विदर्भातील शेतकरी बांधव आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस पीक घेत असतात. परंतु ऐनवेळी कपाशी पिकावर विविध रोग येऊन त्यांचे उत्पादन खूप कमी होऊन शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशाच पडते. त्यामूळे कापूस पिकावर आलेल्या विविध रोगांना वेळीच प्रतिबंध घालणे खूप आवश्यक असते. कपाशी पिकांवर येणाऱ्या विविध रोगांची उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल याबद्दल आपण या लेखातून महत्वाची माहिती पाहणार आहोत.
1) कपाशी झाडाची होणारी पाते, फुले आणि बोंडे यांची गळ
आजचे पर्यावरण स्थिर राहिले नाही याची आपल्याला कल्पना आहेच. अशा हवामानातील अस्थिर बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते परिणामी कपाशी शेतीतील उत्पादनात मोठी घसरण दिसून येते.
कपाशीची पाते, फुले, बोंडे यांची गळती थांबविण्यासाठी उपाययोजना
- नॅपथालिन ऍसिटिक ऍसिड (एन. ए. ए.) म्हणजेच प्लॅनोफिक्स या संजीवकाची हेक्टरी १०० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून पाते लागताना पहिली व त्यानंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी केली असता शेतकऱ्यांच्या कपाशी उत्पादनात सुमारे १०% वाढ अपेक्षित असते.
2) कपाशीतील कायीक वाढ कशामुळे होते?
भारी शेतजमिनीत जर रासायनिक खतांचा आणि पाण्याचा वापर जास्त केला तर बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायीक वाढ मोठ्या प्रमाणावर होते, त्यामुळे पराटी झाडाला बोंडे लागण्याचे प्रमाण खूपच कमी होते तसेच बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याची शक्यता वाढते.
कपाशी पिकाची कायिक वाढ थांबविण्यासाठी उपाययोजना
- कपाशीचे पीक ८० ते ९० दिवसाचे झाल्यावर कपाशी झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा खुडणे फायद्याचे ठरते.
- असे केल्यास कपाशी पिकाची कायीक वाढ मर्यादित राऊन सर्व बोंडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते.
- वरील उपाय केल्याने कपाशी पिकात हवा खेळती राहते, बोंडे सडत नाहीत आणि कीड अन् अन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा अत्यल्प प्रमाणात होतो.
- कपाशीच्या शेतात पावसाचे पाणी साचून राहिल्यास मागील काही दिवसात झालेल्या पावसाचे एकंदर स्वरुप व प्रमाण पाहता पाऊस झालेल्या भागातील जमिनिवर बऱ्याच काळापर्यंत पाणी साचून राहिल्याचे दिसून येते आहे. अशा परिस्थितीत कपाशीच्या शेतामध्ये बराच काळ पाणी साचून राहिल्यास कपाशी झाडावर विपरीत परीणाम होतात.
- झाडास फूलपाती लागलेली असल्यास ती गळून पडते. त्यामुळे झाडांची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते. शेतात भरपूर पाणी साचल्यामुळे प्रकाश संश्लेषण कमी होऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते परिणामी झाडे सुकण्यास कारणीभूत ठरते.. मुळांना योग्य प्रमाणात हवा मिळत नाही. त्यामूळे झाडे सुकू शकतात तसेच पात्या फुलांची गळ होऊ शकते. यावर शेतकरी बांधवांनी त्वरीत पुढील उपाययोजना करणे गरजेचे असते.
- पिकांवरुन पुराचे पाणी वाहून गेल्याचे निदर्शनास येताच वापसा येताच झुकलेली झाडे झुकलेल्या बाजूकडून मातीचा भर देऊन सरळ करावी.
- अशावेळी शेतातील साचलेले पाणी फावड्याने चर काढून तातडीने शेताबाहेर काढून टाकावे. खोल भागातील पाण्याला वाट करुन द्यावी.
यावर्षी आपल्या आवडत्या सर्जा राजाचा पोळा सण असा करा साजरा
- शेतात पाणी साचलेल्या जागेवर झाडाची पाने पिवळी पडण्याचे प्रमाण मोठे असते. त्यावर २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया + १० लिटर पाणी) ची तातडीने फवारणी करणे फायदेशीर असते.
- वापसा येताच झाडाभोवती उकरी करुन प्रत्येक झाडाला शिफारसीत नत्राची मात्रा युरिया
खताची देण्यात यावी. खत देतांना ते पुर्णतः मातीत मिसळेल याची काळजी घ्यावी. तसेच प्रती हेक्टर ५५ किलो युरीया खताची मात्रा द्यावी. झाडाचे खोड सैल झाले असल्यास खोडाभोवती माती दाबून भर देणे आवश्यक असते, जेणेकरुन झाड वाकू नये किंवा तुटू नये. वापसा येता बरोबर डवरणी व खुरपणी करून घ्यावी. पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असल्यास आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी त्वरित करावी. - कपाशीची झाडे सुकत असल्यास झाडाभोवती उकरी करुन कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम + युरीया १५० ग्रॅम + म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून द्रावण झाडाच्या खोडावरून जमिनीत टाकणे हा एक महत्वाचा उपाय आहे.
शेतकऱ्यांना मिळणार पुढील 5 वर्ष मोफत वीज, सरकारची नविन योजना
3) कपाशीवर पडणारा लाल्या रोग
लाल्या हा रोग नसून एक प्रकारची विकृती आहे. नत्राची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता आणि रस शोषणाऱ्या किडींचा (तुडतुडे) प्रादुर्भाव, बोंडाची वाढ होण्याच्या अवस्थेत कपाशी पानातील हरितद्रव्यातील नत्राचा वापर इत्यादी कारणांमुळे कपाशीची पाने लाल होतात. त्यामुळेच या रोगाला लाल्या हे नाव पडले.
कपाशीवर लाल्या रोग पडला हे कसे ओळखावे?
ज्यावेळी हिवाळ्यात रात्रीचे तापमान २१ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी झाले तर पाने पुन्हा लाल होण्यास प्रारंभ होतो. कपाशीची पाने लाल होण्याचे कारण जाणून घेण्यासाठी, आपल्या तळहातावर लाल पाने ठेवा आणि मुठ बंद करा आणि नंतर मुठ सोडा. जर पानांचे लहान तुकडे पडल्यास पिकामध्ये तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव झाला आहे हे लक्षात येते. अशावेळी लाल्या रोगाचे वेळेत नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते.
लाल्या रोगावरील उपाययोजना आणि नियंत्रण
फळ धारणेच्या काळात जमिनीचे उच्च तापमान टाळण्यासाठी शिफारस केलेल्या वेळेत पेरणी करा. कपाशी लागवड करताना लागवडीचे अंतर योग्य ठेवायला पाहिजे. अजैविक तणास प्रतिकार करणारे कपाशीचे वाण लावले असता फायदेशीर ठरते. जमिनीला योग्य प्रमाणात मुबलक शेणखत द्यावे.
- बीटी वाणांसाठी शिफारशीत मात्रेपेक्षा २५% जास्त खते द्यावी म्हणजे फायदा होतो.
- तुमच्या कपाशी पिकाला मॅग्नेशियम सल्फेट, हेक्टरी २० ते ३० किलो जमिनीतून द्या म्हणजे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल तसेच रोगावर नियंत्रण राहणे सोप्पे होईल.
- कपाशी झाडाच्या वाढीच्या काळात २% (१० लिटर पाण्यात १०० ग्रॅम) डीएपी खताच्या १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करणे आवश्यक असते.