25 गुंठ्यांत हळद लागवड करून वर्षाला 5 लाखाचे उत्पादन

बीड जिल्ह्यातील होळ या गावी वास्तव्य करत असलेले प्रगतिशील शेतकरी विजय शिंदे यांनी फक्त 25 गुंठे शेतजमिनीत हळद लागवड करून वर्षाला तब्बल 5 लाखाचे उत्पन्न घेतले आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक शेतीची धरलेली कास यांना जर मेहनतीची जोड मिळाली तर अत्यंत अल्प शेतीतून सुद्धा भरघोस उत्पादन घेऊन आर्थिक प्रगती साधता येते, हे या शेतकऱ्याने पुन्हा एकदा पटवून दिले आहे.

शेती व्यवसाय आहे पॉवरफुल

शेती व्यवसायाला कमी समजण्याची चूक करू नका. भल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून मोठमोठे व्यावसायिक ते उच्च शिक्षित तरुण तरुणी आजकाल शेतीकडे वळून यश संपादन केल्याची बरीच उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. चला तर जाणून घेऊया हळद लागवड करून घवघवीत उत्पन्न घेणाऱ्य बीड जिल्ह्यातील या यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा.

हळद हे मागणी असलेले एक प्रमुख मसाला पीक

हळद हे स्वयंपाकघरातील विविध पदार्थ बनविण्यासाठी लागणारा अविभाज्य घटक तसेच अनेक औषधी गुणधर्म असलेले एक मसाला पीक असल्यामुळे देशातच नाही तर विदेशात सुद्धा हळदीला प्रचंड मागणी असते. मागील काही दशकांपासून हळद आणि आले पिकाला बाजारात उत्तम किंमत मिळत असल्याने अगदी अल्पभूधारक शेतकरी सुद्धा लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत. बीडच्या होळ गावातील प्रगतशील शेतकरी विजय शिंदे यांचे उदाहरण आपल्याला शेती हा रोजगार फायदेशीर असल्याचा प्रेरणादायी संदेश नक्कीच देऊ शकतो. या शेतकऱ्याने हळद लागवड मध्ये सातत्य ठेवून आजच्या घडीला 25 गुंठे क्षेत्रामध्ये हळदीची शेती करून लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन राज्यातील इतर शेतकऱ्यांना शेतीबद्दल आशावादी विचार करण्यास भाग पाडले आहे.

25 गुंठ्यांत हळद लागवड करून वर्षाला 5 लाखाचे उत्पादन हळद शेती पुर्व मशागत, खत व्यवस्थापन, बिण्यायांच्या जाती, लागवडीचे

पाच वर्षापासून सातत्याने करतात हळद लागवड

अगदीच अल्पभूधारक असलेले बीड जिल्ह्यातील होळ या गावचे विजय शिंदे हे अतिशय मेहनती असून त्यांनी मागील पाच वर्षापासून त्यांच्या शेतात हळद शेती करून आज भरघोस उत्पन्न त्यांच्या वाट्याला आले आहे. हळद लागवड करताना प्रारंभीच्या वर्षापासून ते बऱ्याच गोष्टी शिकत गेले. हळद शेती कशी करतात याची पूर्ण कल्पना त्यांना आली आहे. एकप्रकारे ते हळद शेती करताना करावे लागणारे व्यवस्थापन, नियोजन आणि मेहनत इत्यादी सर्व बाबींमध्ये अग्रेसर ठरले आहेत. शिंदे हे फक्त 25 गुंठे शेतजमिनीत हळदीची शेती करतात आणि या हळद शेतीच्या भरवशावर वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात.

मेहनत, नियोजन आणि व्यवस्थापन हीच खरी यशाची त्रिसूत्री

प्रयोगशील शेतकरी विजय शिंदे शेतात हळद लागवड करण्यापासून ते थेट त्यांच्या मालासाठी योग्य बाजारपेठ इत्यादी बाबतीत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करतात. याशिवाय पूर्वमशागत, आंतर मशागत इत्यादी बाबी काळजीपूर्वक मेहनत करून पिकाची काळजी घेत असतात. परिणामी त्यांना हळद लागवड पासून भरघोस उत्पादन आणि होऊन त्यांची आर्थिक प्रगती साधली जाते.

हळद लागवड करण्यासाठी योग्य शेतजमीन

तुम्हाला जर तुमच्या शेतात हळद लागवड करायची असेल तर योग्य शेतजमिनीची निवड करणे अनिवार्य आहे. हळद लागवड साठी पाण्याचा मध्यम ते उत्तम निचरा होणारी भुसभुशीत शेतजमीन असणे आवश्यक ठरते. मात्र जी शेतजमीन अत्यंत भारी असते अशा शेतजमिनीत हळद शेती नुकसानकारक ठरते. याशिवाय पाणी साचून ठेवणारी जमीन सुद्धा हळद पिकाच्या लागवडीस योग्य नसते. अशा जमिनीत हळदीची शेती न करता ती जमीन पीक फेरपालटाखाली आणल्यास फायदेशीर ठरते. अशा शेतजमिनीत द्विदलवर्गीय पिके घेतली तर भरघोस उत्पादन घेता येऊ शकते.

दीड एकर शेतात तैवान पेरू लागवड करून वर्षाला तब्बल 25 लाखाचे विक्रमी उत्पादन

हळद पीक लागवडीसाठी माती परीक्षण

तुम्हाला जर हळद लागवड कडून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला माती परीक्षण करून घेणे अत्यंत लाभदायक ठरू शकते. कारण त्यानुसार तुम्ही इतर सर्व व्यवस्थापन योग्यरीत्या करू शकता. हळद पिकाची शाकीय वाढ उत्तमप्रकारे होण्यासाठी शेतजमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असायला हवे. माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करणे सोईस्कर होते. परिणामी जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य होते. सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतजमिनीची सुपीकता वाढविण्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे असते.

हळद लागवडीसाठी योग्य हवामान

हळद लागवड करण्यासाठी उष्ण व दमट हवामान अतिशय पोषक ठरते. मध्यम पाऊस तसेच उत्तम सुर्यप्रकाशात हळद पिकाची वाढ चांगल्याप्रकारे होते. पाण्याचा ताण तसेच अधिक पर्जन्यमान अल्प वेळेपर्यंत सहज सहन करू शकण्याची क्षमता हळद पिकात असते. मात्र अतिवृष्टीमुळे पिकात पाणी साचून राहिल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हळद रोपांच्या उगवनिसाठी सुमारे 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. फुटवे फुटण्यासाठी योग्य तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असते. 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात कंद योग्यरीत्या वाढतात.तसेच कंदाची योग्यरीत्या वाढ होण्यासाठी आवश्यक तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस असावे लागते. एकंदर हळद पिकाला 25 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान लाभदायक ठरते.

हळद शेतीसाठी आवश्यक पूर्वमशागत

आपल्या राज्यातील हळद लागवड करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन उन्हाळ्यात जमिनीची आडवी, उभी नांगरणी करून ढेकळे फोडून तयार केलेली असते. या शेतजमिनीमध्ये वखरणीच्या वेळीच हेक्टरी 30 ते 50 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. शेतीत शेणखत टाकल्यानंतर पुन्हा एकदा शेतजमीन चांगली भुसभुशीत करून घेणे गरजेचे आहे. मशागत केलेल्या शेतजमिनीत हळद लागवड करण्यासाठी योग्य आकाराचे सरी वरंबे किंवा गादीवाफे तयार करून घ्यावेत. जर तुम्हाला गादी वाफे पद्धतीने लागवड करायची आहे तर त्यासाठी 20 ते 25 सें.मी. उंचीचे, 120 सें.मी. रुंदीचे गादी वाफे तयार करावे.

शेतीत हळद लागवड करताना स्त्रिया

हळदीचे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती

विदर्भातील शेतकरी हळद शेती करण्यासाठी सेलम, वायगाव या प्रचलित जातींचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फुले स्वरूपा, पीडीकेव्ही वायगाव, राजापुरी, कृष्णा या जातींची शिफारस केलेली आहे.

बेण्यांची निवड कशी करावी?

जर तुम्ही हळद शेती करायचं ठरवलं असेल तर प्रति हेक्टरी लागवडीसाठी हळदीचे 2300 ते 2500 किलो म्हणजेच प्रति हेक्टरी 23 ते 25 क्विंटल बेणे वापरल्या जाते. हळद लागवड करण्यासाठी जेठे गोल गड्डेच वापरावे. जेठे गोल गड्डे वापरायचे नसल्यास साधारणपणे 40 ते 45 ग्रॅम वजनाचे अंगठे गड्डे वापरावे. लक्षात घ्या 30 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे गड्डे हळद लागवडीसाठी अजिबात निवडू नये. तसेच हळद लागवड करण्यासाठी निरोगी बेण्यांची निवड करणे आवश्यक असते. कुजलेले, अर्धवट सडलेले बेणे लागवडीसाठी वापरणे नुकसानकारक ठरते.

फक्त पन्नास गुंठे शेतात पेरली कोथिंबीर, अन् 3 महिन्यात कमावले तब्बल 8 लाख रुपये

बीजप्रक्रिया कशी करावी?

शेतात हळद लागवड करण्यापूर्वी हळद बेण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ॲझोस्पायरियलिम 100 ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. तयार केलेल्या या द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून घ्यावेत. त्यानंतर हे बेणे थोडावेळ सावलीत सुकवून घ्यावे. त्यानंतर १ तासाच्या आतच हळद लागवड पूर्ण करून घ्यावी.

हळद लागवड पद्धती, सरी वरंबा पद्धत आणि गादीवाफे पद्धत

1) सरी वरंबा पद्धतीने हळद लागवड

आपल्यालाही बहुतांश शेतकऱ्यांना ज्ञात असेल पारंपरिक पद्धत म्हणजे सरी वरंबा पद्धत. हळद लागवड करण्याच्या या पद्धतीमध्ये 30 ते 40 सेंटीमीटर अंतरावर वरंबे तयार करून ओळीत 22.5 ते 30 सेंटीमीटर अंतर राखून जेठे गड्डे असलेल्या बेण्यांची 8 ते 9 सेंटीमीटर खोलीवर टोकून लागवड करावी. तसेच लागवडीनंतर लगेचच हलके पाणी द्यावे. येथे लक्षात घ्यावयाची महत्वाची बाब म्हणजे सरी वरंबा पद्धतीने हळद लागवड करायची असेल तर फक्त जेठे गोल गड्डेच वापरणे गरजेचे असते. हळद लागवड साठी योग्य हंगाम मे ते जून अखेरपर्यंत असतो.

2) गादी वाफे पद्धतीने हळद लागवड

हळद शेती करण्याच्या या पद्धतीमध्ये जर तुम्हाला ठिबक सिंचन पद्धतीने ओलित करावयाचे असेल तरच या पद्धतीने लागवड करावी. यामुळे शेतीमालाच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ होऊन अधिकाधिक उत्पन्न मिळवता येऊ शकते. या पद्धतीमध्ये प्रथम 120 सेंटीमिटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात आणि त्यात 20 ते 25 सें.मी. उंचीचे 60 ते 75 सेंटीमीटरचा माथा असलेले रुंद वरंबे किंवा गादी वाफे तयार करून घ्यावे. या सपाट गादी वाफ्यावर 30 सेंटीमीटर अंतरावर दोन ओळींत झाडांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवून जेठे गड्डे किंवा बेणे वापरून बेण्यांची टोकून लागवड पूर्ण करावी. तसेच लागवडीनंतर शेतजमिनीस हलके पाणी देणे आवश्यक असते.

हळद लागवड खत व्यवस्थापन

हळद लागवड साठी शेतजमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर वापर करावा. शेतजमिनीच्या गुणवत्तेनुसार हेक्टरी २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी शेतात थकून मातीत चांगले मिसळून घ्यावे. तसेच 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 60 किलो पालाश प्रति हेक्टरी शेतजमिनीस पुरवावे. वरीलपैकी संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी देऊन नत्र खताची मात्रा दोन किंवा तीन हप्त्यांत विभागून हळद लागवडीपासून दीड, तीन व साडेचार महिन्यांनी देण्यात यावी. हळदीच्या ओळी लगत चर घ्यावे अन् त्यात खत टाकून मातीने झाकून घ्यावे या प्रक्रियेनंतर पाणी द्यावे.

हळद पिकास पाणी व्यवस्थापन

हळद लागवडीमध्ये पाणी व्यवस्थापन योग्यप्रकारे करणे अतिशय महत्वाचा घटक आहे. हळद पिकास वेळोवेळी 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी देण्यात यावी. हळदीच्या ओळीलगत चर घेऊन त्यात खत टाकून मातीने झाकून घ्यावे व नंतर पाणी द्यावे. हळदीचे पीक नऊ महिन्यांचे झाल्यावर काढणीयोग्य होते. संपूर्ण रोप दांड्यासह जमिनीवर लोळायला लागले की पाणी देण्याची क्रिया बंद करावी.

हळद रोपांवरील अन्नद्रव्य व्यवस्थापन

हळद रोपांत नत्राची कमतरता असल्यास, युरिया 2% (20 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात) या प्रमाणात पानांवर फवारणी करावी. रासायनिक खतांचा प्रभावशाली वापर करण्यासाठी नत्र हे अमोनियम सल्फेटद्वारे, स्फुरद डायमोनियम फॉस्फेटद्वारे आणि पालाश सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे देण्यात यावे. रासायनिक खतांचा वापर करताना ती जमिनीवर न फेकता जमिनीत पेरून मातीत मिसळून देणे फायदेशीर असते. हळद लागवड मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परिक्षणाच्या आधारावर करणे आवश्यक असते. लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य फेरस सल्फेटद्वारे, जस्त हे झिंक सल्फेटद्वारे आणि बोरॉन हे बोरॅक्सद्वारे जमिनीत सेंद्रिय खतात मिसळून योग्य मात्रेत द्यावे.

हळदीच्या पावडरला गर्द पिवळा रंग येण्यासाठी कर्क्यूमिन हा प्रमुख घटक खूपच महत्त्वाचा असतो. हळदीमधील कर्क्यूमिनचे प्रमाण वाढीसाठी आवश्यक मात्रेत सल्फर म्हणजेच गंधकाचे महत्वाचे असते. हळदीच्या पानांमध्ये लोहाची कमतरता असल्यास रोपांची पाने पिवळी पडलेली दिसून येतात अशावेळी फेरस अमोनियम सल्फेट किंवा फेरस सल्फेट 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून 3 ते 4 वेळा फवारणी करण्यात यावी.

फवारणीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते चिलेटेड स्वरुपात असल्यास उपलब्धता वाढण्यास मदत होते. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फवारणीचे प्रमाण 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे शिफारस करण्यात आलेले आहे. फवारणीसाठी शासन-प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-2 किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी निर्मित द्रवरूप फुले मायक्रो ग्रेड-2 वापरावे.

हळद पीक काढणी अन् उत्पादन

हळदीचे पीक काढणीस येण्यास 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागतो. गड्डे पक्के झाल्यावर हळदीची पाने पिवळी पडून सुकू लागतात आणि जमिनीवर लोळतात. हळद पिकाच्या काढणीअगोदर जमिनीच्या मगदुरानुसार पांढरा दिवस ते एक महिना पिकाला पाणी देण्याची क्रिया बंद करणे आवश्यक असते. सुकलेला पालापाचोळा जमिनीलगत विळ्याने कापून द्यावा. हळदीची काढणी योग्य ओलावा असतो त्यावेळी कंद कुदळीने खणून काढावे. मात्र या क्रियेवेळी गड्यांना इजा होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी.

हळदीच्या उत्पादन खर्चाचे विवरण

हळद उत्पादन घेण्यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार ते 1 लाख 40 हजारांपर्यंत प्रती एकर खर्च येतो. एक एकर शेतात अंदाजे 35 क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन घेता येते. हळदीला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो, त्यामुळे हळद लागवड करणे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरते. परंतु मिळणाऱ्या दरात चढ उतार होत असल्याने कधी कधी शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव भेटत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा होऊ शकते.

हळदीचे औषधी गुणधर्म

हळद ही एक सर्वगुण संपन्न औषधी म्हणून संपूर्ण देशात प्रचलित आहे हळदीमुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीचे दुधात सेवन केल्याने आपले रक्‍त शुद्ध होऊन त्‍वचेवर चकाकी येऊन त्वचा उजळते. हळद हे उत्तम जंतुनाशक म्हणून काम करते. ही वनस्पती अनेक व्याधींवर अत्यंत गुणकारी आहे. हळदीचे चुर्ण कोमट पाण्याबरोबर सेवन केल्यास ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन बचाव होऊ शकतो.

तसेच पचनक्रिया सुधारण्यास हळद रामबाण असते. दुधामध्ये हळद टाकून प्राशन करणे आरोग्यासाठी खूपच लाभदायी असून त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीची वाढ होऊन आजारांपासून बऱ्याच प्रमाणात संरक्षण होते. आपल्याकडे जखम झाल्यास त्यावर हळद लावून रक्तस्त्राव बंद करण्याचा हमखास फॉर्म्युला आपण वेळोवेळी वापरतो. हळकुंड पासून हळद तयार होते.लग्न प्रसंगी हळदीने अंग चोळण्याची प्रथा आपल्याकडे आहे. याचे वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे अंगावरील मळ, मृत त्वचा नष्ट होऊन रंग उजळून अंग टवटवीत होते. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून सर्वदूर प्रचलित आहे.

देशातील हळद उत्पादन क्षेत्र आणि उत्पादन

भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र 125800 हेक्टर असून उत्पादन 550185 मेट्रिक टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ 80% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी 15 ते 20% फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली 8500 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 42500 मेट्रिक टन इतके होते.

हळद लागवडीची जागतिक क्रमवारी

जगातील सर्वांत मोठा हळद लागवड करणारा देश म्हणून आपल्या देशाने लौकिक मिळवला आहे.भारत हा सर्वाधिक हळद उत्पादन घेणारा तसेच निर्यात करणारा देश आहे. भर्यानंत्र चीन, म्यानमार, नायजेरिया आणि बांगलादेश इत्यादी देशाचा हळद लागवड मध्ये समावेश होतो. जगातील हळदीखालील क्षेत्राचा विस्तार लक्षात घेतल्यास हळद लागवडीचे प्रमुख क्षेत्र भारत असून, जगातील एकूण लागवडीपैकी तब्बल 80 टक्के लागवड आपल्या देशात होते. त्याखालोखाल चीनमध्ये आठ टक्के, म्यानमारमध्ये चार टक्के, नायजेरियात तीन टक्के आणि बांगलादेशात तीन टक्के इतके हळदीचे क्षेत्र आहे.

हळदीचा प्रसिद्ध बाजार सांगली बाजार

सांगलीचा हळद बाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे. सांगलीत हळद बियाण्यांचा बाजारही नावाजलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सीमाभागातून अनेक हळद उत्पादक शेतकरी बियाणे खरेदीसाठी सांगलीत येत असतात. परिणामी सांगली बाजार समितीत दरवर्षी अंदाजे 700 गाड्या हळद बियाण्यांची उलाढाल होते. एका गाडीत किमान 16 टन बियाणे बसते. प्रत्येक हंगामात किमान 400 ते 500 गाड्या हळद बियाणे विक्री एकट्या संगलीच्या बाजारात होते. मागील वर्षी हळदीच्या बियाण्यांचा बाजारभाव 4000 ते 4200 रुपये प्रति क्विंटल इतका होता. हंगामात 400 ते 500 गाड्या म्हणजे 6400 ते 8000 टन बियाण्यांची विक्री होते. मात्र हळदीच्या भावात मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत असतो ही बाब लक्षात घेणे आवश्यक असते. प्रत्येक वेळी चांगलाच बाजारभाव मिळेल याची काही हमी नसते.

राज्यात जिल्हानिहाय हळदीचे उत्पादन क्षेत्र

महाराष्ट्रात नोंद घेण्यास सुरुवात झाल्यानंतर 2019-20 साली हळद लागवड क्षेत्र 54 हजार 885 हेक्टरवर पोहोचले आता थेट 84 हजार हेक्टर क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र देशात हळद लागवडीत अव्वल ठरला आहे. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर या जिल्ह्यात होते. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील हळद संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यात हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र 84 हजार 66 हेक्टर आहे. त्यापैकी एकटय़ा हिंगोलीत 49 हजार 764 हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली आहे.

हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्म्याहून अधिक आहे. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यात 13 हजार 131 हेक्टर, वाशिममध्ये 4 हजार 149 हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात 3 हजार 736 हेक्टर, परभणीत 3 हजार 151 हेक्टर, बुलढाण्यात 1 हजार 763 हेक्टर, जालन्यात 1 हजार 77 हेक्टर, जळगावात 984 हेक्टर, चंद्रपूरमध्ये 787 हेक्टर, गोंदियात 382 हेक्टर, भंडाऱ्यात 375 हेक्टर आणि नागपुरात 351 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. हळदीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ झाल्यामुळे हिंगोली हळद उत्पादनात जागतिक उच्चांक गाठताना दिसत आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment