रेशन कार्ड बद्दल तुम्हाला माहीत नसलेली माहिती
सध्या सगळीकडे लाडकी बहिण योजनेची चर्चा तसेच कागदपत्रांची जमवाजमव अन् अर्ज भरण्याची गडबड सुरू आहे. या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी राज्य शासनाने काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायचे सांगितले आहे. त्यापैकी सर्वात आवश्यक कागदांपैकी एक म्हणजे राशन कार्ड.
राशन कार्ड धारकांना दर महिन्याला शासनाकडून धान्य पुरवठा करण्यात येतो. इतकेच काय तर दवाखान्यात महात्मा फुले योजना, आयुष्मान भारत योजना यांच्या लाभासाठी राशन कार्ड चा वापर होतो. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढील 5 वर्ष जवळपास 70 कोटीच्या वर संख्या असलेल्या राशन कार्ड धारकांसाठी धान्य पुरवठा मोफत केला आहे. मध्यंतरी कोरोना काळात सुद्धा राशन कार्ड धारकांना सतत 2 वर्ष माणशी 5 किलो धान्य मुफ्त देण्यात आले होते.
केंद्र किंवा राज्य शासनाची कुठलीही योजना असो, राशन कार्ड असणे बऱ्याच योजनांसाठी महत्वाचा निकष म्हणून पूर्तता करण्यास अतिशय महत्वाचा दस्तावेज म्हणून कामाला येते. राशन कार्ड धारकांना अनेकानेक लाभ मिळत असतात. राशन कार्ड हे आधार कार्ड प्रमाणेच अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे.

राशन कार्ड इतक्या प्रकारचे असतात.
पिवळे राशन कार्ड
रेशन कार्ड तीन स्तरावरील कुटुंबासाठी सरकारकडून देण्यात येते. पहिले म्हणजे पिवळे राशन कार्ड. राज्यातील जे लोक दारिद्र्य रेषेखाली (BPL-Below Poverty Line) येतात म्हणजेच ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न १५ हजार पेक्षा कमी असते अशा कुटुंबांना सरकार पिवळे राशन कार्ड देत असते. पिवळे राशन कार्ड असल्यामुळे राज्य तसेच केंद्र शासनाच्या सर्वाधिक योजनांचा लाभ अशा राशन कार्ड धारकांना नेहमीच होत असतो.
केशरी रेशन कार्ड
राशन कार्ड चा दुसरा प्रकार म्हणजे केशरी रेशन कार्ड. साधारण भाषेत सांगायचे झाल्यास राज्यातील मध्यमवर्गीय कुटुंबांना केशरी राशन कार्ड प्रदान करण्यात येते. जे लोक दारिद्र्य रेषेच्या शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आर्थिक दृष्ट्या वर असतात, अशा सर्व लोकांसाठी म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या वर (APL -Above Poverty Line) असतात, अशा कुटुंबांना केशरी राशन कार्ड मिळते. म्हणजे ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न १५ हजार पेक्षा जास्त आणि एक लाख रुपयांपेक्षा कमी असते असे सर्व कुटुंब केशरी राशन कार्ड च्या लाभासाठी पात्र असतात.
पांढरे रेशन कार्ड
राशन कार्ड चा तिसरा आणि अंतिम प्रकार म्हणजे पांढरे राशन कार्ड. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्व कुटुंबांना सरकार पांढरे राशन कार्ड देत असते. अशी लोक बाकी 2 प्रकार पेक्षा (एपीएल आणि बिपिएल) आर्थिक दृष्ट्या सधन असतात.
अंत्योदय रेशन कार्ड
या व्यतिरिक्त अंत्योदय राशन कार्ड सुद्धा असते. अगदीच गरीब कुटुंबांना सरकार महिन्याला 35 किलो धान्य एकदम कमी भावात पुरवत असते. आर्थिक दृष्ट्या अतिशय कमजोर असलेली ही कुटुंबे असतात. अशा प्रकारचे राशन कार्ड बनवणे शक्यतो शक्य होत नाही. दर दहा वर्षांनी आर्थिक जनगणना होत असते त्यानुसार अंत्योदय राशन कार्ड धारकांची शासनाने ठरविलेल्या निकषानुसार पात्रता ठरत असते.
या लोकांना रेशन कार्ड बनवता येत नाही.
ज्यांच्या नावावर 100 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन किंवा प्लॉट किंवा फ्लॅट आणि घर अशी संपत्ती असते, असे नागरिक सुद्धा राशन कार्ड साठी अर्ज करू शकत नाहीत.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहन, जसे की कार, ट्रक, जेसीबी इत्यादी वाहने असतत अशा नागरिकांना सुद्धा राशन कार्ड साठी अपात्र ठरविण्यात येते.
इन्कम टॅक्स भरणारे लोक राशन कार्ड साठी अपात्र असतात.
ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे असे लोकही राशन कार्ड साठी अर्ज करू शकत नाहीत.
ज्यांच्या घरात फ्रीज आणि एसी ही सुखसोयीनी युक्त अशी उपकरणे असतात, असे नागरिक देखील राशन कार्ड साठी अर्ज करण्यास पात्र नसतात. (सध्या वरील उपकरणे ही सामान्य उपकरणं श्रेणीत येतात म्हणून हा नियम शक्यतो शिथिल समजावा.)
ज्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकरीत असेल तर अशा कुटुंबाला राशन कार्ड चा लाभ घेता येत नाही.
ग्रामीण भागातील ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असते आणि शहरी भागात तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असते असे सर्व परिवार राशन कार्ड लाभासाठी अपात्र ठरतात.
👉 हे सुद्धा वाचा
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कार्यान्वित, या शेतकऱ्यांना मिळणार 5 वर्ष वीज मोफत
नवीन रेशन कार्ड काढण्याची प्रक्रिया
आपल्याकडे राशन कार्ड नसेल आणि आपण शासनाने राशन कार्ड साठी निर्गमित केलेल्या अटी शर्तींचे पालन पात्रता असेल तर आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने राशन कार्ड साठी अर्ज दाखल करता येतो.
ऑनलाईन पद्धतीने राशन कार्ड काढण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयात जाऊन राशन कार्ड विभागात असलेल्या सेतू कार्यालयात जाऊन त्यासाठी लागणारी कागदपत्रे अर्जाला जोडून अर्ज करता येऊ शकतो.
ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढण्यासाठी राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ
www.rcms.mahafood.gov.in
या वेबसाईट वर आपण नवीन राशन कार्ड साठी अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारल्या गेल्या नंतर फक्त एकदा तालुका किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे व्हेरिफिकेशन साठी जावे लागेल. एकदा तुमची पडताळणी झाली की तुम्हाला नवीन राशन कार्ड मिळेल.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
१) कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
२) रहिवासी प्रमाणपत्र (लाईट बिल किंवा सातबारा उतारा)
३)उत्पन्न प्रमाणपत्र
४)१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र आणि चलन भरणे अगत्याचे राहील.
रेशन कार्ड होणार डिजिटल
राज्यातील राशन धारकांना आता डिजिटल राशन कार्ड मिळणार असून हे डिजिटल राशन कार्ड आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्रमाणेच असणार आहे. पण यावर कुटुंबातील मुख्य व्यक्ती म्हणून घरातील प्रमुख पुरुष ऐवजी महिलेचे नाव येणार आहे आणि सोबतच राशन कार्ड चा क्रमांक यावर असणार आहे.
राशन कार्ड धारकांनी दर महिन्याचे राशन वितरण ऑनलाईन कसे चेक करावे?
आपण दर महिन्याला न चुकता राशन दुकानात जाऊन आपल्याला मिळणारे धान्य घेऊन येत असतो. परंतु बरेचसे राशन दुकानदार जेवढे धान्य आपल्या राशन कार्ड नुसार मिळायला पाहिजे तेवढे देत नाहीत. राज्यातील बऱ्याच खेड्यात तर ग्राहकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ऑनलाईन पावती सुद्धा दिल्या जात नाही. अशा परिस्थिती मध्ये रेशन दुकानदार आपल्याला फसवत तर नाही ना ? याची पडताळणी करणे आवश्यक असते. तुम्ही दर महिन्याला कोणत्या दिवशी किती राशन आणले याचा संपूर्ण तपशील आपल्याला ऑनलाईन कळू शकतो. तसेच आपल्या राशन कार्ड वर किती राशन मिळते याबद्दल सुद्धा ऑनलाईन पोर्टलवर इत्यंभूत माहिती उपलब्ध असते. परंतु अजूनही बऱ्याच राशन कार्ड धारकांना याबद्दल माहिती नाही.
ऑनलाईन रेशन कार्ड चेक करण्याची वे वेबसाईट
महाराष्ट्र सरकारचे राशन कार्ड चे अधिकृत संकेतस्थळ पुढील प्रमाणे आहे
https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp किंवा
https://mahaepos.gov.in/
किंवा आपण गूगल वर जाऊन फक्त Aepds maharashtra एवढं जरी टाकलं तरी सदर वेबसाईट एक नंबर वर दिसते. या संकेतस्थळावर आपल्याला अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी RC Details वर क्लिक करावे. त्यानंतर वेबसाईट चे नवीन पेज उघडेल. त्यावर RC नंबर म्हणजेच आपल्या राशन कार्ड वर कोणत्या महिन्यात किती धान्य वितरीत झाले याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल.
रेशन कार्ड बद्दल अत्यंत महत्वाची अन् कामाची माहिती
१) महाराष्ट्र राज्यातील कुठ्ल्याही रेशन कार्ड धारक व्यक्तीला राज्यातील कोणत्याही गावी/ शहरात राशन कार्ड वरील धान्य मिळेल. राज्यातील कोणताही राशन दुकानदार अशा प्रकारे दुसऱ्या शहरातील/गावातील रेशन कार्ड धारकांना धान्य नाकारू शकत नाही.
२) रेशन कार्ड वर धान्य वितरीत केल्यावर त्याची पावती देणे सर्वच राशन दुकानदारांना बंधनकारक आहे. पावती देण्याचे रेशन दुकानदार नाकारू शकत नाही. असे केल्यास संबंधित राशन दुकानदाराची तक्रार करता येऊ शकते.
३) रेशन कार्ड रद्द करायचा, त्यात काही बदल करायचा, किंवा राशन कार्ड स्वतः कडे ठेवायचा अधिकार राशन दुकानदाराला नाही.
४) साप्ताहिक सुटी व्यतिरिक्त इतर कुठल्याही दिवशी रेशन दुकानदाराला सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास राशन दुकान उघडे ठेवणे अनिवार्य आहे.
५ )प्रत्येक रेशन दुकानात स्पष्टपणे वाचता येईल असा फलक असणे अनिवार्य आहे त्या फलकावर दुकानाचा क्रमांक, मोबाइल नंबर, कार्यालयाचा पत्ता आणि दुकानाची वेळ असणे आवश्यक आहे.
रेशन दुकानदाराची तक्रार कोठे करावी?
जर तुम्हाला एखादा राशन दुकानदार योग्य प्रमाणात राशन वर मिळणारे धान्य देत नसेल किंवा तुमच्या इतर काही तक्रारी असतील तर त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तक्रार करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या अधिकृत वेबसाईटची लिंक पुढील प्रमाणे आहे.
https://mahafood.gov.in
या संकेस्थळावर जाऊन आपण संबंधित राशन दुकानदारांची तक्रार करू शकता. किंवा महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टल वर जाऊन सुद्धा आपण अन्न व नागरी पुरवठा विभाग अस निवडून राशन दुकानदारांची तक्रार करता येईल.