परभणी जिल्ह्यात राहणारे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या शेतातील सोयाबीन पीक मुसळधार पावसामुळे वाहून गेले आहे. हवामानाचा अचूक अंदाज अन् भाकीत करणाऱ्या प्रसिद्ध पंजाबराव डख यांच नाव राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही नवीन नाही. पण सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने सगळीकडे हाहाकार माजविला असून त्याची झळ पंजाबराव डख यांना सुद्धा बसली आहे.
मुसळधार पावसामुळे शेतीतील सोयाबीन पीक गेल वाहून
पंजाबराव डख यांच्या गावात सध्या मागील काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. गावातील अतिवृष्टीमुळे डख यांच्या शेती मधील एकूण 6-7 एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक पूर्णतः खरडून गेल असल्याचं वृत्त आहे. परभणी जिल्ह्यात यंदा पावसाचा धुमाकूळ सुरू आहे या अती प्रमाणात होत असलेल्या पर्जन्यमान मुले त्यांच्या गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सेलू तालुक्यात वसलेल्या गुगळी धामणगाव येथील हवामान तज्ञ पंजाबराव डख हे सुद्धा याला अपवाद नाहीत.
ग्रामस्थांकडून नुकसानभरपाईची मागणी
या अतिवृष्टीमुळे मोठे परिसरातील अनेक शेतकरी बांधव यांचे सुद्धा अतोनात नुकसान झाले आहे. पंजाबराव डख यांचे सहा ते सात एकर सोयाबीन अतिवृष्टी मुळे शेतात पाणी वाहून पूर्णपणे वाहून गेले. परिणामी जिल्ह्यातील प्रशासकीय विभागाने या नुकसानीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करावेत तसेच यामुळे प्रभावित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हवामान विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागांना अती मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. पुढील 4 ते 5 दिवस या भागातील पाऊस ओसरणार नसल्याचं हवामान खात्याच्या अंदाजात म्हटल आहे.
विदर्भासह मराठवाड्यात जनजीवन विस्कळित
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं सर्वत्र एकच हैदोस घातला असल्यामुळे परभणी जिल्ह्यात सुद्धा याचा परिणाम दिसून मुसळधार पावसानं थैमान घातले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.या मुसळधार पावसामुळे विदर्भ अन् मराठवाड्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून नागरिकांचीही प्रचंड तारांबळ होत आहे. हवामान विभागानं आज देखील विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे नागरिकांनी पावसाचा जोर लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत.
पंजाबराव डख यांच्याविषयी थोडक्यात
राज्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील ( सेलू ) गुगळे/धामणगाव गावातील शेतकरी पुत्र आहेत. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाल्यामुळे मातीशी निगडित अशा वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. स्थानिक हवामानाचा अंदाज असणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची बाब असते. हवामानाचा आधीच अंदाज आल्यास पिकांचे होणारे नुकसान कमी प्रमाणात होऊ शकते. प्रत्येक पिकासाठी पोषक असे वातावरण लागते, अशा वातावरणात शेतकरी त्यांच्या शेतात इच्छित पीक घेऊन प्रचंड उत्पादन घेऊ शकतात.
अशा बहुसंख्य शेतकऱ्यांना महत्वाचे मार्गदर्शन देण्याचे काम पंजाबराव डख मागील बऱ्याच वर्षापासून करत आलेले आहेत. लहानपणापासून पावसाच्या अंदाजावर गावातील शेतकऱ्यांशी हवामानावर चर्चा करायची त्यांना लहानपणापासूनच प्रचंड आवड होती. त्यांची निरीक्षणे ते स्वतः नोंद करायचे आणि बहुतांश वेळा त्यातून निघणारे हवामानाचे अंदाज हे अचूक असायचे. त्यांच्या या कृतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज मिळण्यास मदत व्हायची अन् भविष्यात होणाऱ्या शेतीच्या नुकसानापासून त्यांचा बचाव होत असे. यामुळे पंजाबराव डख अल्पावधीतच पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध झाले. नंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव एक हवामान शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले.
पंजाबराव डख यांची हवामान भकीताची पद्धत
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे हवामानाचा अंदाज सांगत असताना पुढील पंधरा दिवसांचा हवामान अंदाज देतात. तसेच ते शेतकऱ्यांना त्यांच्या आगामी शेतीविषयक कामासाठी पावसाच्या अंदाजानुसार नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या हवामान अंदाज मध्ये महाराष्ट्र मधील कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पर्जन्यमान होईल तसेच कोणत्या भागात कशा प्रकारचे वातावरण असेल याबाबत अभ्यासपूर्ण पद्धतीने संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंट्स वरून राज्यातील शेतकऱ्यांना पुरविली जाते.
पावसाचा पोळा सणावर परिणाम
या मुसळधार पर्जन्यमुळे घराबाहेर निघणे सुद्धा शक्य होत नसून वातावरणात प्रचंड गारवा आहे. अशातच आज पोळा सण असून या पावसाच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात विरजण पडल्याचे चित्र आहे. पोळा बैलपोळा सण हा शेतकऱ्यांसाठी असलेल्या महत्वाच्या सनांपैकी एक आहे. या दिवशी बैलांना सजवून त्यांची गावातून मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली जाते. या दिवशी बळीराजाच्या लाडक्या सर्जा राजाची पूजा करून त्यांना गोडधोड पंच पक्वान्न खाऊ घालतात. पण अशा या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मिरवणुकीत व्यत्यय येत असल्यामुळे आनंदात थोडी कमी आली असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे