राज्य सरकारकडून २०२२ च्या शेती पिकांच्या नुकसानभरपाई साठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीचे वाटप राज्यातील चार जिल्ह्यात करण्यात येणार आहे. सन 2022 मध्ये या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या चार जिल्ह्यामध्ये अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे.
याबाबत सरकारने काढला शासन निर्णय
याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारकडून दिनांक 10 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे. या शासन निर्णयात या नुकसानभरपाई बाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या चार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीला यश
सन २०२२ साली पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. राज्य सरकारकडून त्यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दर आणि निकषानुसार नुकसानभरपाई म्हणून दीड हजार कोटीच्या निधीला मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर मंजूर निधीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असेल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम या चार जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार राज्य सरकारने वर नमूद चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६१ कोटी रुपयांच्या निधीसाठी शासन निर्णय नुसार मंजूरी दिलेली आहे.
प्रत्येक जिल्ह्याला इतकी मिळेल नुकसाभरपाई
सदर शासन निर्णय बद्दल सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यात वितरणासाठी नुकसानभरपाई म्हणून २५ कोटी ७४ लाख रुपये, परभणी जिल्ह्यासाठी २१ कोटी २९ लाख रुपये, अमरावती जिल्ह्यासाठी १३ कोटी २० लाख रुपये आणि वाशिम जिल्ह्यासाठी ६९ लाख रुपये निधी वाटपासाठी मंजूरी देण्यात आली असून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी जास्तीच्या निधीची गरज असल्याचे मध्यंतरी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानुसार अतिरिक्त निधी मंजूर करून राज्य सरकारने या चार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे.
बँकांनी या नुकसानभरपाई अंतर्गत मिळणारी रक्कम कापू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
राज्य सरकारने २ हेक्टरच्या मर्यादेत निधी वितरित करण्याचा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात केला असून लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाई बाबत तसेच वितरण पूर्ण झाल्यानंतर यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या जाणाऱ्या या सहाय्याची रक्कम बँकांनी कर्ज खात्यात किंवा इतर वसूली या अशी करणे देऊन कापून घेऊ नये, अशा सूचना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना केलेल्या आहेत.
यंदाच्या नुकसानभरपाईची रक्कम प्रती हेक्टरी किती असणार?
मागील आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या शेतीपिकांच्या नुकसानी बाबतचे पंचनामे सुद्धा अंतिम टप्प्यात आहेत. मात्र आता सरकार नव्या निकषानुसार भरपाई देणार की जुन्या निकषानुसार भरपाई देणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. जोपर्यंत सरकार नव्या निकषानुसार नुकसानभरपाई जाहीर करत नाही तोपर्यंत जुन्या निकषानुसारच म्हणजेच कमी नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र शेतकऱ्यांनी वाढीव नुकसानभरपाईची मागणी केल्यास सरकार वाढीव दराने भरपाई देऊ शकते, अशी माहीती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
हेक्टरी 13600 रुपयांची मिळणार भरपाई, 3 हेक्टर पर्यंत मर्यादा
त्यानुसार शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई देण्यात येणार हे आता सरकारने स्पष्ट केले. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार असून ही नुकसानभरपाई फक्त २ हेक्टरपर्यंत नसून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता ३ हेक्टरपर्यंत या मदतीची मर्यादा ठरविण्यात आली आहे.
बळीराजाला आता मिळणार शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card), मिळतील असंख्य लाभ
2024 साठी भरपाईची कमाल मर्यादा
या नुकसानभरपाईचे निकष लक्षात घेता एका शेतकऱ्याला भरपाई कमाल ४० हजार २०० रुपये मिळू शकते. मात्र सरकारने फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे सरकारने अद्यापपर्यंत स्पष्ट केलेले नाही. याबाबत सरकारने ट्वीट करून जिरायती म्हणजेच कोरडवाहू पिकांना किती भरपाई मिळेल हे ट्विट करून जाहीर केले आहे. सदर ट्विटमध्ये असलेल्या उल्लेखानुसर ३ हेक्टरच्या मर्यादेत ही नुकसानभरपाई मिळणार आहे. ही हेक्टरी नुकसानभरपाई नव्या निकषानुसार म्हणजेच ८ हजार ५०० रुपयांऐवजी १३ हजार ६०० रुपये मिळणार असल्याची माहीती सरकारकडून देण्यात आली आहे.
ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झाले होते प्रचंड नुकसान
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या असना वादळाचे परिणाम म्हणून राज्यातील मराठवाड्यात आणि विदर्भात अतिवृष्टी होऊन प्रचंड नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे सुद्धा आता अंतिम टप्प्यात आहेत. वाढीव भरपाई मिळणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली असली तरीही सरकारने अजून याविषयी शासन निर्णय काढलेला नाही. सरकारने जीआर काढल्यानंतर बागायती पिकांचे आणि फळपिकांच्या नुकसानभरपाई बाबत माहिती मिळणार आहे.
अशी असेल नुकसानभरपाई मिळण्याची मर्यादा
राज्य सरकारद्वारे नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या हानीमुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्यात आली होती. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी भरपाई ८ हजार ५०० रुपयांवरून १३ हजार ६०० रुपये करण्यात आली होती. बागायती पिकांसाठी १७ हजारांऐवजी २७ हजार तसेच फळ पिकांसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी ३६ हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली होती. त्यानुसार कोरडवाहू पिकांना भरपाई देण्यात येईल, अशी माहिती सरकारने दिली आहे.