बैल पोळा आणि शेतकरी, बैल पोळा सणाचे महत्त्व

यावर्षी बळीराजाच्या आवडत्या सर्जा राजांचा सण बैल पोळा 2 सप्टेंबर रोजी असून ह सण शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक प्रमुख सण आहे. चला तर जाणून घेऊया वर्षभर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कार्यात इमाने इतबारे मदत करणाऱ्या बैलांच्या बैल पोळा सणाबद्दल संपूर्ण माहिती.

शेतकऱ्यांच्या आवडत्या सर्जा राजांचा सण बैल पोळा

बैल पोळा सणाच्या दिवशी शेतकरीवर्ग त्यांच्या गायी आणि बैलांची विशेष सेवा आणि पूजा करत असतात. पोळा हा सण महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड इत्यादी राज्यांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बैल पोळा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील (भादोन) अमावास्येच्या दिवशी साजरा केला जात असतो. इंग्रजी कॅलेंडर अनुसार बैल पोळा सण यंदा 2 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. आपल्या विदर्भात बैल पोळा सलग दोन दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस मोठा पोळा आणि दुसरा दिवस तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो.

गायी/ बैल शेतकऱ्यांसाठी भरभराटीचे प्रतीक

आपल्या देशात सुमारे 70 टक्के खेड्यातील भारतीय शेतकरी बैल आणि गायींच्या सहाय्याने शेती करतात हे खरे आहे. बैल सुद्धा आपल्या मालकाप्रती प्रामाणिक असतो. मालकाने सोपविलेले काम तो पूर्णत्वास नेत असतो. याच कारणामुळे या प्राण्यांना देवरुपी मानून वर्षातून अनेक वेळा त्यांची पूजा केली जाते. आपल्या राज्यात खेड्यांत आजही असंख्य घरांच्या दारात गायी-बैल इत्यादी पाळीव जनावरे आढळतात.

बैल पोळा सणाविषयी पौराणिक कथा

बैल पोळा सणाबद्दल एक पौराणिक कथा सुद्धा प्रचलित आहे. त्या कथेनुसार एकदा कंस द्वारे कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षसाला पाठवविण्यात आले होते. तेव्हा कृष्णाने त्या पोलासुर राक्षसाचा वध केला होता. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता.म्हणून या दिवशी बैल पोळा सण साजरा करण्यात येतो अशी आपल्या देशातील लोकांची धारणा आहे.

बळीराजाची आपल्या सर्जा राजांबद्दल आत्मीयता

विदर्भातील शेतकऱ्यांच्या अनुसार ज्या शेतकऱ्याच्या अंगणात जितके जास्त गायी आणि बैल दिसतात तो शेतकरी अधिक धनवान समजला जातो. शेतकऱ्यांसाठी गाई बैल हे केवळ प्राणी नसून त्यांचे स्थान घरातील एक सदस्य म्हणुनच आहे असेच सगळे सांगतात. नाशिकमध्ये द्राक्ष, डाळिंब, कांदा, मराठवाड्यात सोयाबीन-ज्वारी, नागपुरात संत्री किंवा बुलढाण्यात कापूस पिकवणारे मोठे उत्पादक शेतकरी अनेक ट्रॅक्टर असूनही गाई-बैलांना घराबाहेर बांधणे हा स्वतःसाठी एकप्रकारचा सन्मान समजतात. या गायी-बैलांमुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत, अशी प्रबळ धारणा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात कायम असते. हे प्राणी फक्त शेतकऱ्यांसाठी मेहनत करत नाहीत तर त्यांच्याप्रती कमालीचे प्रामाणिक आढळतात.

बैल पोळा हा सण कसा साजरा केला जातो?

भाद्रपद अमावस्येच्या एक दिवस आधी शेतकरी गायी आणि बैलांना दोरीपासून मुक्त केल्या जाते.. हळद आणि मोहरीचे तेल अंगावर लावून बैलांना मसाज करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी गाई-बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालण्यात येते. घरी आणून बैलांना मस्तपैकी सजवले जाते. त्यांच्या गळ्यात घंटा असलेली नवीन माळ घातली जाते. बैलांच्या शिंगांना रंग देण्यात येतो. तसेच त्यावर धातूची अंगठी आणि कपडे चढविल्या जाते. आणि त्यांच्या कपाळाला तिलक लावून त्यांना हिरवा चारा आणि गूळ खायला घातल्या जातो.

👉 हे सुध्दा वाचा

दिवसाला 30 लिटर दूध देणारी मुऱ्हा म्हैस शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायासाठी वरदान

बैल पोळा बैलाची आंघोळ

शेतकरी मानतो बैलांचे आभार

शेतकरी बांधव आपल्या बैलांना पुरणपोळी देखील खाऊ घालतात. शेतकऱ्याच्या घरातील सर्व सदस्य या प्राण्यांसमोर हात जोडून आपल्या शेतीत मेहनत केल्याबद्दल बैलांचे धन्यवाद म्हणतात.

गावागावात बैलांचा भरतो भव्य पोळा

बैल पोळ्याचा दिवशी सर्व गावकरी मोठ्या संख्येने जमतात. गावातील वेशीच्या आवारातील पटांगणात ढोल-ताशे, लेझीम वाजवत गावोगावी मिरवणूक काढली जाते. घराघरातील ग्रामीण महिला घराबाहेर थांबून मिरवणुकीतून आलेल्या बैलांना तिलक लावून त्यांची पूजा करतात. अनेक शेतकरी त्यांचे बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन पिके घेण्यासाठी आपल्या शेतात पुन्हा कामाला लागतात.

विदर्भात साजरा केला जातो तान्हा बैल पोळा

विदर्भातील बऱ्याच भागात बैल पोळा हा सण सलग दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी मोठा बैल पोळा आणि दुसऱ्या दिवशी छोटा बैल पोळा. मोठ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते, तर तान्ह्या बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची लहान मुले त्यांच्यासाठी आणलेले मातीचे बैल सजवून घरोघरी नेत असतात. त्या बदल्यात या बकगोपालांना लोक पैसे किंवा भेटवस्तू देऊन खुश करत असतात.

बैलांच्या साजाचे साहित्य महागले

बैल पोळ्याच्या सण वर यावर्षी महागाईचे सावट पसरले असून बैलांना सजविण्यासाठी लागणारे रंगीबेरंगी कासरे, बिकनी गोंडे, बाशिंग जोडी, वेसण, गोंडे, झुले, तोडे, घुंगरू, दोर, झुल आदी साजाच्या सामानाची किंमत 30 टक्यांनी वाढल्याने शेतकरी बैल साजाच्या सामान खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. सध्या शेतीतील उत्पादन निघाले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता नाही त्यामुळे यंदाचा पोळा शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात फिकट होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यात बैलांची संख्या घटली

विदर्भासह संपूर्ण राज्यात एकेकाळी घरोघरी बैल जोडी दिसून यायची. मात्र आता प्रगत यांत्रिकीकरण मुळे शेतकऱ्यांच्या अंगणासमोर बैलांची संख्या तुरळकच दिसते. एकूण शेतकऱ्यांपैकी गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांकडे बैल पाहायला मिळतात. त्यामुळे बैल साजाचे साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची म्हणावी तेवढी गर्दी यंदा दिसून येत नाही. या कारणांमुळे या बाजारात मंदी आल्याचे काही बैल साजाच्या सामानाचे विक्रेते सांगतात.

शेतकरी बांधवांसाठी 2 शब्द

तर शेतकरी मित्रांनो 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैल पोळा समाची तुमची तयारी कशी सुरू आहे हे कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच ह बैल पोळा सण तुमच्या आयुष्यात वैभव आणि भरभराटी घेऊन येईल ही सदिच्छा देऊन तुम्हाला तुमच्या शेतीत भरगच्च उत्पन्न कसे घेता येईल याची माहिती घेण्यासाठी आपण आतुर असाल तर या वेबसाईटवर शेतकऱ्यांना उपयुक्त अशा सगळ्याच शेतीविषयक बातम्या, शेतीच्या योजना अन् यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा यांचे विस्तृत लेख आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतात. सर्व शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment