बोगस बियाणे असे ओळखा, बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्या

शेतकरी मित्रांनो आज आपण बियाणे खरेदी करताना काय दक्षता घ्यावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक शेतकरी आपले शेत पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळत असतो. वर्षभर शेतात राब राब राबत असतो. मात्र सध्या काही बोगस बियाणे विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या बियाण्यांपासून उत्पादनावर त्याचा गंभीर परिमाण होऊन शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक दृष्ट्या पिळवणूक होत असते.

यंदा बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे असे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. या सर्व बाबींचा विचार करता बियाणे खरेदी करताना गाफील राहून चालत नाही ही गोष्ट लक्षात घ्या. बियाणे खरेदी करताना कोणत्या गोष्टी करायच्या तसेच अस्सल बियाणे कसे ओळखायचे याबद्दल आपण विस्तृत माहिती बघणार आहोत.

बियाणे खरेदी करताना या गोष्टी आवर्जून तपासा

रब्बी हंगामात सुरूवात झालेली आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र बियाणे खरेदी करताना प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणेच विकत घ्यावे. तसेच बियाणे खरेदी करताना टॅगवर पिकाचे व जातीचे नाव, बियाण्याचा प्रकार, गट क्रमांक, बीज उत्पादक कंपनीचे नाव आणि पत्ता यांसारख्या डिटेल्स, बीज परीक्षण केल्याचा दिनांक, उगवण शक्तीची टक्केवारी, बियाणे शुद्धतेचे प्रमाण, पिशवीतील बियाण्याचे
एकूण वजन, विक्रीची किंमत इत्यादी बाबी काळजीपूर्वक पडताळणी करून घेणे आवश्यक असते. याशिवाय बिलावर विक्रेत्याची सही असणे सुद्धा आवश्यक आहे.

बियाणे विक्रेत्यांकडून बिल घेताना आवश्यक गोष्टी

शेतकरी बांधवांनो बियाणे खरेदी केल्यावर पक्के बिल घ्यायला विसरू नका. तसेच या बिलावर बियाण्याचे पीक आणि वाण तसेच गट क्रमांक याशिवाय बियाण्याचे खरेदीची तारीख लिहिली आहे की नाही याची खात्री पडताळणी करून घ्या. मुदत संपलेले किंवा पॅकिंग फुटलेले बियाणे अजिबात विकत घेऊ नका. या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास भविष्यात जर काहीही अडचण आली. उदा. बियाण्यात दोष आढळून आला तर संबंधीत बियाणे विक्रेत्याची तक्रार करण्यासाठी या सtर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरतात.

जे शेतकरी बांधव विक्रेत्यांवर विश्वास ठेवून वरील सर्व बाबींकडे लक्ष देत नाहीत त्यांची तक्रार ग्राह्य धरण्यात येत नाही. कारण कायदा पुरावे मागतो. पुराव्याशिवाय कोणालाही दोषी धरता येत नाही. आपण वर्षभर शेतात कष्ट घेतो. पण बोगस बियाण्यांमुळे संपूर्ण वर्षाचा सत्यानाश होऊन शेतकरी कर्जबाजारी होतो. आणि आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे बियाणे खरेदी करताना योग्य ती काळजी अवश्य घेतली पाहिजे. याशिवाय तुम्ही जे बियाणे खरेदी केले आहे ते वापरण्यापूर्वी पिशवीच्या खालच्या बाजूला छोटेसे छिद्र पाडून बियाणे बाहेर काढून घ्या. बियाण्याच्या पिशवी असलेला टॅग काढू नका तसेच पिशवी मध्ये बियाण्याचा थोडेसे बियाणे नमुण्यासाठी शिल्लक असू द्या. बियाण्याची खरेदी पावती सांभाळून ठेवा.

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी

असे ओळखा बोगस बियाणे

ज्या बियाण्यांच्या पिशवीवर सरकारचा उत्पादन आणि विक्री परवाना नसतो, अशी बियाणे शक्यतो बोगस बियाणे असतात. तसेच जी बियाणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे प्रमाणीकरण केलेले नसतात असे बियाणे सुद्धा लागवडीस अजिबात योग्य नसतात. ज्या बियाण्याची तपासणी केल्याचा अहवाल नसतो असे बियाणे सुद्धा बनावट असू शकते. कोणत्याही अनधिकृत बियाण्याच्या पिशव्यांवर तुम्हाला तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या भागासाठी शिफारस केली आहे याबाबत माहिती दिलेली नसते अशी सर्व बियाणे हे बोगस असतात असे समजावे. बियाण्याची खरेदी करताना प्रमाणित बियाण्याच्या वापरावर भर द्यावा.

या मोहरीच्या सुधारित जाती देतील हेक्टरी 25 क्विंटल उत्पादन

थोडी कमी किंमत आहे म्हणून बोगस बियाण्याच्या अजिबात नादी लागून आपली आर्थिक घसरण करून घेऊ नका शेतकरी मित्रांनो. यामुळे आपले वर्षभराचे कष्ट तर जातातच शिवाय जवळील पैसा सुद्धा जाऊन माणूस विवंचनेत पडतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी बियाणे खरेदी करताना विशेष लक्ष पुरविणे अगत्याचे ठरते.

कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यास उत्तम

शेतकरी मित्रांनो गाव पातळीवरील तसेच तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठीच सरकारने केलेली असते. त्यामुळे बियाणे खरेदी करताना तसेच इतर कुठलीही शेतीविषयक शंका मनात असल्यास जवळील कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करता येते.

असे केल्यास तुमच्या ज्ञानात भर पडून तुमची फसवणूक होणे टाळता येऊ शकते. तुमच्या भागासाठी योग्य बियाणे कोणते याबाबत संबंधित कृषी अधिकारी निश्चितच तुम्हाला अचूक मार्गदर्शन करू शकतात. यामुळे तुमच्या शेतीत जास्तीत जास्त उत्पादन घेणे सुद्धा शक्य होते. प्रत्येक शेतकऱ्याने फक्त बियाणे खरेदी करताना नाही तर इतर बाबतीत सुद्धा शोधक बुद्धी ठेवून आधुनिक तंत्रज्ञान शिकून घ्यायला हवे. तसेच जास्तीत जास्त शेतीविषयक माहिती गोळा करून आपले शेतीविषयक ज्ञान वाढवायला हवे. प्रयोगशील होण्यासाठी आणि शेतीतून भरघोस उत्पादन घेण्यासाठी ज्ञान असणे तर आवश्यक असतेच.

बियाणे खरेदी करताना, खते आणि तणनाशके खरेदी करताना तसेच नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी जवळील कृषी अधिकाऱ्यांकडे जायला अजिबात मागे पुढे पाहू नका. सगळेच कृषी अधिकारी शेतकऱ्यांचे मनापासून मार्गदर्शन करतात. एखाद्या अधिकाऱ्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली तर त्यांची तक्रार सुद्धा करता येते.

दर्जेदार बियाणे मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क

शेतकऱ्यांच्या हितार्थ राज्य तसेच केंद्र सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. भारत सरकारने शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळता यावी यासाठी भारतीय बियाणे कायदा 1966 हा महत्वपूर्ण कायदा 1 ऑक्‍टोबर 1969 सालीच अंमलात आणला आहे. शेतकरी वर्गाची बोगस बियाणे खरेदी पासून होणारी पिळवणूक थांबविणे तसेच पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्‍ध करून देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. हा कायदा संपूर्ण देशात लागू आहे.

या पिकाची लागवड करून व्हा लखपती, प्रती क्विंटल किमान 25 ते 30 हजाराचा भाव

परिणामी या कायद्यातील सर्व नियम, अटी, याबाबत सर्व राज्‍यात साम्य दिसून येते. या कायद्यानुसार देशाच्‍या विविध भागासाठी महत्‍त्‍वाच्‍या जाती कोणत्या आहेत याबद्दल माहिती दिलेली असते. तसेच विविध राज्यांत घेतल्या जाणारी पिके आणि त्यानुसार पिकांच्‍या अधिसूचित जाती यांची वर्गवारी केल्या जाते. अधिसूचित जातीच्‍या बियाण्‍याची विक्री करताना किंवा बियाणे विक्रीसाठी संचय करताना देशातील सर्व विक्रेत्‍यांना या कायद्यातील अटी आणि तरतूदी यांचे पालन करणे अनिवार्य असते.

शुद्ध बियाण्यांचे महत्व जाणून घ्या

शेतीच्या पिकाचे उत्पादन म्हणजे वर्षभरातील अनेक टप्प्याच्या यशस्वी प्रवासाचे फलित असते. जसे, पूर्वमशागत पासून ते काढणी पर्यंत अनेक टप्पे शेतकऱ्याला यशस्वीरीत्या पार पाडावी लागतात. या सर्व टप्प्यांत सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे योग्य बियाण्याची पेरणी. बियाणे जर दर्जेदार असेल तरच इतर सर्व टप्प्यातील कष्टाला महत्व येते. अन्यथा नुकसान अटळच. परिणामी योग्य तसेच गुणवत्तापूर्ण बियाण्याची निवड करणे अगदी क्रमप्राप्त ठरते.

“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ” संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या उक्तीप्रमाणे उत्तम दर्जाचे बियाणे निवडून पेरणी केल्यास या बियाण्यांचे भरघोस उत्पादनरुपी फळे शेतकऱ्यास चाखायला मिळतात. काही शेतकरी त्यांच्याकडे असलेले धान्यच बियाणे म्हणून वापरतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की घरचे बियाणे उगवणक्षम असेलच असे नसते.

घरचे बियाणे लागवड केल्यास त्याचा उत्पादन क्षमतेवर अनिष्ट परिणाम दिसून येतो. प्रमाणित बियाण्यास लागणारा खर्च शेतीच्या इतर खर्चाच्या तुलनेत नगण्य असतो. परिणामी प्रत्येक शेतकऱ्याने बियाणे खरेदी करताना काटकसर करण्याच्या भानगडीत पडू नये. चांगल्या दर्जाचे, शिफारस केलेले उगवणक्षम बियाणे खरेदी करून त्या बियाण्याची आपल्या शेतात पेरणी केल्यास उत्पादवाढीसाठी निश्चितच फायदेशीर ठरते.

शेतकरी मित्रांनो आपल्याला जर शेतीतून आपली आर्थिक उन्नती साध्य करायची असेल तर त्यासाठी पारंपारिक पद्धतीने शेती करून काहिही हाती लागत नाही i बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत असल्यामुळे या तंत्रज्ञानाची जोड जर आपण शेतीला दिली आणि प्रयोगशील शेती करण्याचा निर्णय घेतला तर निश्चितच आपल्या शेतात सोन पिकल्याशिवय राहणार नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment