विद्यार्थी मित्रांनो, आपण जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छित असाल तर आपल्याला 31 ऑगस्ट पूर्वी https://hmas.mahait.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना आपली काही चूक होऊ नये, तसेच अर्ज अगदी भरणे सुलभ व्हावे, या उद्देशाने आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट
सर्वात आधी https://hmas.mahait.org या वेबसाईट वर जाऊन आपल्यासमोर वेबसाईटच्या उजव्या बाजूला असलेल्या मेनू मध्ये नवीन नोंदणी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे. नवीन नोंदणी चे पेज उघडल्यानंतर आपल्याला विचारलेली संपूर्ण माहिती अगदी अचूकपणे भरायची आहे.
अर्ज करण्यासाठी 16 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
सामाजिक न्याय विभागांतर्गत नागपूर जिल्ह्यात शहरातील मागावर्गीय मुलां/मुलींची एकुण १४ वसतिगृहे तसेच तालुका स्तरावरील मागासवर्गीय मुलां/मुलींचे एकुण ११ शासकीय वसतिगृह उमरेड, कुही (मुलांचे), कुही (मुलींचे), वानाडोंगरी (मुलांचे), वानाडोंगरी (मुलींचे), नांदा ता. कामठी (मुलांचे), पारशिवनी (मुलांचे), काटोल (मुर्लीचे), रामटेक (मुलींचे), कळमेश्वर (मुलींचे), सावनेर (मुलींचे) अशा एकुण २५ शासकीय वसतिगृहांसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरीता शालेय अभ्यासक्रमाच्या वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज भरण्यासाठी दि. 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
यात आपल्याला आपले संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आपल्याला हवा असलेला युजर आयडी तसेच पासवर्ड टाकावा. पासवर्ड आणि युजर आयडी लक्षात ठेवावा किंवा लिहून घ्यावा कारण तो पुढे लॉग इन करताना आपल्याला लागणार आहे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर register या पर्यायावर क्लिक केलं की तुमची registration (नोंदणी) प्रक्रिया पूर्ण होईल.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. लॉग इन करण्यासाठी आपण रजिस्टर करताना दिलेला टाकलेला युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. एकदा का तुम्ही यशस्वीरीत्या लॉग इन झालात की मग तुमच्यासमोर योजनेसाठी अर्ज करा अशाप्रकारचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करावे लागेल. यात तुम्हाला अनेक योजना दिसतील पण आपल्याला समाजकल्याण विभाग वसतिगृह प्रवेश या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
विद्यार्थ्याची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती
नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश योजना हा पर्याय निवडावा लागेल. नंतर आपल्यासमोर ऑनलाईन अर्ज येईल. आपल्याला त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अगदी अचूक टाकायची आहे. त्या माहितीमध्ये आपले संपूर्ण नाव, त्यानंतर तात्पुरता पत्ता म्हणजे आपण जिथे सध्या शिकत आहोत तो पत्ता टाकावा. हा पत्ता म्हणजे आपण भाड्याने खोली घेऊन राहत असाल किंवा एखाद्या नातेवाईकाकडे राहत असाल तो पत्त्ता आहे. सदर तात्पुरता पत्ता टाकल्यानंतर आपल्याला त्याखाली कायमचा पत्ता हा पर्याय दिसेल. त्यात आपल्याला आपला कायमचा पत्ता सविस्तर टाकावा लागेल. त्यानंतर जन्मस्थळ, जन्म झाल्याच्या तालुका आणि जिल्हा टाकावा लागेल. नंतर आपली जन्म तारीख टाकावी लागणार आहे. नंतर अर्जात विचारल्या प्रमाणे वैवाहिक स्थिती, जात निवडायची आहे. तुम्ही आधीच्या वर्षी वसतिगृहात होतात का याबद्दल माहिती द्यायची आहे. नसल्यास नाही पर्यायावर क्लिक करायचे आहे.
विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पालकांची माहिती भरावी लागणार आहे. वडिलांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि वार्षिक उत्पन्न यांची माहिती द्यायची आहे. नंतर स्थानिक पालकांचे नाव असा पर्याय असेल. हा पर्याय वैकल्पिक आहे. तुम्ही जर एखाद्या नातेवाईक कडे राहत असाल तर त्यांचा पत्ता देऊ शकता किंवा या जागी काहीच लिहायची गरज नाही.
त्यानंतर आपल्याला आपल्या मागील वर्षाची शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. त्यात मागील वर्षी प्राप्त जेकेले गुण आणि टक्केवारी, आपले मागील वर्षीचे महाविद्यालय अन् आपली शाखा म्हणजेच कला, वाणिज्य, विज्ञान यापैकी जी आपली शाखा होती ती टाकायची आहे. नंतर आपण ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे.
नंतर विद्यार्थ्याचा चालू शैक्षणिक वर्षाच्या शिक्षणाचा तपशील लिहावा लागेल. सध्या आपण कोणत्या महाविद्यालयात शिकत आहोत त्याचे नाव लिहून आपण कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे त्याची संपूर्ण माहिती तसेच त्या महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे.
अर्जासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे
नंतर आपल्याला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत.
सर्व कागदपत्रे आपल्याला jpeg, png किंवा pdf स्वरूपात अपलोड करायची आहेत. आपण मोबाइल मध्ये कागदपत्रांचा फोटो काढतो ते फोटो jpeg स्वरूपातीलच असतात. त्यामुळे अर्ज भरणे सुरू करायच्या आधी आपण सर कागदपत्रांचे स्पष्टपणे दिसतील असे फोटो काढून घ्यावे.
आपल्याला खालील कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजेच सध्या शिकत असल्याचा दाखला, मागील वर्षीच्या बोनाफाईड सर्टिफिकेट , विद्यार्थ्याचा फोटो, मागील वर्षाचे गुणपत्रक तसेच चालू वर्षाचे गुणपत्रक, सध्या ज्या महाविद्यालयात ज्या शिक्षणक्रम साठी प्रवेश घेतला आहे त्याची पावती, राशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे अचूकपणे अपलोड करायची आहेत.
राष्ट्रीयकृत बँकेचा सविस्तर तपशील
सर्व कागदपत्रे यशस्वीरीत्या अपलोड करून झाल्यानंतर जतन करा आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर पुढील पेज ओपन होईल. त्या पेज वर आपल्याला आपल्या बँकेची संपूर्ण माहिती टाकावी लागेल. त्यात बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, आपला अकाउंट नंबर तसेच बँकेचा IFSC code व्यवस्थित टाकावा लागेल. यात चूक होऊ देऊ नका. बँकेचा तपशील देत असताना आपली बँक राष्ट्रीयकृत असणे गरजेचे आहे. बँकेचा संपूर्ण तपशील भरून झाल्यावर आपला दुसरा एखादा मोबाइल नंबर टाकावा लागेल. शेवटी सादर करा हा पर्याय निवडावा लागेल. एवढं केलं की झाल. आपला अर्ज यशस्वीरीत्या भरून झालेला आहे. आता या अर्जाची एक प्रत डाऊनलोड करून घ्या.
👉 हे सुध्दा वाचा
अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण/डाऊनलोड करा.
नंतर त्या अर्जाची एक प्रिंट काढून ती आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाकडे जमा करायची आहे. नंतर आपल्याला वसतिगृह प्रवेश मिळेपर्यंत आपल्या अर्जाची सध्याची स्थिती चेक करत राहायचे आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लिस्ट लागणार आहे त्यात आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळाला की नाही हे कळेल.
आपल्याला वसतिगृह प्रवेश नक्की मिळेल या शुभेच्छांसह आपल्याला दिलेली माहिती कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात मिळणाऱ्या सोईसुविधा
शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.बीसीएच-2010/प्र.क्र.430/मावक-4,दि.26 जुलै,2011 नुसार खालील प्रमाणे सोयी-सुविधा देण्यात येतात.
शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना भोजनात गहू/बाजरी/ज्वारी/तांदूळ(भात)/दाळ/भाजीपाला/कंदभाजी इत्यादी वस्तूंचा पुरवठा अमर्यादित (पोटभर) करणे. नाश्त्यासाठी विद्यार्थ्यांना उसळ/पोहे/उपमा/शिरा यापैकी एक, दुध (साखरेसह), उकडलेली 2 अंडी दररोज व शाकाहारी मुलांसाठी कॉर्नप्लेक्स (सिरीयल), प्रत्येकी दिवशी एक सफरचंद व ऋतुमानाप्रमाणे मिळणारे एक फळ (शासकीय वसतीगृहासाठी)मटन/चिकन दर आठवडयाला 500 ग्रॅम प्रतिविद्यार्थी याप्रमाणे आठवडयातून दोनदा, दरवेळी प्रतिविद्यार्थी 250 ग्रॅम प्रमाणे भात/पुलाव सलाड सह. (शासकीय वसतीगृहासाठी)
शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वेळी 2 भाजी, वरण व दही, भात व एक गोड पदार्थ (स्वीट) आठवडयातून 2 वेळादररोज प्रत्येक जेवणात आवश्यक तेवढे कांदा, लिंबू, लोणचे, पापड, सलाड व 50 ग्रॅम गावरान तुन (दर आठवडयात) निर्वाह भत्ता- विभागीयस्तर दरमहा रु.800/- प्रत्येकी, जिल्हास्तर दरमहा रु.600/- प्रत्येकी, तालुकास्तर दरमहा रु.500/- प्रत्येकी (मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठी अतिरिक्त रु.100/- दरमहा शालेय गणवेश रु.500/- प्रमाणे प्रत्येकी 2 जोड दरवर्षी महाविद्यालयीन स्तर जेथे ड्रेस काड असेल तेथे प्रति विद्यार्थी रु.1000/- प्रमाणे 2 जोड वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ॲप्रनसाठी रु.500/- प्रती विद्यार्थी दरवर्षी
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर लगेचच वैद्यकीय साहित्यासाठी रु.1000/- प्रति विद्यार्थी देण्यात यावेत. वैद्यकीय शाखेसाठी स्टेथोस्कोपसाठी रु.1000/- व इतर साहित्यासाठी रु.1000/- असे एकूण रु.2000/- प्रति विद्यार्थी दरवर्षी आभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी बॉयलर सुटसाठी प्रतिवर्षी प्रतिविद्यार्थी रु.500/- )आभियांत्रिकी पदवी/पदविकाच्या ड्रॉईंग बोर्ड व इतर साहित्यासाठी प्रति विद्यार्थी रु.2500/- दरवर्षी लॅब ॲप्रनसाठी रु.500/- प्रतिविद्यार्थी दरवर्षी शारिरीक शिक्षण महाविद्यालय 2 गणवेशासाठी रु.4000/- प्रति विद्यार्थी दरवर्षी छत्री/रेनकोट व गमबूट दरवर्षी दरवर्षी रु.500/- प्रमाणे प्रति विद्यार्थी देण्यात येतात.
कला शाखेतील चित्रकला, संगीत व इतर पदवी/पदविका तसेच विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले साहित्यासाठी रु.4000/- दरवर्षी प्रति विद्यार्थी पुरविण्यात येतात.शैक्षणिक सहलीसाठी प्रत्येकी रु.2000/- दरवर्षी प्रति विद्यार्थी शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी कार्यशाळेकरिता रु.500/- प्रति विद्यार्थी प्रती वर्ष प्रोजेक्ट रिपोर्टसाठी प्रति विद्यार्थी रु.1000/- प्रती प्रकल्प स्नेहसंम्मेलन / करमणुक व्यवस्थेसाठी प्रति शासकीय वसतिगृह रु.25000/- दरवर्षी (साऊंड सिस्टीम साहित्य व इतर खर्चासाठी)क्रीडा वस्तु खरेदीसाठी प्रति शासकीय वसतीगृह रु.10000/- दरवर्षी प्रत्येक शासकीय वसतीगृहासाठी एक कलर टी.व्ही. (40 ते 50 इंची स्क्रीनचा) तसेच वैज्ञानिक अथवा संशाधनात्मक चॅनल करिता डिश ॲन्टीना व पेड चॅनल करिता रु.10000/- प्रति वर्ष प्रति वसतीगृह खर्च करते.
प्रत्येक शासकीय वसतीगृहासाठी ॲक्वॉगार्ड व वॉटर कुलरप्रत्येक शासकीय वसतीगृहात फायर फायटींग सुविधा शासकीय वसतीगृहामध्ये 10 विद्यार्थ्यांसाठी एक संगणक,इंटरनेट सुविधेसह उपलब्ध करुन देण्यात येतात. तसेच एका वसतीगृहासाठी एक प्रिंटरसर्व शासकीय वसतीगृहामध्ये अद्ययावत ग्रंथालय, त्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच ग्रंथालयामध्ये एल.सी.डी., संगणक इंटरनेटसह, आवश्यक सर्व प्रकारचे फर्नीचर व ई-लायब्ररीच्या सर्व सुविधा तसेच 5 वर्तमान पत्रे (इंग्रजी व मराठी) आणि 10 शिक्षण उपयोगी मासिके त्यामध्ये प्रामुख्याने सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, चालू घडामोडी बाबत अंक इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतो.वर्षातून दोन वेळा पालक सभा आयोजित केल्या जाते. (रु.10000/- प्रति सभा खर्च) शासकीय वसतिगृहातील सर्व मुला/मुलींना 10 दिवसांच्या विपश्यना प्रशिक्षणाकरिता योग्य वेळेनुसार सोईच्या ठिकाणी पाठविण्यात येते संपूर्ण खर्च वसतिगृह व्यवस्थापन करते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी (मागासवर्गीय मुलां-मुलींसाठी) शासकीय वसतिगृह या योजनेचे ध्येय आणि उद्दिष्टे काय आहेत?
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे,यासाठी शासकीय वसतिगृहे स्थापन करण्यात आलेली आहेत. ही योजना सन 1922 पासुन कार्यान्वित आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी अटी व शर्ती काय आहेत?
गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु.2,00,000/- पेक्षा जास्त नसावे.
इयत्ता 8 वी व त्यापुढे माहाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 30 जून पर्यत किंवा निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आत.
सन 2014-15 पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहाच्या जागेपैकी 10 % प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणुन अटी व शर्तीस अनुसरूण गुणवत्तेनुसार भरण्यात येतात आणि 5 % खासबाब म्हणुन अनाथ तसेच मांग,भंगी,मेहतर या जातीतील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.
प्रवेशासाठी अर्जाची प्रत कोठे जमा करावी आणि संपर्क कोठे करावा?
संबंधित गृहप्रमुख/गृहपाल,मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह.
संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेले नियम
१. एकदा वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर वसतिगृह प्रमुखांच्या पूर्व संमतीशिवाय विद्यार्थ्याला अनुपस्थित राहता येणार नाही.२. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या/तिच्या कॉलेजमध्ये नियमितपणे हजेरी लावली पाहिजे आणि सुटीशिवाय कॉलेज किंवा वसतिगृहात गैरहजर राहू नये. गैरहजर राहिल्यास कार्यवाही करण्यात येईल.३. वसतिगृह प्रमुखांच्या पूर्व संमतीशिवाय शाळा कॉलेजच्या वेळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे बाहेर जाऊ दिल्या जाणार नाही.४. विद्यार्थ्यांनी वसतिगृहात मोफत (फ्री) देण्यात आलेले साहित्य काळजीपूर्वक वापरावे लागेल. व शैक्षणिक वर्षाअखेरीस सुस्थितीत परत करावे. हरविलेल्या किंवा निकामी केलेल्या वस्तूंची योग्य ती किंमत भरून देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यावर असेल. एखाद्या विद्यार्थ्याने साहित्य व्यवस्थित परत न केल्यास विद्यार्थ्यांस पुढील शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ही बाब शिक्षण संस्थांच्या निदर्शनास आणून दिली जाईल.५. विद्यार्थ्यांजवळ वसतिगृहातर्फे दिलेल्या आणि त्याच्या स्वतःच्या मौल्यवान वस्तु सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे त्या त्या विद्यार्थ्याची राहील.
६. शैक्षणिक वर्षातील सर्व परीक्षा देणे विद्यार्थ्याना बंधनकारक असेल.७. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील प्रगती गुणवत्तापूर्ण असली पाहिजे, शैक्षणिक वर्षा अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेश रद्द करण्यात येईल .८. प्रामुख्याने वसतिगृहातील खोल्या नीटनेटक्या आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. वसतिगृह प्रमुखांच्या परवानगीशिवाय खोल्या आणि खोल्यातील मांडणी विद्यार्थ्यांनी बदलू नये.९. विद्यार्थ्याने आपली वर्तणूक वसतिगृहात सौजन्यशील ठेवावी लागेल. चळवळ, संप, अन्नसत्याग्रह, राजकीय कार्य, गटात घोषणाबाजी करणे अथवा तत्सम प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. तसेच वसतिगृह प्रतिष्ठेला बाधक होईल असे कोणतेही गैरवर्तन करण्यात येऊ नये.१०. वसतिगृह व्यवस्थेत काही अडचण असल्यास वसतिगृह प्रमुखांच्या मदतीनेच तीचे निराकरण केल्या गेले पाहिजे. गंभीर स्वरुपाचा अन्याय होत आहे, असे वाटले तर वसतिगृह प्रमुखाच्या पूर्व संमतीने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करता येईल
.११. ऐनवेळी उद्भवेल्या स्थानिक परिस्थितीनुसार वसतिगृह प्रमुख वेळोवेळी जे नियम करतील, ते सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक राहतील.१२.जर कुण्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास याची कल्पना वसतिगृह प्रमुखांना तत्काळ इतर विद्यार्थ्यांनी द्यावी आणि औषधोपचार योजना वसतिगृह प्रमुखांनी सांगितलेल्या किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अथवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रथम करून घ्यावी.१३. वसतिगृहाच्या खानावळीत जेवताना, खाद्यपदार्थ घेतांना आरडाओरड, गोंधळ करू नये तसेच मेस कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागणे बोलणे आवश्यक आहे.१४. विद्यार्थांना जे अन्न दिले जाते ते उष्टे टाकून वाया घालवू नये, आवश्यक तेवढेच अन्न ताटात घेऊन ते पूर्ण संपवावे.१५. वसतिगृह प्रमुखांनी ठरवलेल्या वेळेवर जेवण घेण्यासाठी मेसमध्ये जाणे अनिवार्य असेल.
१६. जेवणाबाबत काही तक्रार असेल तर याबाबत कार्यालय प्रमुखाकडे तक्रार करावी, परस्पर स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांशी तंटा करू नये.१७. कोणत्याही नातेवाईक किंवा मित्र किंवा इतर व्यक्तींना वसतिगृहात जाता येणार नाही तसेच रात्रीच्या वेळी तिथे राहू दिले जाणार नाही असे केल्यास प्रवेश तात्काळ कॅन्सल करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीवर जाण्यास प्रवेश निषिद्ध असेल. १८. विद्यार्थ्याने वसतिगृहात नियमित अभ्यास केलाच पाहिजे इतर विद्यार्थ्यांना त्रास होईल असे गैरवर्तन करू नये. वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांशी प्रेम व बंधुत्व बाळगून वागले पाहिजे तसेच कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांशी सौजन्याने अन् शिस्तीने वागावे.१९. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे व्यसन करू नये, तसे केल्याचे आढळल्यास प्रवेश तात्काळ कॅन्सल केला जाईल.२०. विनाकारण वारंवार गैरहजर राहणाऱ्या किंवा एका महिन्यापेक्षा जास्त काळ सतत अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातील.
२१. भ्रष्ट चारित्र्य किंवा गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले विद्यार्थी आढळल्यास प्रवेश अशा विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द होतील.२२. संसर्गजन्य रोग असलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून कारवाईस पात्र होतील आणि आवश्यक वाटल्यास त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल.२३. वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने कोणतेही प्राणघातक शस्त्र स्वतः जवळ ठेवायला नको.२४. वसतिगृहातील खोल्यांच्या भिंती, खिडक्या आणि पायऱ्यांवर कोणतेही पोस्टर लावू नये, चित्रे काढणे किंवा आक्षेपार्ह काहीही लिहिणे अमान्य असेल.२५. वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्याने दिलेले पुरावे भविष्यात असत्य असल्याचे आढळून आल्यास, अधिकाऱ्याने केलेली कोणतीही कारवाई विद्यार्थी/विद्यार्थ्यांना मान्य करावी लागेल तसेच असत्य माहितीच्या आधारे प्रवेश मिळवला असेल तर त्यावर कोणताही आक्षेप न घेता प्रवेश रद्द केला जाईल याची नोंद घ्यावी.
२६. प्रत्येक विद्यार्थी/मुलींनी वसतिगृहाचे ओळखपत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे.२७. वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये परिचय व बंधुभाव वाढाविण्यासाठी वेळोवेळी राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम तसेच इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून एकोप्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.२८. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सण आणि इतर सरकारी प्रायोजित कार्यक्रमांना उपस्थित राहाणे अनिवार्य असेल.२९. वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केलेली असली तरी, विद्यार्थ्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा विद्यार्थ्यांच्या अतिउत्साहामुळे जर कोणतीही अनुचित घटना किंवा दुर्घटना घडल्यास अधिक्षक जबाबदार राहणार नाही.३०. राज्य सरकारने, वसतिगृह प्रमुख यांनी वेळोवेळी तयार केलेल्या नियम अनुसार विद्यार्थ्यांना पाळावे लागतील.
३१. वसतिगृहातील वातावरण भयमुक्त व खेळकर राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे लागेल. कोणत्याही विद्यार्थ्यांकडून इतर विद्यार्थ्यांचे शारिरीक अथवा मानसिक शोषण (रॅगिंग) होत असल्याचे आढळल्यास रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊन त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थीनीच्या वसतिगृहासाठी पुरवणी नियम आणि अटी काय आहेत?
१. प्रत्येक विद्यार्थिनीने सायंकाळी ७-३० चे आत वसतिगृहात परत येणे बंधनकारक असेल. २. कोणत्याही कार्यक्रमास रात्री साडेसात नंतर परवानगी घेतल्या शिवाय जाता येणार नाही. ३. विद्यार्थिनींना घरी जाण्यास सुट्टी देण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून अर्ज घ्यायचा आहे. त्यासोबत वसतिगृहातून जाण्याची तारीख, वेळ, त्याचप्रमाणे येण्याची तारीख व वेळ लिहून घ्यावी लागेल. ४. मुलींना वसतिगृहातील लँडलाईन फोनचा चुकीचं वापर करणे निषिध्द असेल. ५. विद्यार्थिनींना भेटायला येणाऱ्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी लागेल.कोणाला भेटावे आणि कोणाला भेटू नये याबाबत अधीक्षकेस निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार असेल.
६. वसतिगृहात मुलींच्या नातेवाईकांना अगर मैत्रिणीला राहण्यास परवानगी देण्यात येणार नाही. ७. ज्या मुलीची वागणूक नियमाविरुध्द किंवा आक्षेपार्ह आहे अशा मुलीबद्दल सविस्तर अहवाल वसतिगृह प्रमुखाने जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे पाठवावा लागेल तसेच या अहवालाची प्रत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग व आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना द्यावी लागेल.