जाफराबादी म्हैस का पाळावी? ही आहेत कारणे

शेती म्हटल की डोळ्यांसमोर येते ती अनिश्चितता. निसर्गाच्या लहरीपणावर शेतीतील उत्पन्न अवलंबून असते. आज आपण शेतीसाठी जोडधंदा म्हणून दूध व्यवसायासाठी जाफराबादी म्हैस एक उत्तम पर्याय का आहे याची माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो मागील काही लेखांमध्ये आपण नागपुरी, पूर्णाथडी, मूऱ्हा, पंढरपुरी, भदावरी, सुरती या म्हशींची सविस्तर माहिती पाहिली. आज या लेखातून आपण जाफराबादी म्हशीची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तसेच जाफराबादी म्हैस दुग्ध उत्पादनासाठी उत्कृष्ट का आहे याबद्दल आपल्या ज्ञानात अधिकची भर घालणार आहोत.

शेतीसाठी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय एक सर्वात आवडता पर्याय म्हणून शेतकरी बांधवांमध्ये लोकप्रिय आहे. दूध उत्पादन करून आपल्याला शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नासोबतच अधिकचा आर्थिक हातभार लागतो हे विसरून चालणार नाही. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर म्हैस पालन करत असतो. राज्यात जवळपास प्रत्येक राज्यात म्हशी पाळल्या जातात. चला तर जाणून घेऊया भरघोस दूध देणारी जाफराबादी म्हैस नेमकी आहे तरी कशी? याची इत्यंभूत माहिती.

जाफराबादी म्हैस

जाफराबादी म्हशीचे मूळ स्थान

शेतकरी मित्रांनो कुठ्ल्याही म्हशीची ओळख ही त्या म्हशीच्या मूळ स्थानावरून होत असते. तर जाफराबादी म्हैस ही मूळची गुजरात राज्यातील आहे. गुजरातमधील भावनगर, अमरेली, जुनागढ, जामनगर, कच्छ आणि काठीयावाड या जिल्ह्यात जाफराबादी जातीची म्हैस आढळून येते. मात्र भरपूर दूध देणारी ही म्हैस असल्यामुळे देशातील विविध भागात या म्हशीची प्रचंड मागणी असते. दुग्ध व्यवसाय करणारे व्यापारी तसेच शेतकरी वर्गात या म्हशीची प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळते.

जाफराबादी म्हशीची वैशिष्ट्ये

जाफराबादी म्हैस ही काळ्या रंगाची असून या म्हशीचा चेहरा आकारमानाने थोडा लहान असतो. या म्हशीच्या पायांवर पांढऱ्या रंगाच्या खुणा आढळून येतात. या जातीच्या म्हशीची शरीरयष्टी विस्तृत असते. जाफराबादी म्हशीचे डोके आणि मान अतिशय भव्य आणि उठावदार असते. या म्हशीचे कपाळ रुंद भरदार पण उथळ असते. जाफराबादी म्हशीची शिंगे इंग्रजीतील जे ((J) आकाराची मोठ्या आकाराची अन् जाडजूड असतात. तसेच ती टोकाशी आत वाळलेली असल्याचे पाहायला मिळते. जाफराबादी म्हशीचे सरासरी वजन 545 किलो असते.

जाफराबादी म्हैस का पाळावी?

जास्त दूध देणाऱ्या उत्तम प्रजातीच्या म्हशींमध्ये जाफराबादी म्हशींचा समावेश होतो. या जातीच्या म्हशी प्रती वेत सरासरी 1030 लिटर दुधाचे उत्पादन देतात. जाफराबादी म्हैस दर दिवसाला 7 ते 9 लिटर दूध देते. मात्र उत्तम व्यवस्थापन ठेवल्यास प्रती दिन 10 लिटर पर्यंत दुधाचे उत्पादन घेणे सहज शक्य आहे. या जातीच्या म्हशींच्या दुधात फॅटचे प्रमाण 7 ते 8 टक्के असल्यामुळे दुधाला मागणी आणि किंमत खूप असते. जाफराबादी म्हैस 65 महिन्यानंतर पहिल्यांदा विते. या जातीच्या म्हशीच्या दोन वेतामधील अंतर 509 दिवसांचे असते. दूध देण्याच्या बाबतीत ही म्हैस उत्कृष्ट ठरत असल्यामुळे या जातीच्या म्हशी पाळून प्रचंड नफा कमावत येऊ शकतो. या म्हशीच्या पालनासाठी फार जास्त खर्च सुद्धा येत नाही.

हे अन्न खावू घातल्यास जास्त दुधाचे उत्पादन

जाफराबादी म्हैस ही इतर म्हशींच्या तुलनेत प्रचंड शक्तिशाली असल्याचे बोलले जाते. एका सिंहाला टक्कर देण्यासाठी सुद्धा या म्हशित ताकत असल्याचे बोलल्या जाते. या म्हशीचे दूध उत्पादन मिळविण्यासाठी या म्हशीच्या आहाराची तसेच विश्रांतीची काळजी घेणे आवश्यक असते. जाफराबादी म्हशीला जितक्या प्रमाणात हिरवा चारा खायला घालता त्याच प्रमाणात अन्नधान्य किंवा ढेप सुद्धा खायला घातली तर या म्हशीची दूध देण्याची क्षमता प्रचंड वाढल्याचे अनुभव अनेक पशुपालक शेतकरी सांगतात. एकूण काय तर जाफराबादी म्हशीच्या आहारात योग्य संतुलन राखणे दुधाच्या जास्त उत्पादनासाठी अगत्याचे ठरते.

जाफराबादी म्हशीची किंमत किती असते?

शेतकरी मित्रांनो आपण जाफराबादी म्हैस दुग्ध व्यवसायात एक लोकप्रिय निवड का आहे याची सविस्तर माहिती पाहिली. आता जाणून घेऊया या जातीच्या म्हशीची किंमत किती असते याबद्दल माहिती. तर मित्रांनो या जाफराबादी जातीच्या प्रौढ म्हशीची किंमत 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आढळून येते. शेतकरी बांधवांसाठी या म्हशीचे पालन करून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळविणे काही कठीण कार्य नाही. राज्यातील बऱ्याच भागातील म्हशींच्या बाजारात तुम्हाला जाफराबादी म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते.

शेतकरी मित्रांनो केवळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून राहणे आजच्या या आधुनिक युगात हिताचे नाही. परिणामी विविध प्रयोग करून अधिकाधिक उत्पन्न वाढविण्याचा ध्यास अंगी बाळगण्याची गरज आहे. शेतीत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग तर करायलाच हवेत मात्र शेतीशी निगडित जे इतर व्यवसाय आहेत त्यांच्याबद्दल माहिती आणि पुरेसे ज्ञान घेऊन आपण आपले जीवन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले तरच बळीराजा सुखा समाधानाचे जीवन व्यतीत करू शकेल. आणि आपली तसेच आपल्या कुटुंबाची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळू शकेल.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment