महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने विशेष सहाय्य योजनांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन ज्ञापन जारी केले आहे. शासन ज्ञापन क्रमांक दिव्यांग-२०२६/प्र.क्र.२९/कार्यासन-६ अन्वये दिनांक १ एप्रिल २०२६ पासून विशेष सहाय्य योजनांतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागांकडून हाताळण्यात येणार आहे.
सन २०२६-२७ साठी दिव्यांग लाभार्थ्यांना निधी
सन २०२६-२७ या वित्तीय वर्षासाठी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत दोन प्रमुख योजनांचा समावेश आहे.
संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजनेसाठी निधी
पहिली योजना संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना (कार्यक्रम २२३५ ई ०२१) आहे. या योजनेसाठी इतर प्रशासकीय खर्च म्हणून ७७००.०० हजार रुपये, तर सहायक अनुदाने (वेतनेतर) म्हणून १४२३५३९०.०० हजार रुपये मंजूर तरतूद करण्यात आली आहे.
यापैकी डीबीटी खात्यात वर्ग करावयाचा निधी अनुक्रमे ६६.००० हजार रुपये आणि १३११५६९.७०० हजार रुपये इतका आहे.
श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी
दुसरी योजना श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना (कार्यक्रम २२३५ ई ०३९) आहे. या योजनेसाठी इतर प्रशासकीय खर्च ७००.००० हजार रुपये आणि सहायक अनुदाने (वेतनेतर) १५०००००.००० हजार रुपये मंजूर तरतूद आहे.
डीबीटी खात्यात वर्ग करावयाचा निधी अनुक्रमे ५६.००० हजार रुपये आणि १०५०००.००० हजार रुपये इतका आहे.
नियंत्रक आणि आहरण व संवितरण अधिकारी निश्चित
शासन ज्ञापनात स्पष्ट करण्यात आले आहे की, आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना “नियंत्रक अधिकारी” तर सहायक संचालक, दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना “आहरण व संवितरण अधिकारी” घोषित करण्यात आले आहे.
डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना निधी मिळणार
वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार हे निधी निर्गत करण्यात येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींकरीता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम व्हीपीडीए खात्यावर वर्ग करून संवितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रदान करावयाच्या प्रयोजनार्थ राज्याच्या एकत्रित निधीमधून रक्कम आहरित करण्यात येणार आहे.
शासनाचे अधिकृत ज्ञापन कुठे पाहता येईल?
हे शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत https://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. शासन ज्ञापनाचा संगणक सांकेतांक २०२६०८२४१८७०७३३५ असा आहे. शासन ज्ञापन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आले आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ अधिक सुलभ होणार
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने व आदेशानुसार अव्वल सचिव साईप्रसाद द. मुकदाडवार यांनी हे शासन ज्ञापन जारी केले आहे.
या निर्णयामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ अधिक सुलभ आणि वेळेवर मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
