शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हटल जातं. पण सध्याच्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांच्या शेती उत्पन्नाचा काही भरवसा राहिला नाही. त्यामुळेच अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना आपण सर्वांनी पाहिले आहे. पण आज आपण संकटांवर मात करून जिद्दीने अन् मेहनतीने डाळिंब शेतीतून करोडपती झालेल्या शेतकरी बांधव नितीन गायके यांची यशोगाथा थोडक्यात बघणार आहोत.
कन्नड येथील साडेतीन एकर क्षेत्रात तब्बल ६४ लाख रुपयांचे डाळिंबाचे उत्पन्न घेऊन तालुक्यात विक्रम करणाऱ्या अंधानेर येथील नितीन गायके यांच्या शेतात जाऊन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह पोलिस, कृषी विभाग, नगर परिषदेमधील अधिकाऱ्यांनी या फळबागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
कन्नड चा शेतकरी झाला लोकप्रिय
कन्नड येथील अंधानेर गावातील शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. फक्त साडेतीन एकर क्षेत्रात तब्बल ६४ लाख रुपयांचे डाळिंबाचे विक्रमी उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे एक प्रेरणास्रोत निर्माण करणाऱ्या कन्नड तालुक्यात विक्रम करणाऱ्या अंधानेर येथील नितीन गायके यांनी शेतीतून आता पर्यंत करोडो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. यंदाच्या सीझन मध्ये या यशस्वी शेतकऱ्याने फक्त साडेतीन एकर शेतीत तब्बल 64 लाख रुपयांची विक्रमी डाळिंब शेती केली आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह पोलिस, कृषी विभाग, नगर परिषदेमधील अशा विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या फळबागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. यावेळी अंधानेर येथील नितीन गायके यांच्या शेतात जाऊन अधिकाऱ्यांनी डाळिंब फळाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक ऊपस्थित होते.
गायके यांनी पदवी संपादन केलेली आहे. त्यांनी नोकरीचा मार्ग न स्वीकारता शेती करायचं ठरवलं अन् स्वतःच्या बुद्धीचातूर्य आणि मेहनतीच्या जोरावर लाखो रुपयाचं विक्रमी उत्पन्न ते त्यांच्या साडे तीन एकर शेतीतून घेत आहेत.
सुरू केली डाळिंबाची लागवड
नितीन गायके यांनी आपल्या शेतात भगवा वाणाच्या डाळिंबाची लागवड केली आहे. इतकेच काय तर महाराष्ट्राच्या अनेक भागांतून अनेक व्यापारी १६२ रुपये प्रतिकिलो दराने त्यांच्या शेतात येऊन डाळिंब खरेदी करीत आहेत. गायके गेल्या 5 वर्षांपासून शेतीतून भरघोस उत्पन्न घेऊन करोडपती झालेले आहेत. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायची जिद्द असलेला हा शेतकरी आज आपल्या कर्तुत्व अन् मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान बनला आहे. गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षाला ते चाळीस ते पन्नास लाखांचे उत्पन्न या डाळींब बागेतून घेत आलेले आहेत.
खुद्द तहसीलदार साहेब भेटीला आले
त्यांची यशोगाथा संपूर्ण तालुक्यात प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचली असून ८ ऑगस्ट रोजी त्यांच्या शेतात येऊन तहसीलदार विद्याचरण कडवकर साहेब, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक साहेब, न.प.चे मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे साहेब, पोलिस उपाधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड साहेब, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या फळबागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रगतशील शेतकरी तेजराव बारगळ, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
“या” शेतकऱ्याने सुद्धा डाळिंब शेतीतून घेतले चक्क 51 लाखाचे उत्पन्न
महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आता मागे राहिले नाहीत. परदेशी तंत्रज्ञान असो की मेहनत असो, राज्यातील शेतकरी सुद्धा आता कुठल्याच कामात मागे नाहीत. याचे अनेक उदाहरणे आपल्याला दिसत आहेत.
काहीतरी वेगळं करुन दाखवलं अन् यश प्राप्त केलं
पारंपरिक शेती करून नेहमी येणारी उदासीनता आणि तटपुंजे उत्पन्न यातून आधुनिक शेतीच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न अनेक शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत. गत काही वर्षांपासून देशातील पीक पद्धतीत फार मोठा बदल झालेला आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत फळ पीक लागवडीला प्राधान्य दिलेले आहे. राज्यात सुद्धा फळबाग लागवड करून आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेले अनेक शेतकरी आहेत. त्यापैकी एक नाव असलेले अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील डाळिंब लागवडीतून चांगलीच आर्थिक प्रगती केली आहे. या शेतकऱ्याकडे फक्त चार एकर शेती आहे. त्यातून डाळींब लागवड करून त्यांनी 51 लाख रुपयांची भक्कम कमाई करून दाखवण्याची किमया केली आहे. सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण पंचक्रोशीत जिकडे तिकडे मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
अहमदनगर जिल्हा यशस्वी शेतकऱ्यांचा जिल्हा
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक छोटंसं गाव आहे. गावाचं नाव हंगेवाडी. याच गावातील संतोष रायकर यांनी ही गोष्ट आहे. संतोष यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे फक्त चारच एकर शेती आहे. या शेतीतून रायकर कुटुंब आधी वर्षानुवर्षे फार पूर्वीपासून पारंपारिक पिकांची शेती करत होते. शेतात राब राब राबत होते. पण त्यांच्या पदरी निराशाच येत होती. निसर्गाच्या लहरीपणामुळे म्हणा अन् पारंपरिक शेतीच्या जुन्या पद्धतीमुळे म्हणा, त्यांना शेतीतील उत्पन्नातून स्वतःचे घर चालवणे सुद्धा दुष्कर झाले होते. काहीतरी नवीन शोधलं पाहिजे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन संतोष रायकर यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा मोठा आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला आणि डाळिंब लागवड सुरू केली.
अशी केली डाळिंब फळबागेची मशागत
डाळिंब लागवडीनंतर त्यांनी झाडांची चांगली काळजी घेतली. नवीन तंत्रज्ञान वापरून तज्ञांच्या सल्ल्याने वेळोवेळी त्यांच्या फळबागेत औषध फवारणी केली आणि पिकांना खतांचा योग्य प्रमाणात डोस दिला. मेहनत करणाऱ्याची कधीच हार होत नसते. त्यांची मेहनत फळास आली अन् त्यांच्या डाळिंब बागेत मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची मोठमोठी फळे फुलली. मग काय, त्यांचे नशीब पालटले. त्यांना चार एकर जमिनीत लागवड केलेल्या डाळिंब पिकातून चांगले भरघोस उत्पादन मिळाले. त्यांच्या डाळिंबाच्या बागेतून त्यांनी तब्बल 51 लाख रुपयांची कमाई करून यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या पैशातून त्यांनी त्यांच्या हक्काच्या टोलेजंग घराचे स्वप्न सुद्धा साकार केले आहे.
डाळिंबाच्या पैशांतून साकारले टोलेजंग बंगल्याचे स्वप्न
संतोष रायकर यांनी त्यांच्या गावात टोलेजंग घर बांधले असून हे सर्व डाळिंब बागेमुळे शक्य झाले असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आपल्या बंगल्याच्या भिंतीवर मोठ्या आकाराची डाळिंबाच्या झाडाची प्रतिमा देखील निर्माण केली आहे. रायकर यांच्या डाळिंबाच्या शेतीची तर सर्वत्र चर्चा होत आहे एका मेहनती शेतकऱ्याने कर्तुत्वाने एवढं यश मिळवून अनेकांचे डोळे विस्फारले असून भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी यशाचा एक पायंडा घालून दिला आहे. त्यांनी स्वकष्टाने बांधलेल्या बंगल्याची देखील परिसरात खूपच चर्चा होताना दिसून येत आहे.
आज राज्यात अनेक शेतकरी शेतीतून उत्पन्न मिळत नाही असे म्हणतात मात्र काहीतरी नवीन प्रयोग करण्याचं धाडस मात्र दाखवत नाही. लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, क्षेत्र कुठलही असो, आजपर्यंत यशस्वी तेच लोक झाले आहेत, ज्यांनी वेगळा पर्याय निवडला आहे. जे आपल्या पूर्वजांनी केलं तेच आपण करायचं म्हटल्यावर आपल्याला भरघोस यश मिळेल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. आज यांत्रिकीकरणाचा या युगात अनेकानेक प्रगत तंत्रज्ञानात भर पडत चालली आहे. आपल्याला आपली शेती यशस्वी करायची असेल, शेतीतून विक्रमी उत्पन्न घ्यायचे असेल तर आपल्याला या शेतीच्या नवीन पद्धतींचा, शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला नको का? तुम्हीच विचार करा.