पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात येत आहे. “महागणेशोत्सव” हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत असून, या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पारितोषिकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६: अर्ज करण्याची अंतिम तारीख
या स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२६ आहे. इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा. अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
पारितोषिकांची रचना
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्तरावर प्रथम पारितोषिक ७.५ लाख रुपये, द्वितीय ५ लाख रुपये आणि तृतीय २.५ लाख रुपये इतके आहे. जिल्हा स्तरावर प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार आणि तृतीय ३० हजार रुपये पारितोषिक देण्यात येईल. तालुका स्तरावर २५ हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाईल.
निवडीचे निकष
स्पर्धेत पर्यावरणपूरक व पारंपरिक गणेशोत्सव साजरा करणे, सामाजिक उपक्रम, जनजागृती व सांस्कृतिक कार्यक्रम, मंडप व सजावटीची सर्जनशीलता व सौंदर्य, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थापन, डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर तसेच नियमांचे पालन व शिस्तबद्ध आयोजन या निकषांवर मूल्यांकन केले जाईल.
अर्ज प्रक्रिया
अर्ज पूर्णपणे ऑनलाइन आहे. संकेतस्थळावर जाऊन मागितलेली माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सादर केल्यानंतर ईमेल किंवा एसएमएसद्वारे पुष्टी मिळेल. गणेशोत्सव स्पर्धा अर्जासोबत घरगुती गणपती व सार्वजनिक गणपतीची छायाचित्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
आवाहन
आपला सहभाग महाराष्ट्राचा अभिमान आहे. गणेशोत्सवाची परंपरा जपून संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. लवकरात लवकर अर्ज करून ही संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026; विविध जिल्ह्यातील मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन
विविध जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सन 2026 च्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष गजानन गुरव यांनी केले आहे.
तालुका ते राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 17 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून तालुका, जिल्हा तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे.
त्यामुळे केवळ गणेशमूर्तीची सजावट किंवा देखावा यापुरतीच स्पर्धा मर्यादित राहणार नसून मंडळ वर्षभर किंवा गणेशोत्सवाच्या कालावधीत राबवत असलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपक्रमांनाही महत्त्व दिले जाणार आहे.
सांस्कृतिक उपक्रमांपासून सामाजिक कार्यापर्यंत विविध निकष
स्पर्धेतील मंडळांच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना पारंपरिक कला, गायन, वादन, नृत्य, नाट्य आणि लोककलेचे सादरीकरण यांचा विचार केला जाणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित प्रदर्शन, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम यांनाही महत्त्व दिले जाणार आहे.
वन, निसर्ग, गडकिल्ले तसेच राष्ट्रीय आणि राज्य स्मारकांचा प्रचार-प्रसार करणारे उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचीही दखल घेतली जाणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी मंडळाने राबविलेल्या उपक्रमांचाही मूल्यांकनात समावेश आहे.
आरोग्य, शिक्षण, शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानालाही महत्त्व
गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कृषी, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक जनजागृतीशी संबंधित उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना या स्पर्धेत आपली कामगिरी मांडता येणार आहे. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी संदेश देणाऱ्या मंडळांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.
याशिवाय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावट, ध्वनी, वायू आणि जलप्रदूषणविरहित परिसर, स्वच्छता तसेच गणेशभक्तांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आणि इतर आवश्यक प्राथमिक सुविधांची व्यवस्था यांचाही विचार केला जाणार आहे.
‘एक गाव एक गणपती’सारख्या विधायक उपक्रमांचीही दखल
सामाजिक एकोपा आणि विधायक उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या मंडळांनाही या स्पर्धेत विशेष संधी आहे. ‘एक गाव एक गणपती’सारखे उपक्रम, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि नागरिकांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा मूल्यांकन प्रक्रियेत विचार केला जाणार आहे.
मंडळाच्या कार्यकारिणीत महिलांचा सहभाग आहे का, याचीही नोंद घेतली जाणार असल्याने गणेशोत्सव आयोजनात महिलांना दिलेले स्थानदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
नोंदणीकृत आणि परवानाधारक मंडळांनाच सहभाग
या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नोंदणीकृत अथवा परवानाधारक असणे आवश्यक आहे. सहभागी होणाऱ्या मंडळांनी आपल्या विविध उपक्रमांची योग्य नोंद ठेवावी. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, छायाचित्रे आणि व्हिडिओ व्यवस्थित उपलब्ध ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यातील शहर, गाव, वाड्या, वस्त्या, प्रभाग, ग्रामपंचायत क्षेत्र तसेच दुर्गम भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत स्पर्धेची माहिती पोहोचविण्यासाठी स्थानिक प्रशासनामार्फत व्यापक प्रसिद्धी आणि जनजागृती करण्यात येत आहे.
गणेशोत्सवातून समाजोपयोगी कार्याला चालना
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे व्यासपीठ बनावे, हा या स्पर्धेचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी होऊन आपल्या विधायक कामाची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
माहितीचा अधिकृत स्रोत: जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर

मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
