आजकाल नोकरी मिळत नाही अशी कुरकुर करून काहीही हातपाय न हलविणाऱ्या तरुणांची संख्या काही कमी नाही. मात्र सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने रताळे शेती करून 3 महिन्यात चक्क 6 लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन स्वतःची आर्थिक भरभराटी करून घेतली आहे. तसेच इतर शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. या तरुण इंजिनिअरने त्यांची नोकरी सांभाळून त्यांचा शेतात केलेले हा यशस्वी प्रयोग पाहून परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. चला तर जाणून घेऊया या तरुण इंजिनिअरने रताळे शेती करून भरघोस उत्पन्न मिळवले तरी कसे? याबद्दल संपूर्ण माहिती.
खासगी नोकरी सांभाळून शेतीत घातले लक्ष
नोकरी सांभाळून शेतीत घातले लक्ष करणाऱ्याला कधीच वेळेची कमी नसते. जी व्यक्ती काहीतरी वेगळे करायचं प्रयत्न करते अशा व्यक्तीला मार्गात अडथळे अन् संकटे जरी येत असली तरी यश सुद्धा मिळते हे काही खोटे नाही. मात्र दे रे हरी, पलांगावरी अशाप्रकारची वागणूक असलेल्यांना मात्र जिवनात काहीही करता येत नाही. या तरुण इंजिनियर शेतकऱ्याकडून आजच्या तरुणाईला शिकण्यासारख खूप आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगावचे रामराव पाटील या तरुणानं इंजिनिअरिंगची पदवी घेतली.
त्यानंतर ते एका खासगी कंपनीत नोकरी करतात. या तरुणानं नोकरी करत असताना आपली शेतीची असलेली आवड लक्षात घेऊन त्यात लक्ष घालायचे ठरवले. अचूक व्यवस्थापन आणि मेहनत करण्याची जिद्द या गुणांमुळे नोकरी आणि शेतीचा मेळ बसविणे यांना जास्त त्रासदायक ठरले नाही. त्यांची मेहनत कामाला आली अजी त्यांनी रताळे शेती करून फक्त 3 महिन्यात 6लाखो रुपये इतके भरघोस उत्पन्न मिळवले. त्यामुळे माणसात जिद्द असली तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते, हे जणू एक प्रेरणादायी उदाहरणच सदर इंजिनीयर साहेबांनी त्यांच्या कर्तुत्वानतुन शेतकऱ्यांच्या मुलांपुढे ठेवले.
फक्त 60 गुंठे जमिनीत रताळे शेती करून मिळवला प्रचंड नफा
फक्त ६० गुंठे शेतजमिनीत रताळे शेती करून भरघोस उत्पादन घेणाऱ्या या तरुण इंजिनीयर भावाने त्यासाठी आवश्यक ते सर्व ज्ञान प्राप्त केले. अन् त्या ज्ञानाचा प्रत्यक्षात अवलंब करून या रताळे शेती करून या पिकातून सदर इंजिनीयर साहेबांनी फक्त 3 महिन्यात चक्क 6 लक्ष रुपयांचं भरघोस उत्पादन घेऊन कमाल केली आहे.
सांगली जिल्ह्यात बनवली स्वतःची वेगळी ओळख
या यशस्वी शेतकऱ्याच नाव आहे रामराव पाटील. मूळचे सांगली जिल्ह्यातील बोरगाव या छोट्याशा गावात राहणारे पाटील बंधू व्यवसायाने इंजिनीयर आहेत. आज त्यांच्या या यशस्वी रताळे शेतीने त्यांना सांगली जिल्ह्यात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. लहानपणापासून शेतकऱ्याच्या या मुलाला शेतीची प्रचंड आवड असल्याने अभियंता म्हणून मानाची नोकरी मिळाली असून सुद्धा सतत काहीना काही वेगळं कराची जिद्द त्यांच्या कामी आली. त्यांनी नोकरी सांभाळत त्यांच्या शेतात वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करून पाहिले. याच नावीन्यपूर्ण संकल्पनेतून त्यांनी रताळे शेती सुरू केली. आज राज्यातल्या असंख्य शेतकरी पुत्रांनी सुद्धा असच काहीतरी वेगळे करून चौकस बुद्धीने आपल्या परिवाराचा आर्थिक विकास करणे अपेक्षित आहे. इच्छा असली तर मार्ग सुचतो हे मात्र खरे आहे.
रामरावांनी अशी केली रताळे शेती
रामराव पाटील यांनी रताळे शेती करण्याचा निर्णय घेतला खरा. मात्र यासाठी आपल्याला आवश्यक ते ज्ञान लागेल याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांनी त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून रताळे शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन मिळवले. तसेच जाणकार लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून माहिती मिळवली. शेवटी आपल्या 60 गुंठे शेतात रताळे शेती करायचे ठरवून लागवड पूर्ण केली. त्यानंतर त्यासाठी लागणारे सगळे शेती व्यवस्थापन करून त्या रताळे पिकाचे संगोपन अगदी पोटच्या लेकराप्रमाणे केले.फक्त तीन महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट महिन्यात या रताळे शेती मधून उत्पादन घेण्याची वेळ आली. अन् रताळे शेतीने आपली कमाल दाखवली. त्यांना तब्बल 10 टन माल झाला. फक्त तीन महिन्यातच या तरुण इंजिनीयर शेतकऱ्याने तब्बल 6 लाख रुपये नफा कमवून वावर हाय त पॉवर हाय ही ग्रामीण भाषेतील उक्ती आपल्या कर्तुत्वाने सार्थ ठरवली.
70 हजार रुपये प्रति टन मिळाला भाव
फक्त शेतातून भरघोस उत्पादन घेणेच महत्वाचे नसते. तर त्या शेतमालाला योग्य बाजारात नेऊन विकणे सुद्धा खूप महत्वाचे असते. शेतीतील हे सर्व बारकावे रामराव आधीच शिकले होते. परिणामी त्यांनी त्यांचे रताळे मुंबईच्या बाजारात नेऊन विकायचे ठरविले.
आपल्याकडे कोणत्याही उपवासाला रताळ्याचे काप, रताळ्याचा कीस आणि रताळ्याचे कितीतरी वेगवेगळे पदार्थ तयार करून खाण्याची पद्धत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन रामराव चांगला भाव मिळविण्याच्या उद्देशाने निघाले मुंबईच्या बाजारपेठेत. त्यांनी मुंबई गाठून त्यांच्या रताळ्यांची मुंबईच्या बाजारात विक्री करून साधारणपणे ७० हजार रुपये प्रति टन इतका दर मिळाल्याने त्यांना भरघोस नफा मिळाला.
रताळे शेती संबंधी अधिक माहिती
रताळे शेती साठी अनुकूल हवामान
रताळे शेती करणे अत्यंत सुलभ असते. कारण रताळे लागवड कुठ्ल्याही हंगामात केली जाऊ शकते. रताळे वर्षभर बाजारात उपलब्ध असतात. शीतोष्ण आणि समशीतोष्ण असे दोन्ही प्रकारचे हवामान पोषक असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना रताळ्याची लागवड कुठ्ल्याही हंगामात करता येऊ शकते तसेच भरघोस उत्पादन घेता येऊ शकते. रताळे लागवड तिन्ही हंगामात करता येते, मात्र पावसाळ्यात रताळे लागवड करणे सर्वात उत्तम आहे. या हंगामात रताळ्याची रोपे चांगली वाढतात. २५ ते ३४ अंश तापमान रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर असते. मात्र आपल्याकडे हिवाळ्याच्या हंगामात रताळ्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्या जात असल्याचे पाहायला मिळते. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सुद्धा रताळे लागवड करून चांगले उत्पादन आणि नफा अनेक शेतकऱ्यांनी मिळविल्याची अनेक उदाहरणे आहेत.
रताळे शेती साठी पूर्व मशागत
ज्या शेतकऱ्यांना रताळे शेती करायची आहे त्यांनी शेतजमिनीची काळजीपूर्वक पूर्व मशागत करणे आवश्यक असते. सर्वप्रथम शेतजमीन नांगराने नांगरुण घ्यावी. त्यानंतर कल्टीव्हेटरच्या सहाय्याने जमीन चांगली भुसभूशीत करून घ्यावी. यानंतर कमीत कमी सहा महिने कालावधी पर्यंत जुने शेणखत शेतात टाकावे. सदर शेतजमिनीत शेणखताचे प्रमाण प्रति हेक्टर 200 क्विंटल इतके असावे. त्यानंतर शेतीत रोटाव्हेटर मारून घेतला की रताळे लागवड करण्यासाठी शेतजमीन पूर्णपणे तयार होते.
शेळीपालन करून इंजिनीयर कमावतो वर्षाला सव्वा कोटी रूपये
रताळे लागवड करण्याबाबत मार्गदर्शन
जर तुम्हाला तुमच्या शेतजमिनीत रताळी लागवड करायची आहे तर त्यासाठी साधारण उतार असलेली तसेच उत्तम निचरा होणारी जमीन निवडणे आवश्यक असते. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिन रताळे पिकासाठी उत्तम ठरते. रताळे लागवड करण्यासाठी जमिनीची चांगली मशागत करावी लागते. साधारणपणे 60 सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावे लागतात. लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या नावाजलेल्या जातींचा वापर केल्यास फायदेशीर ठरते.
तुम्हाला जर रताळे शेती पावसाळ्याच्या हंगामात करायची असेल तर त्यासाठी रताळे पिकाची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बेणे निवडावे. बेण्याची लांबी 20 ते 30 सेंटिमीटर इतकी असावी तसेच त्यावर तीन ते चार डोळे असावेत. एका गुंठा शेतजमिनीसाठी वेलाचे अंदाजे 800 तुकडे लागतात. लागवड करताना बेणे वरंब्यावर 25 सें.मी. अंतरावर लावावे लागतात. प्रत्येक ठिकाणी एक फाटा (बेणे) लावावा. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा लागतो अन् दोन्ही टोके उघडी ठेवावी लागतात. बेण्याच्या मधल्या भागावरील दोन डोळे मातीत पुरले जातील, याची खबरदारी घेणे गरजेचे असते. सऱ्या करण्यापूर्वी पुरेसे शेणखत मिसळावे लागते, तसेच लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी लागते.
लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे लागते. रताळ्याची लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी पहिली बेणणी करावी लागते. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून 30 दिवसांनी करावी लागते. त्याच वेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी लागते. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यांतून मुळे फुटतात. अशा परिस्थितीत लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांत शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत. लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागतात, त्याच वेळी रताळ्याची काढणी करून घ्यावी.
रताळे कंद असते जीवनसत्वांनी परिपूर्ण
रताळी शिजवून खाणे कोणाला आवडत नाही बरं? अगदी गरीब श्रीमंतांना या कंदाची गोडी अवीट वाटते. रताळे हे कंद पांढरे, लाल, जांभळे तसेच तपकिरी रंगाचे आढळून येतात. सर्वच प्रकारचे रताळे आरोग्यदायी असतात. रताळे जर नियमित खाल्ले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून आरोग्य सुदृढ होते. रताळे खाल्ल्याने त्वचेवरील चकाकी वाढण्यास मदत होते. रताळे कंद हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते. रताळ्यामध्ये जीवनसत्व ब 6 असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते. 100 ग्राम रताळ्यामध्ये जवळपास 90 ग्राम उष्मांक असतात. रताळ्याच्या सेवनाने लठ्ठपणा नियंत्रित होण्यास हातभार लागतो. मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा रताळ्याचे सेवन खुपच लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे.