गुलाब लागवड करून हा शेतकरी घेतोय वार्षिक 5 लाखाचे उत्पन्न

सातारा जिल्ह्यात असलेल्या कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील प्रगतिशील शेतकऱ्याने गुलाब लागवड करून वर्षाला 5 लाखाचे उत्पन्न घेऊन इयर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणा देण्याचे अभिनव कार्य केले आहे. सदर शेतकऱ्याने आपल्या शेतीतून चांगल्या प्रकारे पैसे कमवायला सुरुवात केली असून त्यांनी मागील कित्येक वर्षापासून गुलाब लागवड करणे यासाठी प्राधान्य दिले आहे. गुलाब लागवड मुळे या शेतकऱ्याच्या जिवनात गुलाबी सुगंध दरवळला आहे.

गुलाब लागवड 2024

नावीन्यपूर्ण शेतीची धरली कास

आजच्या या आधुनिक युगात अनेक शेतकरी पारंपरिक शेतीस बगल देऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि माहितीचा वापर करून आधुनिक अन् नावीन्यपूर्ण शेतीकडे वळताना दिसून येतात. विशेष म्हणजे असे नवनवीन प्रयोग करणारे असंख्य शेतकरी त्यांच्या शेतात भरघोस उत्पादन घेऊन त्यांची आर्थिक प्रगती साधतात. अशा असंख्य शेतकऱ्यांच्या बातम्या दररोज टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत असतात. अशीच नावीन्यपूर्ण शेती करून प्रचंड यश संपादन करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण या लेखातून पाहणार आहोत

सातारा जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी पोपट साळुंखे

गोष्ट आहे ती सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे या गावी वास्तव्य करणारे प्रगतिशील शेतकरी पोपटराव साळुंखे यांची. त्यांनी आपल्या शेतात गुलाब लागवडीतून चांगल्या प्रकारे आर्थिक समृद्धी साधली आहे व गुलाब शेती कशी फायद्याची असते याची प्रचिती देऊन इतर शेतकऱ्यांसमोर एक यशस्वी उदाहरण घालून दिले आहे. साळुंखे हे गेल्या 40 वर्षापासून शेती व्यवसायात कार्यरत आहेत.

पोपटराव आधी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. हे करत असताना आपल्या शेतीमध्ये ते अनेक पारंपरिक पिकांचे उत्पादन घेत असत. परंतु या पिकांसाठी झालेला खर्च आणि पदरी पडलेले उत्पन्न याचा ताळमेळ काही बसत नव्हता, परिणामी त्यांनी पारंपारिक पिकांऐवजी काहीतरी वेगळा मार्ग अवलंबण्याचा दृढ निश्चय केला. आणि गुलाबाची लागवड करण्याचे ठरवून आपल्या शेतात यशस्वी गुलाब लागवड सुद्धा केली.

जर शेतकऱ्याने योग्य नियोजन केले तर कमी खर्चात उत्तम नफा देणारी शेती म्हणून देखील फुलशेतीकडे भरवशाची आहे. आर्थिक टंचाई मुळे जर शेडनेट नाही उभारता आले तरीही मोकळ्या क्षेत्रावर देखील बरेच शेतकरी फुलशेती यशस्वी करतात. फक्त मनात जिद्द असावी लागते. फुल शेतीमध्ये महाराष्ट्रात गुलाब लागवड करण्याला महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी प्राधान्य देतात.

फुलांची वाढती मागणी बघता गुलाब लागवड एक नफ्याचा सौदा

आजकाल अनेक छोट्या-मोठे समारंभापासून तर मोठमोठ्या लग्नकार्यापर्यंत फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्याबरोबरच बरेच सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी देखील फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. परिणामी फुलांना प्रचंड मागणी असते. आताच्या काळात तर फुलांना वर्षभर असलेली मागणी कधीच संपत नाही अन् म्हणूनच फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे चांगला बाजार भाव मिळत असतो. फुलशेतीमध्ये प्रामुख्याने शेडनेट मधील फुलशेती आता मोठ्या प्रमाणावर होत असून त्यात पुण्यासारख्या परिसरामध्ये प्रामुख्याने शेडनेटच्या साहाय्याने फुलशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येतो.

