विद्यार्थी बोलणार, शासन ऐकणार : भरती परीक्षा सुधारणांसाठी शासनाचा संवाद

शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील लाखो युवक-युवती स्पर्धा परीक्षांसाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. विद्यार्थ्यांच्या अपेक्षेला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र शासनाने भरती परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे.

विद्यार्थ्यांचा आवाज थेट शासनापर्यंत

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव काय आहेत, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल अपेक्षित आहेत, हे जाणून घेण्यासाठी टास्क फोर्स स्वतः राज्यातील सर्व सहा विभागांमध्ये जाऊन संवाद साधणार आहे. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि अन्य संबंधित घटकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या सुधारणा प्रक्रियेत विद्यार्थ्यांना केवळ लाभार्थी न मानता सक्रिय भागीदार म्हणून सहभागी करून घेण्याचा दृष्टिकोन अधोरेखित होत आहे.

विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक

अ. क्र.विभागदिनांकस्थळई-मेल
पुणे१२ सप्टेंबर २०२६सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेpune-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागपूर१६ सप्टेंबर २०२६डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूरnagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in
अमरावती१७ सप्टेंबर २०२६DPC Hall of Collector Office, Amravatiamravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in
छत्रपती संभाजीनगर२१ सप्टेंबर २०२६स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगरcsn-examreformstaskforce@maharashtra.gov.in
कोकण२९ सप्टेंबर २०२६चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबईkonkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नाशिक३० सप्टेंबर २०२६जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकnashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

गैरप्रकारांना प्रतिबंध आणि परीक्षा सुरक्षा

भरती प्रक्रियेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी परीक्षेची निष्पक्षता आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यव्यापी संवादातून प्राप्त सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्स सखोल अभ्यास करणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणे, परीक्षा सुरक्षा अधिक मजबूत करणे, प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करणे यासाठी आवश्यक सुधारणांच्या शिफारशी शासनाला सादर करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांनीही पुढे यावे

टास्क फोर्सचा हा राज्यव्यापी संवाद म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपले मत शासनापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची संधी आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा असलेल्या उमेदवारांनी केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यावरील व्यवहार्य उपाय आणि सूचना देखील मांडणे गरजेचे आहे. शासन ऐकणार, विद्यार्थी बोलणार आणि अनुभवातून सुधारणा घडणार, ही या उपक्रमाची महत्त्वाची दिशा आहे. पारदर्शक प्रक्रिया, सुरक्षित परीक्षा, गुणवत्तेला न्याय आणि विद्यार्थ्यांचा विश्वास—या चार आधारस्तंभांवर अधिक सक्षम व उमेदवाराभिमुख भरती व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

माहितीचा अधिकृत स्रोत: जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा
लेखक : भूषण इंगळे
लेखक : भूषण इंगळे
मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
लेखक महाराष्ट्रातील विविध **सरकारी योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण, रोजगार आणि फायनान्स** अशा महत्वपूर्ण विषयांचे अभ्यासक व लेखक आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत अचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे, हेच त्यांच्या "कामाची बातमी" या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Comment