दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात राहणाऱ्या तरुण शेतकऱ्याने दोडका लागवड करून कमाल केली आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे विक्रम शेळके. या तरुण शेतकऱ्याने कुटुंबाच्या मदतीने फक्त एक एकर क्षेत्रावर दोडका पिकाची लागवड केली अन् 3 लाखाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. या होतकरू तरुण शेतकऱ्याने हे कसं साध्य केलं याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
भाजीपाला लागवड आहे फायद्याची
कमीत कमी कालावधीत लाखो रुपये उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता भाजीपाला लागवडमध्ये असते. भाजीपाल्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर जोपर्यंत उत्पादन चालू आहे त्या कालावधीत जर बाजारभाव चांगला मिळाला तर तीन ते चार महिन्याच्या कालावधीत भाजीपाला शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देण्याची किमया पालेभाज्या लागवड मध्ये असते हे कोणीही नाकारू शकत नाही.
आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांसाठी भाजीपाला लागवड एक विश्वासू पर्याय
इतर पारंपरिक पिकांचा विचार करता या पिकांना लागणाऱ्या खर्चापेक्षा भाजीपाला पिकांना खूप कमी खर्च लागतो तसेच या भाजीपाल्याची रोज विक्री केली जात असल्याने शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळता राहतो अन् आर्थिक चणचण दूर होते. परिणामी भाजीपाला पिकांना सध्या शेतकरी वर्गातून अनन्यसाधारण महत्व देण्यात येते. विदर्भात प्रामुख्याने भाजीपाला फळ पिकांमध्ये वांगे, टमाटे, मिरची, भेंडी, पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, शेपू अन् कोथिंबीर, आणि वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये करटोली, गिलके, कारले तसेच दोडक्याचे उत्पादन शेतकरी वर्ग घेत असल्याचे चित्र दिसते.
फक्त एक एकर शेतात 3 लाखाचे विक्रमी उत्पन्न
तर दौंड तालुक्यातील या यशस्वी शेतकरी बांधवाबद्दल सांगायचे झाल्यास या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर दोडका लागवड करण्याचे ठरवले. घरच्या एक एकर शेतीत दोडका लागवड केली. त्यानंतर 45 दिवसांच्या अल्प कालावधीतच या दोडका पिकापासून त्यांना उत्पादन मिळणे सुरू झाले आता पुढचे 45 दिवस हे उत्पादन मिळत राहील. त्यांच्या या यशामागे असलेले कष्ट अन् नियोजन सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही. सदर शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकाला लागणारी खते अन् कीटकनाशके फवारणी, पिकासाठी आवश्यक बांधणी आणि पीक आल्यानंतर त्याच्या तोडणीपासून तर मार्केटमध्ये जाऊन विक्री व्यवस्थापन या सर्व बाबींकडे अगदी काटेकोरपणे लक्ष दिले अन् योग्य नियोजन केले. त्या कष्टाचे आज चीज झाले असून आज या पिकाने सदर शेतकरी भावाला लाखो रुपये मिळवून दिले.
योग्य पिकाचे नियोजन हीच उत्पन्नाची खरी हमी
सदर शेतकरी भावाने दोडका लागवड साठी शेतीची पूर्व तयारी करण्यासाठी खूप कष्ट घेतले. तसेच लागवडीच्या अगोदर शेतामध्ये दहा ट्रॉली शेणखत आणून टाकले. परिणामी दोडका लागवड सफल होऊन दोडक्याच्या पिकांत भरभराटी आली. दोडका लागवड केल्यानंतर या तरुण शेतकऱ्याने पहिल्या 45 दिवसात यामध्ये काकडी अन् टमाटे यांचे आंतरपीक सुद्धा घेऊन नफ्यात अधिकची भर घातली. या आंतरपिकांतून तब्बल एक लाख रुपये नफा मिळवून शेतीला लागणारा संपूर्ण खर्च आधीच काढून घेतला. आता दोडका पिकातून मिळत असलेले अन् पुढील दीड महिना मिळणारे उत्पन्न हा त्यांचा निव्वळ नफा असणार आहे.
👉 फक्त 20 गुंठे शेतात करटोली लागवड करून महिन्याला कमावतो लाखो रुपये, कोण आहे हा शेतकरी?
दिवसाला निघतो दीड क्विंटल दोडका
या शेतकरी भावाच्या शेतीत केलेल्या दोडका लागवड मधून आता दररोज तब्बल दीड क्विंटल दोडका विक्रीसाठी बाजारात जात असून या दोडक्याने त्यांची चांगलीच चांदी केली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशाप्रकारे काहीतरी वेगळं निर्णय घेतला तर नक्कीच काहीतरी वेगळे फायदेशीर घडू शकते याची पुन्हा एकदा या शेतकरी भावाने प्रचिती आणून दिली.
शेतीच्या कामामध्ये मिळतो कुटुंबाचा आधार
सदर शेतकरी भावाला दोडका लागवड केलेल्या शेतीच्या सर्वच कामात मदत करण्यासाठी कंबर कसली आहे ती त्यांच्या भावाने, आईने आणि पत्नीने.आमचं शेतकरी कुटुंब मिळून शेतात मेहनत करते म्हणूनच हे यश मिळाले असल्याचं विक्रम भाऊ सांगतात. विक्रम भाऊचे कुटुंब स्वतःच बाजारात या दोडक्याची विक्री करत असल्यामुळे त्यांना कमालीचा नफा मिळतो. अन् आता तर त्यांना त्यांच्या शेतीसाठी लागलेला संपूर्ण खर्च आधीच आंतरपिकांच्या माध्यमातून निघाला असल्याने पुढील दीड महिना फक्त नफाच नफा मिळेल. कदाचित म्हणूनच म्हटल जात, “वावर हाय त पॉवर हाय!”
दोडका फळभाजी विषयी माहिती
दोडका फळभाजीला काहीजण शिराळे सुद्धा म्हणतात. हा दोडका दक्षिण आशिया खंड पासून आग्नेय आशिया व पूर्व आशिया खंडात आढळणारा एक वेल आहे. या वेलीला दंडगोलाकार, शिरा किंवा कंगोरे असलेल्या सालीची फळे येतात. या वेलीची कोवळी फळे भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापरली जातात. तसेच या वेलीची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पॉंज म्हणून वापरली जातात. दोडक्यांचा वापर आयुर्वेदात, उलटी व जुलाबाचे रामबाण औषध म्हणून केला जातो. शेतकरी मित्रांनो दोडका लागवड आपल्यासाठी एक कमाईचे उत्कृष्ट साधन म्हणून पुढे येऊ शकते यात शंका नाही.
दोडका फळभाजी लागवडीसाठी जमीनीची पूर्वमशागत कशी करावी?
आपल्या शेतात दोडका लागवड करण्यापुर्वी शेतजमीनीची खोल नांगरट करून घ्यावी. ट्रॅकटरच्या मदतीने रोटावेटर मारून शेतजमीन बारीक करून घ्यावी. नांगरट बारीक करून घेतल्या नंतर 6-7 फुटाच्या अंतरावर बेड तयार करावे. बेड बर तयार झाल्यानंतर आठ ते दहा दिवस बेड उन्हामध्ये चांगले वाळू द्यावेत मगच त्यावर ठिबक सिंचन संच लावून घ्यावा.
दोडका फळभाजी पीक लागवड करण्याची पद्धत
मलचींग पेपरला होल मारलेल्या जागेवर दोडक्याची रोपे जमीनीत लावावी लागतात. दोडका रोपे लावल्या नंतर ठिबक सिंचनाद्वारे मूळकुज व बुरशी लागू नये यासाठी खबरदारी म्हणून बुरशी नाशक वापरणे आवश्यक असते. दोडका फळभाजी लागवड केलेल्या रोपांना खोड किडनी खोड खाऊ नयेत म्हणून ठिबक सिंचनाद्वारे किटकनाशकांचा वापर करण्यात यावा.
दोडका लागवड पिकासाठी कोणते बियाणे वापरावे?
ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात दोडका लागवड करायची आहे त्यांनी महिको सीड्स, एल्लोराचे सीड्स, अजित सीड्स, सिजेंटा सीड्स,अशा प्रकारच्या नामांकित कंपन्यांची बियाणे वापरावी. शेतकऱ्यांनी त्यांच्या आवडी अनुसार बियाणे निवडून प्लास्टिक च्या ट्रेमध्ये भरून घ्यायचे असतात आणि 21 दिवसानंतर ही रोपे लागवडीसाठी तयार होतात.
दोडका फळभाजी लागवडीचे फवारणी व्यवस्थापन कसे असावे?
दोडका पिकावर फवारणी करत असताना त्यावर रोग पडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते. दोडका फळभाजी पिकावर अळ्या, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, खोडकिड, मळकुज अन् बुरशी अशा बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. परिणामी पिकावर योग्य वेळेत फवारण्या केल्या तर दोडका फळभाजी पिकाला कुठलीही समस्या उद्भवत नाही.
दोडका फळभाजीची काढणी कधी करावी?
आपल्या शेतात आलेली दोडक्याची तोडणी लागवड केल्यापासून 50-60 दिवसांनी पहीला तोडा काढण्यासाठी सुसज्ज होतो. पहिली काढणी काढल्यानंतर सुद्धा पुढील दोन महिने हे दोडके तुम्हाला सतत उत्पादन देत राहतात. एका तोडणीला एका एकरात दीड ते दोन क्विंटल माल निघतो. अशा प्रकारे एकूण दहा ते पंधरा तोडे होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक जास्तीत जास्त नफा प्राप्त करून देते.