गुलाब लागवड साठी जमीन कशी असावी?

गुलाबाची मुले जमिनीत खोलवर जात असल्याने जमीन भुसभुशीत व कमीत कमी ५० सें. मी. खोल असावी. निवडलेल्या जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा व्हावा. मध्यम प्रतीच्या जमिनीत गुलाब चांगला येतो कारण अशा जमिनीतून अन्नद्रव्यांचा योग्य प्रकारे पुरवठा होत असतो. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये घातल्यास गुलाब चांगल्या प्रकारे वाढवता येतो तसेच अशा जमिनीत सामू यापेक्षा जास्त असल्यामुळे डोलोमाईट वापरून तो योग्य त्या प्रमाणावर आणता येतो. १.७५ कि. ग्रॅ. डोलोमाईट प्रति घन मीटर वापर केल्यास जमिनीची सामू ०.३-०.५ युनिटने वाढू शकतो. जमिनीचा सामू ७.० वरून ५.० आणण्यासाठी सल्फर १.५ कि. ग्रॅ. किंवा अॅल्युमिनिअम सल्फेट ३.९ किलोगग्रॅमचा उपयोग करणे गरजेचे आहे. जमिनीत क्लोरीन व सोडियमचे प्रमाण १.५ मिलीलीटर पेक्षा कमी असले पाहिजे.

पाकळी गुलाबाची केली लागवड

मागील तीन वर्षांपासून पोपटरावांनी त्यांच्या 30 गुंठे शेतात पाकळी गुलाबाची लागवड सुरू केली आणि या तीन वर्षात आतापर्यंत 50 ते 60 गुलाबाच्या तोडण्या त्यांनी यशस्वीपणे केलेल्या आहेत. या गुलाबाच्या माध्यमातून महिन्याला चाळीस हजार रुपयांपर्यंत उत्पादन त्यांना आरामात मिळते. अत्यल्प खर्च लागून आणि वेळेची बचत होऊ भरघोस आर्थिक उत्पन्न या गुलाब शेतीतून पोपटभाऊ कमावत आहेत.

कुठे विकतात इतकी सारी गुलाबाची फुले?

पोपट साळुंखे यांच्या शेतातच अनेक फुलांच्या व्यापाऱ्यांची रांग लागलेली दिसते. व्यापारी वर्ग थेट त्यांच्या शेतातूनच साळुंखे यांनी पिकवलेल्या गुलाबाची खरेदी करून नेतात. गुलाबाची काढणी दर दोन दिवसांनी केली असून एका काढणीत त्यांना 40 ते 50 किलो गुलाबाचे उत्पादन मिळते. सुमारे चार पाच मजुरांच्या मदतीने गुलाबाच्या फुलांची काढणी केली जाते. साळुंखे भाऊंच्या शेतातील गुलाबाचा वापर प्रामुख्याने गुलकंद बनवण्यासाठी होतो. महत्वाची बाब ही की गुलाबाचे उत्पादन घेताना ते कोणत्याही प्रकारचे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी सुद्धा करत नाहीत. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करूनच पोपट साळुंखे गुलाबाचे उत्पादन घेत आहेत.

इतर शेतकऱ्यांनी सुद्धा घ्यावा बोध

वेळेनुसार बदलणे ही निसर्गाची रीत आहे. प्रत्येक गोष्ट वेळेनुसार बदलत असते. मग शेतकरी भावांनी सुद्धा शेतीची तीच ती पारंपरिक पद्धत सोडून त्यांच्या शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करणे अगत्याचे नाही का? काहीतरी वेगळं केलं तरच काहीतरी विशेष घडून येऊ शकते. आपण आपल्या शेतात राब राब राबतो पण त्याचे फळ मात्र आपल्याला अपेक्षेनुसार मिळताना दिसत नाही. मग थोडा अभ्यास करून, थोडी माहिती घेऊन, इतर यशस्वी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन इष्ट यशस्वी शेती नक्कीच करता येईल. त्यासाठी तुमचा दृढनिश्चय, मेहनत अन् मेहनत तुमच्या कामात येईल, यात शंका नाही.

गुलाब लागवड विषयी माहिती

गुलाबाच्या उत्तम वाढीसाठी कमीत कमी 6 तास प्रखर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. सावलीमध्ये गुलाबाचे झाड योग्यरीतीने वाढत नाही व त्यास फुलेदेखील येत नाहीत. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी, लाल, हलकी जमीन गुलाबास चांगली मानवते. पाण्याचा निचरा न होणार्‍या जमिनीमध्ये मूळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाड मरते. गुलाबाची अभिवृद्धी डोळे भरून केली जाते. रोझा इंडिका अथवा रोझा मल्टिफ्लोरा या जातींच्या खुंटावर डोळे भरले जातात. (Rose Farming) गुलाबाच्या यशस्वी लागवडीसाठी लागवडीपूर्वी तयारी करणे फार महत्त्वाचे असते. कारण जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर त्याच ठिकाणी 7 ते 8 वर्षे रोप राहते. जमिनीत 60×60×60 सें.मी. आकारमानाचे खड्डे 120 सें.मी.× 90 सें.मी. अंतरावर घ्यावेत, अथवा 45×45×45 सें.मी. आकारमानाचे चरप घ्यावेत.

गुलाब लागवड साठी आंतरमशागत कशी करावी?

खड्डे अथवा चर खोदण्याचे काम मार्च अथवा एप्रिल महिन्यातच पूर्ण करावे. मे महिन्यामध्ये 50 टक्के पोयटा व 50 टक्के शेणखत यांच्या मिश्रणाने खड्डे अथवा चर भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यामध्ये 50 ग्रॅम फॉलिडॉल डस्ट मिसळून घ्यावी. तसेच 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम निंबोळी पेंड व 100 ग्रॅम स्टेरामिल मिसळावे व खड्डे/चर भरून घ्यावेत व लागवडीस तायर ठेवावेत. लागवडीपूर्वी खड्ड्यांना/चरांना भरपूर पाणी द्यावे. एक हेक्टर क्षेत्रामध्ये सुमारे 18,000 गुलाबांची कलमे लागतात. कुंड्यांमध्ये गुलाबाची लागवड करण्यापूर्वी शक्यतो मोठ्या आकाराची मातीची चांगली भाजलेली कुंडी निवडावी. त्यास तळाला 1 सें.मी. व्यासाचे छिद्र पाडावे. जेणेकरून पाण्याचा निचरा चांगला होईल. कुंडीच्या तळाशी छिद्रावर एक खापरीचा तुकडा उलट झाकावा. त्याच्याआजुबाजूला विटांचे तुकडे 2 ते 3 सें.मी. उंचीपर्यंत भरावेत. त्यावर वाळलेला पाळापाचोळा टाकावा.

गुलाबाची छाटणी कशी करावी ?

चांगले कुजलेले शेणखत 50 टक्के व पोयटा माती 50 टक्के यांचे मिश्रण करावे. त्यात 50 ग्रॅम फॉलिडॉल डस्ट मिसळावी. याच मिश्रणामध्ये 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम निंबोळी पेंड व 50 ग्रॅम स्टेरामिल मिसळावे. या मिश्रणाने कुंडी भरावी. त्यास पाणी द्यावे. गुलाबाची छाटणी गुलाबाची छाटणी जून व ऑक्टोबर महिन्यात करावी. उन्हाळ्यात छाटणी करू नये. पहिली छाटणी करताना झाडांची उंची 60 सें.मी. झाल्यानंतर करावी. अशक्‍त, फुटवे पूर्णपणे काढून टाकावेत. त्याचप्रमाणे ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात हलकी छाटणी करावी. छाटणी करताना धारदार चाकूचा व सिकेटरचा वापर करावा व छाटणीनंतर बुरशीनाशकाची फवारणी करावी. गुलाबाच्या योग्य वाढीसाठी व भरपूर उत्पन्‍नासाठी नेहमी जमीन वापसा अवस्थेत ठेवावी. गुलाबाचे उत्पन्‍न सरासरी 2.5 ते 3.00 लाख फुले प्रतिहेक्टर इतके असू शकते. ग्लॅडिएटर, सुपरस्टार, मॉटेझूमा, पीस हॅपीनेस, आयफेल टॉवर, लॅडोरा, क्‍वीन एलिझाबेथ, अभिसारिका, एडवर्ड इत्यादी या गुलाबाच्या प्रमुख जाती आहेत.

गुलाबाच्या विवीध जाती विषयी माहिती

गुलाबात अनेक प्रकार आहेत. विविध रंगांच्या व आकारांच्या जाती आहेत. काही जातीच्या फुलांना सुगंध असतो. तर काही जातीच्या पाकळ्या बारीक असतात. गुलाबाच्या फुलांची संख्या व वाढ यामध्ये जातींमध्ये फरक आढळतो.

या वैशिष्ट्यावरून गुलाबाचे सहा प्रकार पडतात.

१) हायब्रीड टी, २) फ्लोरीबंडा, ३) पॉलीएंथा, ४) मिनीएचर, (छोटे गुलाब). ५) वेली गुलाब, ६) रानटी गुलाब, यापैकी हायब्रीड टी व फ्लोरीबंडा या जातीची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते.

१) हायब्रीड टी : टी गुलाब आणि परपेच्युअल गुलाब यांच्या संकरातून ही जात तयार केली आहे. फुले आकाराने मोठी, एका रंगाची, दोन रंगाची अथवा विविध रंगी आकर्षक असतात. गुलाबाचा आकार सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये अनेक जाती आहेत.

पिवळ्या रंगाच्या जाती : लांडोरा, समर सनशाईन, सनकिंग, किंग्ज रॅमसन, गंगा गोल्डन जाएंट, पूर्णिमा, गोल्डन स्पेंडॉंर, ग्रॅन्ड मेरी जेनी.

लाल रंगाच्या जाती : पपा मिलांड, ग्लॅडिएटर मिस्टर लिंकन, खिश्चन डिऑर, सोफिया लॉरन्स, हॅपीनेस, क्रिमसन ग्लोरी, ओक्मा होमा.गुलाबी रंगाच्या जाती : क्वीन एलिझाबेथ, सुपर स्टार, फ्रेंडशिप, सोनिया मिलांद, मारीया क्लास, फस्र्ट प्राईझ, सिंदूर, पिटर फ्रँकेन फेल्ड,

निळ्या रंगाच्या जाती : ब्ल्यू मून, लेडी एक्स, पॅराडाइस, स्टर्लिंग सिल्व्हर.

पांढऱ्या रंगाच्या जाती : ऑनर व्हर्गो, पास्कली डॉ. होमी भाभा, जॉन ऑफ केनेडी, मेसेज, मेमोरियम, चंद्रमा.

बहुरंगी जाती : डबल डिलाईट, पीस, अॅनव्हील स्पार्स्क, अमेरिकन हेरीटेज, सी पर्ल, किस ऑफ फायर, गार्डन पार्टी.

सुगंधी जाती : नूरजहान, दमास्क, क्रिमसन ग्लोरी, एडवर्ड

२) फ्लोरीबंडा : फ्लोरीबंडा ही जात हायब्रीड टी व पॉलिएंथा यांच्या संकरातून निर्माण केली आहे. फुले घोसात व मोठ्या संख्येने येतात. फुलांचा आकार चांगला असून हंगाम मोठा असतो. काही महत्त्वाच्या फ्लोरीबंडा जाती, त्यांच्या फुलाचा रंग खाली दिला आहे.

आरथर बेल : फुले पिवळी व सुवासिक असतात.

ऑल गोल्ड: फुलांना पिवळा रंग असून मंद सुवास असतो.

अँगल फेस : गुलाबी फुले असतात. फुलांना भरपूर सुवास असतो.

एलिझाबेथ ऑफ ग्लॅमिस : सालमन रंगाची सुवासिक फुले असतात.

फ्रेंच लेस : पांढरी मंद सुवासिक फुले असतात.

आईस बर्ग : पांढऱ्या रंगाची फुले खूपच सुवासिक असतात.

गोल्डन टाईम्स : या जातीची फुले पिवळ्या रंगाची असतात.

लिटल डार्लिंग : पिवळसर गुलाबी फुलांना भरपूर सुवास असतो.मरसेडिस : शेंदरी रंगाची व मंद सुवास असणारी फुले येतात.

सिंप्लीसिटी : गुलाबी रंगाची फुले असतात.

काही महत्त्वाच्या भारतीय जाती व फुलांचा रंग :

१) अभिसारिका – नारंगी,

२) आकाश सुंदरी – गुलाबी,

३) अनुपमा – लाल,

४) अनुरंग – रोझी,

५) अप्सरा – गुलाबी,

६) अर्जुन – रोझी,

७) भीम – गर्द लाल,

८) गंगा – सोनेरी,

९) हसीना – गुलाबी,

१०) जवाहार – पांढरा (मंद सुवास),

११) राजकुमार – गुलाबी,

१२) सुगंधा – लाल (गोड सुवास)

येथे आहे विदर्भातील सर्वात मोठे फुलांचे मार्केट

आपल्याला ही फुलवली फुले ठोक विकण्यासाठी महाराष्टातील फुलांच्या ठोक मार्केटची माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. आपल्याला विदर्भातील प्रसिद्ध फुलांचे मार्केट कोठे आहे माहीत आहे का? बरं बरं जास्त डोक्याला ताण देऊ नका आम्हीच सांगतो. तर नागांची नगरी नागपुरात विदर्भातील सर्वात मोठं फुलांचे मार्केट असून आज रोजी नागपूरच्या सीताबर्डी भागात सुमारे 70-80 ठोक खरेदी करणारे व्यापारी आहेत. येथील रोजची उलाढाल 40 लाखांच्या घरात आहे.

1994 पासून अखंड सुरू आहे सीताबर्डी फुलांचे मार्केट

नागपूर येथील सीताबर्डी भागात फार जुनी आणि मोठी फुलांची बाजारपेठ आहे. नेताजी फुल मार्केट हे विदर्भातील सर्वात मोठे मार्केट आहे. या बाजारपेठेमध्ये दिवसाला लाखोंची उलाढाल होत असून शेतकरी ते किरकोळ फुले विक्रेते यांच्यासाठी सदर बाजारपेठेचे महत्व आहे. या ठिकाणी दररोज विदर्भासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक आणि जावक होत असते. फुलांची जुनी बाजारपेठ सन 1994 पासून सीताबर्डी येथील नेताजी फुल मार्केट अखंड सुरू आहे.

नागपूर, विदर्भासह जवळच्या राज्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. या बाजारात दररोज सकाळी ठोक आणि चिल्लर असा सर्व प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो. फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही एक उत्तम बाजारपेठ आहे. येथे विदर्भासह नाशिक, पुणे, अहमदनगर तर इतर राज्यातील भोपाळ, बेंगलोर, हैदराबाद येथून फुलांची आवक होत असते. लगतच्या राज्यातील छत्तीसगड मध्यप्रदेश, तेलंगणा येथून सुद्धा विविध फुलांची आवक जावक सुरू असते. राज्यातील शेतकऱ्यांना फुलांच्या उत्पादनातून जवळ जवळ एक एकरा मागे 50 हजार रुपयांचा नफा या बाजारातून मिळतो.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment