सेंद्रिय शेती करून बचत गटाच्या महिलांनी केली आर्थिक उन्नती : आजच्या या ग्लोबल वॉर्मिगच्या काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे हे अनिश्चितता आणि धोकादायक असल्याचे चित्र दिसून येते मात्र अशाही परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील काही गावांमध्ये महिलांच्या बचतगटांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला. पण ही सुरुवात सोपी नव्हती. शेतीचे बहुतांश व्यवहार आणि निर्णय घरातले पुरुष घेत असल्याने महिलांनी सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. घरात आणि शेतीत दोन्हीकडे राबणाऱ्या कणखर आणि मेहनती महिलांनी हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. तोही अर्धी एकर जमीन ताब्यात घेऊन अन् त्यावर यशस्वी सेंद्रिय शेती करून दाखवत आपली कर्तबगारी सिद्ध केली. चला तर जाणून घेऊया या महिलांच्या जिद्दीची गोष्ट. आणि त्यांचे शेतीतील उत्पन्न याबद्दल सविस्तर माहिती.
या महिलेने केली सेंद्रीय शेती बाबत जागृती
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तहसीलमध्ये येणारे मुरली हे एक छोटेसे गाव. या गावात राहणाऱ्या ममता धुर्वे यांनी त्यांच्या गावात सेंद्रिय शेती करण्यास महिलांना प्रोत्साहित केले. मात्र आधी त्यांना त्यात खूप अडचणी आल्या. लोक सेंद्रिय शेती करण्यास धजवत नव्हते. ते प्रीती बेले यांना ही सेंद्रीय शेती फसली तर नुकसानभरपाई देणार का अशी विचारणा करायचे. मग ममता धुरवे यांनी बचत गटाच्या महिलांना समजावून सांगितले आणि आधी फक्त अर्धा एकर शेतात सेंद्रिय शेती करण्यास त्यांच्या कुटुंबीयांना राजी करायला लावले. बाई पुढे माणूस नमतो हे काही खोटं नाही. अशाप्रकारे बऱ्याच स्त्रियांनी अर्ध्या एकरात सेंद्रिय शेती सुरू करण्यास परवानगी मिळवली. अन् असा त्यांचा सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रवास सुरू झाला.
दुष्काळग्रस्त असलेल्या भागात फुलविली यशस्वी सेंद्रिय शेती
घाटंजी हा विदर्भातील दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तसेच हे उपजीविका प्रभावित क्षेत्र म्हणून सुद्धा प्रचलित आहे. इतकी प्रतिकुलता असताना सुद्धा निव्वळ महिलांच्या जिद्दीमुळे आज या भागात सेंद्रीय शेती यशस्वी होऊन येथील शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करताना दिसत आहे. या गावातील ममता धूरवे ही सामान्य कुटुंबातील मेहनती स्त्री पेटून उठली आणि आधी गावात अन् मग परिसरात यशस्वी सेंद्रीय शेती फुलवून अनेक महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबात हर्ष उल्हास घेऊन आली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आज ममता धुरवे या गावातील अन् परिसरातील सेंद्रिय शेती तज्ज्ञ म्हणून नावारूपाला आल्या आहेत. समदायातील लोंकाना त्यांची उपजीविका सुधारण्यासाठी मदत करणे, नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी त्यांच्यात सामूहिक परिश्रमाला प्रोत्साहन देणे याशिवाय निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे यांसारख्या जबाबदाऱ्या त्या निष्ठेने पार पाडत आहेत.
बळीराजा संतापला! भाड्याने ट्रॅक्टर आणून उद्ध्वस्त केलं स्वतःच्या शेतातील उभं कोथिंबीर पीक
महिला उठल्या आणि कष्टाने सेंद्रीय शेती यशस्वी करून दाखवली
जेव्हा काही महिला ममता धूर्वे यांच्या मार्गदर्शनाने अर्ध्या एकरात सेंद्रीय शेती करून भरघोस उत्पन्न मिळवू लागल्या तेव्हा त्यांनी अर्ध्या एकर वरून त्यांच्या संपूर्ण शेतात सेंद्रीय शेती करायचे ठरवले अन् मागील 5 वर्षात प्रचंड उत्पादन त्या दरवर्षी मिळवत आहेत. त्यांची कमाई तर भरघोस वाढलीच अन् विशेष म्हणजे सेंद्रीय शेती केल्यामुळे जमिनीचा दर्जा सुद्धा सुधारला. आज या गावातील महिला कापूस, तूर, सोयाबीन,मिरची यांच्यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. आणि आज या परिसरातील बचत गटाच्या अनेक महिला सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या औषधी आणि खते स्वतः तयार करतात. आणि दर आठवड्याला एक बैठक घेऊन त्यांची पुढील वाटचाल आणि कृत्या यांचा समन्वय साधतात.
शेताला रस्ता मिळवा फक्त 2 दिवसांत, भांडखोर शेजारी शेतकऱ्याला घडवा अद्दल
विविध संस्था आणि शासनाने केली मदत
मागील आठ वर्षांपासून गावातील सुमारे 20 महिला सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांबद्दल चर्चा करण्यासाठी नियमितपणे सभा घेत आहेत. महिलांनी रसायनमुक्त पद्धती वापरण्याचा निर्णय घेतल्यापासून या गावात सेंद्रीय शेती प्रणालीचा अवलंब केल्या जात आहे. 2016 मध्ये फाऊंडेशन फॉर इकोलॉजिकल सिक्युरिटी सारख्या अनेक स्वयंसेवी संस्था यवतमाळ जिल्ह्यात आल्या आणि सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले.
त्यांनी गावातील बचत गटाच्या महिलांना रसायनांवर अवलंबून राहणे आणि निविष्ठांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचे फायदे समजावून सांगितले. तसेच सेंद्रिय शेतीच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिकही दाखविले. ममता रामनाथ धुर्वे यांच्या आठवणी अनुसार प्रारंभीचा काळ होता तेव्हा गावातील पुरूष बहुतेक शेती करायचे. स्त्रिया गावातील अनेक सभांना सुद्धा जात नसत. मात्र आता परिस्थिती उलट आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 2 हजार महिला घेतात सेंद्रीय शेतीतून भरघोस उत्पादन
उमेद या संस्थेने दिलेल्या आकडेवारी अनुसार आज यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 2 हजार महिला घेतात सेंद्रीय शेतीतून भरघोस उत्पादन मिळवीत असून दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात सेंद्रीय शेतीच्या अवलंबातून प्रगती साधत आहेत. कोरडवाहू शेतीचे रूपांतर बागायती शेतीत करण्याचे आर्थिक सामर्थ्य हे सेंद्रीय शेती केल्यामुळे शक्य झाल्याचे येथील महिलांनी बोलून दाखवले.
सेंद्रिय शेती कमी खर्चिक आणि पर्यावरण अनुकूल
सुमारे तीन वर्षांनंतर येथील महिला शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. या अगोदर खते आणि कीटकनाशकांवर अवलंबून राहिल्याने त्यांचा शेतीवर होणारा खर्च खूप वाढला होता, ज्यासाठी अनेक शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागायचे. पीक हाती आले की बहुतेक नफा हा त्या कर्जाची परतफेड आणि पुढील शेतीसाठी खरेदी करण्यात जात असे. मात्र सेंद्रिय शेतीमुळे ही प्रथा नष्ट होऊन येथील शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला.
परिसरातील महिला वर्ग आता शेतीसोबतच गावातील इतर विकासकामांमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेत आहे. गावाभोवती आणि शेतात पायाभूत सुविधा निर्माण करून पाण्याची उपलब्धता सुधारण्याचा प्रयत्न सामूहिक मेहनतीने होताना दिसून येत आहे. हीच सेंद्रीय शेती आता काम शोधण्यासाठी घर सोडलेल्या गावकऱ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी नक्कीच उपलब्ध करून देईल असा ममता यांना दृढ विश्वास आहे. सेंद्रीय शेती ही राज्यातील शेतकऱ्यांना केवळ तारणहार नाही तर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आणि कमी खर्चिक असून सेंद्रीय शेतीकडे कूच करणे हा एक फायद्याचा सौदा आहे हे या बचत गटाच्या महिलांनी सिद्ध करून दाखविले आहे.