सारथी संस्था; कुणबी मराठा समाजासाठी प्रगतीचा शासकीय आधारस्तंभ

महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समुदायासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहे. मराठा समुदायाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक (SEBC) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मराठ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळू शकेल. शासनाने मराठा समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत, ज्यात शैक्षणिक शिष्यवृत्ती, फ्रीशिप, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे. सारथी संस्था यांसारख्या विविध संस्थांमार्फत मराठा तरुणांना परदेशी शिक्षण, प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि उद्योजकता विकासासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे. शासनाच्या या प्रयत्नांमुळे मराठा समुदायाचा सामाजिक-आर्थिक विकास गतीने होण्यास मदत होईल अशी शासनाची अपेक्षा आहे.आजच्या लेखातून आपण सारथी संस्था अंतर्गत कोणत्या योजना राबविल्या जातात अन् त्यांचा आजपर्यंत काय फायदा झाला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सारथी संस्थेची ओळख आणि उद्देश

महाराष्ट्र शासनाने 2019 मध्ये सुरू केलेली सारथी संस्था ही एक क्रांतिकारी पाऊल आहे जी समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे. ‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ या बोधवाक्याखाली कार्यरत असलेली ही संस्था मराठा आणि कुणबी समुदायातील प्रतिभावान तरुणांना त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम करते. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणून ओळखली जाणारी सारथी संस्था शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार आणि उद्योजकता यासारख्या विविध क्षेत्रांतून 63 पेक्षा अधिक उपक्रम राबवत आहे.

शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सारथीचे योगदान

सारथी संस्था अंतर्गत शैक्षणिक उपक्रमांमधून हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सन 2021-22 ते 2024-25 या कालावधीत 8 लाख 38 हजार 477 लाभार्थ्यांनी या संस्थेच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक साहाय्य पुरवले जाते. याचाच परिणाम आहे की 2020 ते 2024 या कालावधीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये 112 विद्यार्थी निवडून आले आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये 2020 ते 2023 या कालावधीत 1048 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

कौशल्य विकासात सारथी संस्था ची भूमिका

सारथी संस्था च्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमामुळे हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. हा कार्यक्रम राज्यातील सर्व तालुकास्तरावर राबवण्यात येतो. सन 2022 ते 2025 या कालावधीत 97 हजार 286 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून 34 हजार 304 लाभार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी 7365 लाभार्थ्यांना नोकरी मिळाली असून 9418 लाभार्थ्यांची मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. सारथी संस्थेच्या या प्रयत्नांमुळे असंख्य कुटुंबांमध्ये आर्थिक स्थैर्य आले आहे.

आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी सारथीची शिष्यवृत्ती योजना

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना सहा कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती रकमेचा लाभ देण्यात आला आहे. सन 2024-25 मध्ये या योजनेअंतर्गत 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सारथी संस्थेच्या या उल्लेखनीय पाऊलामुळे प्रतिभावान तरुणांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्याची संधी मिळते.

देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांसाठी शिष्यवृत्ती

देशातील नामवंत 200 विद्यापीठात शिकणाऱ्या300 विद्यार्थ्यांना दरवर्षी सारथी संस्थेमार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये शिक्षण शुल्क, लायब्ररी शुल्क, परीक्षा शुल्क, वसतीगृह शुल्क व भोजन शुल्काची 100 टक्के रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येते. सन 2022-23 व 2023-24 मध्ये या योजनेअंतर्गत 441 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन पाच कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सारथी संस्था अंतर्गत या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळते.

तंत्रशिक्षण आणि रोजगारासाठी सारथीचे प्रयत्न

वसंतदादा साखर संस्था, पुणे येथील इंडस्ट्रियल फर्मिनेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी (IFAT) आणि Wine Brewing and Alcohol Technology (WBAT) विद्यार्थ्यांकरिता सारथी संस्थेमार्फत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना राबवली जाते. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना 100 टक्के शैक्षणिक शुल्क रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येते. IFAT मधील 80 विद्यार्थ्यांना 49.40 लाख रुपये तर WBAT मधील 28 विद्यार्थ्यांना 34.54 लाख रुपये शैक्षणिक शुल्क अदा करण्यात आले.

कृषी क्षेत्रातील सारथीचे नाविन्यपूर्ण उपक्रम

सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळते. राहुरी, दापोली आणि परभणी येथील कृषी विद्यापीठांमध्ये शेतकऱ्यांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये 330 शेतकऱ्यांनी ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शेतकरी मावळा सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण देण्यात येते. पशुधन संगोपन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत वर्षभरात एक हजार लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सारथीचे प्रशिक्षण कार्यक्रम

महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पुणे, वाशिम, कोल्हापूर, गडचिरोली, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर, नाशिक, पालघर, बीड, रत्नागिरी या जिल्ह्यात राबवला जातो. या सर्व जिल्ह्यांत एकूण 1419 अभ्यासक्रम राबविले जात असून त्यापैकी 989 अभ्यासक्रम पूर्ण झालेले आहेत. सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आय.डी.टी.आर. भोसरी पुणे येथे हलकी व जड वाहने चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

सांस्कृतिक वारसा संवर्धनात सारथीची भूमिका

सारथी संस्थेमार्फत सरनोबत नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजना राबवण्यात येत असून यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळातील प्रकाशित कागदपत्र, आदेश, हुकूमनामा इत्यादी दस्तऐवज पुराभिलेख संचालनालयाकडून डिजिटल स्वरूपात प्राप्त केले आहेत. सारथी संस्थेमार्फत शिवराज्याभिषेक अभियान, किल्ले संवर्धन, वृक्षारोपण, जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. सरदार शिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन अभियानांतर्गत 38 किल्ले व दोन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.

संशोधन आणि उद्योजकतेसाठी सारथीचे प्रयत्न

सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत इनक्युबेशन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून स्टार्टअप कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन व विद्यावेतन स्वरूपात आर्थिक साहाय्य दिले जाते. महाराष्ट्रातील शासनमान्य यादी पैकी 13 इनक्युबेशन केंद्राने सारथी संस्था बाबत सामंजस्य करार केला आहे. सन 2025 या वर्षी 120 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत सन 2019 पासून ते 2023 पर्यंत 3078 विद्यार्थी योजनेसाठी पात्र होते.

सुविधा आणि पायाभूत सुविधांसाठी सारथीचे प्रकल्प

सारथी संस्था मार्फत पात्र विद्यार्थ्यांना प्राधान्याने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज संकुल उभारण्यात येत आहेत. प्रत्येक संकुलामध्ये 500 मुलांचे वसतीगृह, 500 मुलींचे वसतीगृह, 300 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सारथी विभागीय कार्यालयांचा समावेश आहे. सारथी संस्था च्या पुणे येथील मुख्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून नवीन इमारतीमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. इतर विभागीय कार्यालयाची कामे प्रगतीपथावर असून लवकरात लवकर ती पूर्ण करण्यात येत आहेत.

निष्कर्ष

सारथी संस्था ही केवळ एक प्रशिक्षण संस्था नसून ती समाजाच्या सर्वांगीण विकासाचे एक सशक्त माध्यम आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना आधुनिक स्वरूप देणारी ही सारथी संस्था समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे. शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता, संशोधन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या सर्व क्षेत्रांत सारथी संस्थेने केलेले कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. भविष्यातही सारथी संस्थेमार्फत समाजातील प्रतिभावान तरुणांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यात येतील यात शंका नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment