बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली असून त्यामुळे नवीन विहीर बांधायला किंवा शेतातील विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना आता जास्त काळजी करण्याची गरज भासणार नाही. या योजनेचे निकष विस्तारित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आधी सरकारकडून या योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान अपुरे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यासाठी आपल्या पदरचा पैसा लागत असे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात. समाजातील कुठलाही घटक आर्थिक दृष्ट्या दुर्बल राहू नये यासाठी सरकार नेहमीच कटिबद्ध असते. चला तर जाणून घेऊया बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ किती करण्यात आली आहे याची सविस्तर माहिती.
नवीन विहीर आणि विहीर दुरुस्ती अनुदानात भरघोस वाढ
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत याआधी नवीन विहीर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात यायचे त्यात आता तब्बल दीड लाख रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली असून आता या योजने अंतर्गत नवीन विहीर बांधकामासाठी एकूण 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच शेतीतील विहीर दुरुस्तीसाठी सुद्धा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली असून आधी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजाराचे अनुदान देण्यात यायचे मात्र आता यासाठी एक लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
इनवेल बोअरिंग आणि शेततळ्यासाठी सुद्धा अनुदानात वाढ
याशिवाय इनवेल बोअरिंग साठी अनुदानाची रक्कम 20 हजारावरून चक्क दुप्पट म्हणजे 40 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. अशाप्रकारे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ तर झालीच आहे, शिवाय आधी नवीन विहीर बांधकाम बाबत एक कठीण अट होती ज्यात शेतकऱ्यांना त्यांची विहीर 12 मीटर खोल खोदणे अनिवार्य होते. मात्र आता ही अट सुद्धा शिथिल करण्यात आली आहे. याशिवाय सदर योजने अंतर्गत लाभासाठी 2 सिंचन विहिरीमधील अंतर 500 फूट पेक्षा जास्त असणे अनिवार्य होते ही अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय जे शेतकरी आपल्या शेतात शेततळे उभारतात अशा शेतकऱ्यांना या योजनेतून आधी एक लखाचेच अनुदान देण्यात येत असे पण आता मात्र बिरसा शेततळे उभारणीसाठी सुद्धा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली असून ही वाढ शेतकऱ्यांना जेवढा खर्च शेततळ्यासाठी लागला त्याच्या 90 टक्के रक्कम किंवा 2 लक्ष रुपये यांपैकी जी किमान रक्कम असेल ती शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे.
तुषार सिंचन योजना अंतर्गत अनुदानाची रक्कम 27 हजरावरून 47 हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के अनुदान यापैकी जी कमी रक्कम असेल ती देण्यात येणार आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ ही ठिबक सिंचन साठी सुद्धा केली असून या अनुदानात आता 97 हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के रक्कम अल्प, अत्यल्प तसेच बहुभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत आता मिळणार बैलगाडी, ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अनुदान
दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णय अनुसार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत यंत्रसामुग्री आणि विंधन विहीर या दोन नवीन बाबीचा समावेश केला आहे. अनुसूचित जामातील शेतकऱ्यांना बैलचलित आणि ट्रॅक्टर चलित अवजारांची खरेदी आणि विंधन विहिरीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
शेतकरी मित्रांनो चला तर जाणून घेऊया काय आहे ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, काय आहेत या योजनेसाठी लागणारी पात्रता तसेच या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती या लेखात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.
👉 हे सुद्धा वाचा
भूमिहीन शेतमजूर लोकांना मिळत आहे 4 एकर शेत, जाणून घ्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती
शेतात नवीन विहीर बांधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा उद्देश काय आहे? :
ही कल्याणकारी योजना अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देणे यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत समाविष्ट असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत. टि.एस.पी. – ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली ओ.टि.एस.पी.- ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, सोलापुर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या एकूण ३० जिल्ह्यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते.
काय आहेत या योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष?
१. लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असावा.
२. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे.
३. नवीन विहिरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:चे नावे किमान ०.४० हेक्टर व नविन विहिर खोदणे ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबींसाठी किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे बंधनकारक आहे.
४. शेतकऱ्याच्या नावावर शेती असल्याचा ७/१२ दाखला आणि ८अ उतारा सुद्धा लागणार आहे. ( नगर पंचायत, नगरपालिका व महानगर पालिका क्षेत्राबाहेरील)
५. लाभार्थ्यांचे स्वत:चे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्ड सोबत संलग्न करणे अनिवार्य आहे.
६. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी असले पाहिजे.
७. ज्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १,५०,००० /- चे मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसिलदार यांचेकडून मागील वर्षाचा उत्पन्नाचा नवीनतम दाखला अर्जासोबत सादर करावा लागणार आहे.
८. लाभार्थी शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस सुद्धा लागेल.
काय आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे स्वरुप?
या योजनेसाठी घटकनिहाय आर्थिक मापदंड कोणते असणार आहेत?
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना खालील ९ बाबींवर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते.
१) नवीन विहिरी साठी अनुदान
नवीन विहीरीसाठी तसेच वीज जोडणी आकार खर्च, पाईप खर्च यासाठी विस्तारित निधीमध्ये एकूण 4 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
२) जुनी विहीर दुरुस्ती बाबत अनुदानाची रक्कम
शेतातील जुन्या विहीरीसाठी तसेच वीज जोडणी आकार खर्च, पाईप खर्च यासाठी विस्तारित निधीमध्ये एकूण 1 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
३) शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण साठी अनुदानाची रक्कम
अनुसूचित जमातीतील अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याच्या शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक, पंप संच, एचडीपीई / पीव्हीसी पाईप्स असे एकूण 5 लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्याकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ विहीत मर्यादेत पात्र शेतकऱ्यास देण्यात येणार आहे. वरील घटकांचा लाभ घेतल्यानंतरही जर लाभार्थ्याने ईनवेल बोअरींग व परसबाग या घटकांची मागणी केली तर अशा लाभार्थ्यास सदर घटकांचा अतिरिक्त लाभ सुद्धा सरकारकडून देण्यात येणार आहे.
४) सोलरपंपासाठी मिळणार एवढे अनुदान
जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंप संच व वीज
जोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत लाभार्थी हिश्श्याची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात येईल ही रक्कम आता 40 हजार असणार आहे.
बिरसा मुंडा योजनेची अंमलबजावणी कशी होणार?
सदर योजनेची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात
येणार आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची घटक अंमलबजावणी खालील प्रकारे होणार आहे.
1) नवीन विहीर अनुदानासाठी निकष आणि अटी
१) नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने यापूर्वी केंद्र / राज्य / जिल्हा परिषद अथवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून नवीन सिंचन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा. तसेच, यापुर्वी शासकीय योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहिलेल्या अपूर्ण विहीरीचे काम करण्यास या योजनेचा
लाभ घेता येणार नाही.
२) लाभार्थ्याच्या ७/१२ वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास या घटकाचा लाभ घेता येणार नाही.
३) भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरीष्ठ भूवैज्ञानिक यांचेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
2) जुनी विहीर दुरुस्ती साठी अर्ज करावयाचा असल्यास निकष आणि अटी
१) जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या ७/१२
वर विहिरीची नोंद असावी.
२) विहीर दुरुस्तीच्या कामास उच्चतम अनुदान मर्यादेपेक्षा (रु. ५०,०००/-) अधिक रक्कम लागल्यास ती रक्कम लाभार्थीने स्वतः उभी करावयाची आहे.
3) इनवेल बोअरींग साठी योजने अंतर्गत असलेले निकष
१) नवीन विहीर / जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने इनवेल बोअरींगची मागणी केल्यास रु.२०,०००/- च्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. इनवेल बोअरींगचे काम करताना खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार ठिकाणाची योग्यता (Feasibility Report) भुजल सर्वेक्षण यंत्रणेकडून घेऊन सादर करावे लागेल. पात्र लाभाधारकास बँक खात्यात DBT द्वारे विहीत अनुदान मर्यादेत अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
4) शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
(क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) योजनेचे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याने शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण या घटकाची मागणी केल्यास राष्ट्रीय फलोत्पादन
अभियानाच्या मार्गदर्शक सुचना व आर्थिक मापदंडानुसार प्रत्यक्ष खर्च किंवा २,००,०००रुपये यापेक्षा जी रक्कम कमी असेल त्या मर्यादेत अनुदान जमा करण्यात येणार आहे.
5) सोलर पंपसाठी मिळणार एवढे अनुदान : जर शेतकऱ्यास महावितरण कंपनी कडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर अशा शेतकऱ्यांना पंप संच आणि वीज जोडणी साठी लाभार्थी हिश्याची रककम सादर कंपनीला देण्यात येईल. ही रक्कम जास्तीत जास्त 40 हजार रुपये एवढी असणार आहे.
6) सुक्ष्म सिंचन संच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ( क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील ) या योजनेतून सुक्ष्मसिंचन या बाबीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथमतः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
प्रति थेंब अधिक पिक योजनेमधून लाभ घेणे अपेक्षित असून या योजनेमधून फक्त Top up साठी अनुदान देण्यात येईल.
7) पंपसंच ( डिझेल / विद्युत) पंपसंचाच्या लाभासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पंपसंच खरेदीकरिता कृषी अधिकारी (विघयो), पंचायत समिती यांची पूर्वसंमती घ्यावी.
सदर लाभार्थ्यांनी एक महिन्याच्या कालावधीत पंपसंचाची खरेदी करणे आवश्यक राहील अन्यथा संबंधीत शेतकऱ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम
संस्थांनी पंपसंचाची रितसर तपासणी (testing) करुन ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (standards) असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच पंपसंचाची
खरेदी लाभार्थी पूर्वसंमती मिळवायची आहे.
8) पाईप (पीव्हीसी / एचडीपीई ) : सिंचनासाठी मान्यताप्राप्त प्रकाराच्या आय.एस.आय. मार्क पाईपची खरेदी लाभार्थ्यांनी पूर्व संमतीने त्यांच्या पसंतीनुसार करावी. लाभार्थ्याकडे सिंचनासाठी
स्त्रोत उपलब्ध असल्याची खात्री करुन पाईपच्या किमतीच्या १०० टक्के किंवा उच्चतम रु. ३०००० रुपयांच्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील.
9) परसबाग : आदिवासी शेतकऱ्यांना कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला त्यांचे घराभोवतीच पिकविणे शक्य आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला उदा. भेंडी, गवार,
चवळी, दुधी भोपळा, डांगर भोपळा, शेवगा, काकडी, दोडका इ. बियाणांचे किट लाभार्थ्यांनी महाबीज / एनएससी इत्यादी बियाणे उत्पादक कंपनींच्या अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त रु. ५००/- पर्यंत लाभ देता येईल.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा असून या योजनेसाठी महा डीबीटी पोर्टलचे अधिकृत संकेतस्थळ https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अधिकच्या माहितीसाठी संपर्क कोठे करावा लागेल?
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना संबंधी अधिक माहिती प्राप्त करावयाची सदर इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे कृषी विभागात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल. संबंधित अधिकारी आपल्याला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेविषयी आवश्यक ती संपूर्ण माहिती देऊन आपल्या शंकांचे निरसन करतील.