दुग्ध व्यवसायासाठी वरदान, मुऱ्हा म्हैस देते दिवसाला 25 ते 30 लिटर दूध

राज्यात बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करण्यास प्राधान्य देतात. आणि त्यापैकी बरेच जण दुग्ध व्यवसाय करतात. अशा शेतकऱ्यांना त्यांनी पाळलेल्या गाई म्हशींच्या दुधातून उत्पन्न प्राप्त होत असते. गाईच्या तुलनेत म्हशीच्या दुधाला जास्त भाव मिळत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच दुग्धव्यवसाय करत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक प्रकारची दुधाची खाण असलेली मुऱ्हा जातीच्या म्हशीविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.

मुऱ्हा म्हैस

मुऱ्हा जातीच्या म्हशींमध्ये दूध देण्याची क्षमता असते सर्वाधिक

भारतातील पशुपालन आणि दुग्धव्यवसाय यांचे प्रमाण बघता हे व्यवसाय करणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांना त्यांच्याकडे मुऱ्हा म्हैस असावी इच्छा असते कारण म्हशींच्या इतर जातींशी तुलना केल्यास मुऱ्हा जातीच्या म्हशींची दूध देण्याची क्षमता खूप जास्त असते. त्यामुळेच मुऱ्हा म्हैसीची किमंत सुद्द्धा जास्त असते.

भारतात कुठे आढळतात मुऱ्हा जातीच्या म्हशी

मुऱ्हा जातीच्या म्हशींची शिंगे वळलेली असून छोटी छोटी असतात. या म्हशी पंजाब आणि हरियाणा राज्यात जास्त प्रमाणात दिसून येतात. तसेच यांच्या दूध देण्याच्या क्षमतेमुळे देशातील इतर भागातसुद्धा या म्हशींचे पालन करण्यास शेतकरी वर्ग कायम प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. हरियाणामध्ये मुऱ्हा जातीच्या म्हशींना काळं सोनं अस म्हटलं जाते.

मुऱ्हा म्हशींची ओळख काय आहे?

मुऱ्हा म्हशी गडद काळया रंगाच्या असतात तसेच त्यांचे कपाळ गोल आणि उभट असते. तसेच या म्हशींचे कान गावठी म्हशीच्या तुलनेत लांब असतात. या म्हशींची शिंगे गोलाकार वाकलेली आल्यामुळे त्यांना सिकल शेप हॉर्न असे म्हटल्या जाते. मुऱ्हा म्हशींची शेपटी लांब तसेच शेपटीचा गोंडा काळा असतो. या म्हशींच्या जातीत दुध नलिका ठळक असते. तसेच शरीराला धरून ठेवणारी कास हे सुद्धा या म्हशीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

किती असते मुऱ्हा म्हशीची किंमत?

किमंतीचा विचार करता या जातीच्या म्हशी 1 लाखांपासून 3 ते 4 लाखांपर्यंत किंमतीत विकल्या जातात. भारतातील काही भागांत मुऱ्हा म्हशींची विक्री 50 लाखांपर्यंत सुद्धा होते. जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हशींमध्ये मुऱ्हा जातीच्या म्हशी सर्वोत्कृष्ट असल्याचं बोलल्या जातं. उत्तर भारतातील अनेक राज्यांत या म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केल्या जाते. मुऱ्हा म्हैस एका महिन्यात 1000 लिटरहून अधिक दूध देत असल्याचा दावा केला जातो. सध्याच्या या आधुनिक काळात म्हशींची खरेदी विक्री ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धती द्वारे करण्यात येत असते.

मुऱ्हा जातीच्या म्हशीला खुराक कशी द्यावी?

या जातींच्या म्हशींचे क्षमतेइतके दूध मिळण्यासाठी साधारणपणे 400 किलो वजन असलेल्या म्हशीला दररोज 25 किलो हिरवा चारा तसेच 7 ते 8 किलो कोरडा चारा तिची भूक भागविण्यासाठी आणि शरीर पोषणासाठी देणे गरजेचे असते.दूधनिर्मितीसाठी रोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या 50 टक्के खुराक द्यावा, म्हणजे दूध उत्पादनाचे सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला दररोज पिण्यासाठी 60 ते 75 लिटर पाण्याची गरज असते.

👉 हे सुध्दा वाचा

इंजिनिअरिंग सोडून शेळीपालन सुरू केले, आता कमावतो वर्षाला सव्वा कोटी रुपये

स्वच्छ दूध उत्पादनासाठी अत्यावश्यक बाबी विषयी माहिती

१) म्हशींचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी असावी. दूध काढण्यासाठी स्वच्छ मोकळी जागा वापरली तरी चालण्यासारखे आहे. दूध काढताना आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक असते.

२) दुभते जनावर वेगळे करून त्याच्या कमरेचा भाग, मागील मांड्या शेपटी यावरून खरारा करावा व
कास आणि सड खरबरीत स्वच्छ फडक्याने / टॉवेलने पुसून स्वच्छ करावे. यामुळे रक्ताभिसरण
वाढून जनावर तरतरीत होते.

३) जनावराला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशियम परमँगनेटचे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने त्याची कास व सड धुवावे व लगेच स्वच्छ फडक्याने / टॉवेलने पुसून घ्यावी.

४) दूध काढावयाची स्वच्छ व निर्जंतुक केलेली भांडी, एक छोटा कप व दूध गाळण्याचे स्वच्छ मलमल पांढरे कापड दुध काढण्याच्या जागेवर आणून ठेवावे.

५) कोमट पाण्याने कास धुतल्यानंतर गाय / म्हैस पान्हा सोडण्यास सुरवात करते. त्यामुळे कोमट पाण्याचे वापर जरूर करावा.

६) दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपले हात पोटॅशिअम परमँगनेटच्या द्रावणात धुवून स्वच्छ करावेत अन् दूध काढण्यास प्रारंभ करावा.

७) सर्वात आधी प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा वेगवेगळ्या स्वतंत्र कपात काढाव्यात व स्तनदाह चाचणी करण्यात यावी.

८) संपूर्ण मुठ पद्धतीने दूध काढण्याची क्रिया, सुमारे ७ ते ८ मिनिटात पूर्ण करणे फायदेशीर ठरते.

९) दूध काढण्यासाठी विशिष्ट आकार (डोम शेप) असणारी भांडी यांचा वापर करावा.

१०) दूध काढून झाल्याबरोबर दुधाचे भांडे वेगळ्या खोलीत घेऊन जावे.

११) दूध काढत असताना म्हशीला शक्यतो वाळलेली वैरण, घास इ. प्रकाराचे खाद्य घालू नये. फक्त आंबवण द्यावे.

१२) दुध स्वच्छ व कोरड्या (शक्यतो स्टीलच्या) भांड्यात मलमलच्या पांढऱ्या कापडातून गाळून घ्यावे.

१३)शक्य असेल तर काढलेले दुधाचे भांडे बर्फाच्या पाण्यात लगेच बुडवून ठेवावे. हे शक्य नसेल तरीही आपल्याच घरातील माठातील / रांजणातील गार पाणी वापरावे. थोड्या थोड्या वेळाने हे पाणी बदलणे आवश्यक असते.

१४) गाळून थंड पाण्यात साठविलेल्या दुधाचा लवकरात लवकर वापर किंवा विक्री करावी. अशा पद्धतीने दूध उत्पादन केल्यास दुधाची प्रत व साठवणक्षमता वाढण्यास निश्चित मदत होते.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment