पुरस्कार होणार प्रदान
शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी आहे. २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षांच्या विविध कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ७ कोटी १५ लाख ६१ हजार रूपये आणि २०२३-२४ सालच्या खरीप हंगामातील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांच्या बक्षिस वितरण करिता ९५ लाख ५ हजार रूपये असे एकूण ८ कोटी १० लाख ६६ हजार रूपये खर्च करण्यासाठी प्रशासकीय आणि वित्तीय विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. हा निधी आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावरून वाटप केल्या जाणार आहे.
संपूर्ण देशासह राज्यात पसरलेल्या कोरोना आजारामुळे राज्यात लॉकडाऊन लागून 2020 पासून विविध शेतकरी पुरस्कार प्रदान करण्याचे कार्यक्रम स्थगित होते. या पुरस्कारांमध्ये यामध्ये कृषीरत्न, कृषीभूषण, सेंद्रीय शेतीतील कृषीभूषण, शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, शेतीनिष्ठ, कृषी सेवारत्न इत्यादी पुरस्कार समाविष्ट आहेत. आता या पुरस्कारांच्या निधीस मंजुरी मिळाल्यामुळे येत्या२९ सप्टेंबर रोजी पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यासाठी सुमारे 400 शेतकऱ्यांचा सहभाग असेल. या विविध पुरस्कारांमध्ये रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्ह पुरस्कारासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येते.
कार्यक्रमाचे ठिकाण आणि ऑनलाईन कुठे पाहता येणार?
रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता,नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम ), वरळी मुंबई येथे हा कार्यकम होणार आहे. कृषी पुरस्कार वितरण सोहळा आपल्याला थेट पाहता येणार आहे. https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युटुयब चॅनेलवरुन तसेच https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM या फेसबुक पेजवरून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी तसेच महत्त्वपूर्ण योजना अंमलात आणल्या जातात. शेतकऱ्यांसाठी हितावह असे निरनिराळे निर्णय घेतल्या जातात. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे घोषित केल्या जातात. आणि शेतीत भरघोस यश संपादन करून उन्नती करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून विविध कृषी पुरस्कार जाहीर केले जातात. अशा राज्य सरकारद्वारे शेतकरी बांधवांना दिल्या जाणाऱ्या काही पुरस्कारांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
१) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ कृषी पुरस्कार
राज्यातील एकूण 40 शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
- या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला 1967 पासून प्रारंभ झाला.
शेतीतील खालील घटकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
- शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती अवजारांचा वापर, जमिनीच्या प्रतवारी प्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर/नाला इत्यादी मधील पाणी अडवून शेतीतील नालाबडींग इत्यादीद्वारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीद्वारे पाण्याचा सुयोग्य वापर, पीक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेतीपुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड लागवड करणे, स्वतःच्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड, शेतकऱ्यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून आदिवासी गटासह एकूण 40 (चाळीस) शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
•या पुरस्कार अंतर्गत रु. 44000/- एवढी रोख रक्कम, दिली जाते पारितोषिक तसेच स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन अशा शेतकऱ्याचा सपत्नीक सत्कार करण्यात येतो. - सन 2019 अखेर पर्यंत 1471 पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.
२) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषी सेवारत्न कृषी पुरस्कार
राज्यातील एकूण 10 शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
- हा पुरस्कार 2014 पासून सुरू करण्यात आला आहे.
शेतीतील खालील घटकांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्य शासनाकडून हा पुरस्कार देण्यात येतो.
- राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील एका अति उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास राज्य शासनाव्दारे सन्मानित करण्यात येते.
- 2019 अखेर पर्यंत एकूण 13 पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
३) जिजामाता कृषीभूषण पुरस्कार
राज्यातील एकूण 8 पात्र महिला शेतकऱ्यांना हा पुरस्कार जाहीर केला जातो.
- सन 1995 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील शेती क्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असू, शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेतीच्या विकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. याशिवाय शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पुरस्काराची सुरुवात केली आहे.
- पुरस्काराचे स्वरूप रु. दोन लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व पतीसह सत्कार.
- 2019 अखेर पर्यंत एकूण 111 शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
४) उद्यान पंडित कृषी पुरस्कार
एकूण 8 शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
- हा पुरस्कार 2001-02 सालापासून सुरू करण्यात आला आहे.
- महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, जमिनीची प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादनास मोठा वाव आहे. भाजीपाला पिके, फळ पिके, फुल पिके, मसाला पिके, औषधी व सुंगधी वनस्पती पिके यापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. तसेच राज्यात फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराने शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
पुरस्काराचे स्वरूप
- रु. एक लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
- सन 2019 अखेर पर्यंत एकूण 223 पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
५) वसंतराव नाईक शेतीमित्र कृषी पुरस्कार
या पुरस्काराची कमाल संख्या 8 आहे.
- हा पुरस्कार 1994 पासून सुरू करण्यात आला आहे.
- जे अभ्यासू शेतकरी त्यांच्या शेतीविषयक ज्ञानाचा लाभ त्यांच्या परिसरातील इतर शेतकऱ्यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती/संस्था ज्या स्वतः शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वतःची शेती नाही. परंतु पत्रकारीता व्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतकऱ्यांना/व्यक्तींना/संस्थांना, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग (उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडूळशेती इत्यादीमधील) वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच खेड्यांमधून परसबाग वृध्दींगत करणाऱ्या महिला, कृषी विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे. अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
पुरस्काराचे स्वरूप
- रु. एक लाख वीस हजार रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
- सन 2019 अखेर पर्यंत एकूण 81 पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
६) युवा शेतकरी कृषी पुरस्कार
राज्यातील एकूण 8 युवा शेतकऱ्यांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
- हा पुरस्कार 2020 पासून प्रारंभ करण्यात आला आहे.
- या पुरस्कारासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 40 आहे.
पुरस्काराचे स्वरूप
- रु. एक लाख वीस हजार रोख रक्कम, पारितोषिक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
७) कृषीभूषण पुरस्कार (सेंद्रिय शेती)
एकूण पुरस्कार संख्या 8 असते.
खालील शेतीविषयक घटकांत भरीव कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार जाहीर होतो.
पुरस्काराचे स्वरूप
- हा कृषी पुरस्कार सुरु सन 2009-2010 पासून सुरू करण्यात आला आहे.
- सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यात प्रोत्साहन देऊन शेती करणाऱ्या तसेच उत्पादीत सेंद्रीय मालाची विक्री व्यवस्था करणे या मुख्य हेतूने राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत, अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
- रु. दोन लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार.
- सन 2019 अखेर पर्यंत एकूण 78 शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
८) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार
हा कृषी पुरस्कार फक्त एकच व्यक्तीला देण्यात येतो.
सदर कृषी पुरस्कार 2000-2001 सालापासून प्रदान करण्यात येत आहे.
खालील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार मिळतो.
- कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रीया, निर्यात, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील कोणत्याही एका शेतकऱ्यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन्मानित करण्यात येते.
पुरस्काराचे स्वरूप
- या पुरस्काराच्या माध्यमातून रु. तीन लाख रोख रकमेचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र तसेच सपत्नीक सत्कार करण्यात येतो.
- सन 2019 अखेर पर्यंत एकूण 23 पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
या पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी नामांकन कसे करावे?
या सर्व पुरस्कारांचे दरवर्षी रीतसर पद्धतीने नामांकन होत असते. त्यामुळे या पुरस्कारामध्ये नामांकन करण्यास जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी पुरस्काराचे प्रस्ताव सादर करण्यासाठी जवळच्या तालुका कृषी कार्यालयास भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घ्यावी.
कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या राज्यातील शेतकरी महिला, शेतकरी संस्था/गट, कृषी पत्रकार यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रीय शेती कृषीभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
कृषी विभागामार्फत कृषी व संलग्न क्षेत्रात ल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती /गट/संस्था यांचे उपरोक्तप्रमाणे विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत असतात. पुरस्काराचे स्वरुप पुढीलप्रमाणे- डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, पुरस्काराची रक्कम रु. 3 लाख, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार- रु. 2 लाख, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार- रु. 2 लाख, कृषिभूषण, सेंद्रिय शेती पुरस्कार- रु. 2 लाख, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- रु. 1 लाख 20 हजार, युवा शेतकरी पुरस्कार- रु. 1 लाख 20 हजार, उद्यान पंडित पुरस्कार- रु. 1 लाख, वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्व साधारण व अदिवासी ट) रु. 44 हजार रुपये
सर्व इच्छुक शेतकरी /गट/संस्था/व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांच्याकडून आवाहन केले जाते. विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव तयार करण्यासाठी अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा लागतो.