आजकाल असंख्य शेतकरी आधुनिकतेची कास धरून अन् नावीन्यपूर्ण शेती करून राज्यात एकापेक्षा एक वरचढ ठरत आहेत. धुळे शहरापासून ३५ किलोमीटरवर अंतरावर असलेल्या बोरीस या साडेपाच हजार लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावात राहणाऱ्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने त्यांच्या तीन एकर शेतात सीताफळ लागवड करून वर्षाला 6 लाखाचा निव्वळ नफा कमावत आहे. या यशस्वी शेतकऱ्याचे नाव आहे विजय बेहरे. चला तर जाणून घेऊयात या यशस्वी प्रयोगशील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशोगाथा.
बेहरे यांनी सीताफळ लागवड यशस्वी होण्यासाठी विशेष असे काय केले याबद्दल सविस्तर माहिती तसेच सीताफळ लागवड करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आपल्याला या शेतकऱ्याच्या प्रेरणादायी यशोगाथेतून मिळेल. तसेच हा शेतकरी करू शकतो तर आपण का नाही अशा प्रकारचा आशावाद अन् आत्मविश्वास सुद्धा तुमच्यापैकी काही मेहनती अन् चिकाटी असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात येईल याची खात्री आहे.
शेतीला प्रमुख व्यवसाय म्हणून पहिली पसंती
तसे पाहायला गेल्यास या गावातील शेतजमीन सामान्यतः हलकी, मध्यम प्रतीची व काळी कसदार या तीनही प्रकारची जमीन आढळते. विजय बेहरे यांची त्यांच्या गावातच एकूण सहा एकर शेतजमीन आहे. विजय बेहरे यांनी पारंपरिक शेतीत वारंवार होणारे नुकसान बघून काहीतरी वेगळे करण्याचा आशावाद अंगी आत्मसात केला कारण त्यांना आता पक्के वाटायला लागले होते की वर्षानुवर्षे कमी होणारे पावसाचे प्रमाण, हवामानाची अस्थिरता यामुळे पारंपरिक शेतीत आता काहीच पडलेले नाही.
त्यांनी माती परीक्षण, पाण्याची उपलब्धता तसेच पीक बदलाचा सखोल अभ्यास करून कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणारे नगदी पीक कोणते घेता येऊ शकते याचे ज्ञान मिळवायला सुरुवात केली. आणि सर्व आवश्यक ज्ञान मिळविल्यानंतर त्यांनी सुमारे नऊ वर्षांपूर्वी त्यांच्या शेतात सीताफळ लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पदवी संपादन केलेला हा उच्च शिक्षित शेतकरी त्यांच्या कुटुंबियांच्या आग्रहास्तव नोकरी करण्याची इच्छा मनात घेऊन आपल्या यशस्वी भवितव्याची स्वप्ने पाहत होता.मात्र त्यांना लहानपणापासूनच शेतीची असलेली प्रचंड आवड त्यांच्या मनाला नोकरीत भवितव्य घडवून स्थायिक व्हायची काही केल्या मानसिक संमती देत नव्हती. परिणामी त्यांच्या वडीलांच्या पाठिंब्याने त्यांनी शेती व्यवसाय अंगिकरण्याचे मनात ठरविले.
सीताफळ लागवड करण्यासाठी मिळवले योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन
या उच्च शिक्षित अन् चौकस बुद्धीने विचार करता येत असल्यामुळे पारंपरिक शेती करण्यापेक्षा नावीन्यपूर्ण शेती करून आर्थिक स्थैर्य कसे साध्य करता येईल याचा ते गांभीर्याने विचार करू लागले. यासाठी इंटरनेटवर माहिती मिळवू लागले अन् परिसरातील अनेक यशस्वी शेतकर्यांच्या भेटी घेऊ लागले. जेव्हा ते यशस्वी शेतकऱ्यांच्या शेतीला भेट द्यायचे तेव्हा त्यांनी शेती करायची आधुनिक पद्धत पाहून पुरते भारावून जायचे अन् त्यामुळेच त्यांना शेती करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अधिकाधिक योग्य असल्याचं जाणवू लागलं. असे म्हणतात की सध्याच्या काळात शेती हा एक व्यवसाय म्हणून भरवशाचा राहिला नाही. मात्र योग्य ज्ञान अन् अचूक व्यवस्थापन यांची सांगड घातली तर सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांपेक्षा आर्थिक दृष्ट्या अधिक संपन्नता प्राप्त करता येऊ शकते हे अभ्यासाअंती आणि इतर यशस्वी शेतकऱ्यांचे यश पाहून त्यांना कळून चुकले.
2014 साली सुरू केली सीताफळ लागवड
पारंपरिक शेतीतील अनिश्चितता आणि परिणामी होणारे नुकसान लक्षात घेऊन त्यांनी 2014 साली त्यांच्या तीन एकर शेतजमिनीत सीताफळ लागवड केली. जमिनीवर 10×10 अंतर ठेवून सीताफळाची (MMK गोल्डन जातीची) सुमारे एक हजार रोपांची लागवड केली. नंतरची दोन वर्षे रोपांची या रोपांची पोटच्या लेकरा प्रमाणे काळजी घेतली. या काळात पिकांच्या योग्य वाढीसाठी औषध फवारणी, खत व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि छाटणीकडे विशेष लक्ष दिल्यानंतर सीताफळाची उत्तम वाढ व्हायला सुरुवात झाली. बघता बघता 2 वर्ष निघून गेली अन् सीताफळ लागवड, अन्य खर्च ते विक्रीसाठी वाहतूक अन् मजूर खर्च हा सगळा खर्च वगळता त्यांना तब्बल सहा लाखांचा निव्वळ नफा मिळाला. त्यांच्या नफ्याचे प्रमाण वर्षागणिक वाढतच आहे.
त्यांचा शेती करण्याचा निर्णय ठरला सार्थक
आज रोजी बेहरे यांचा सीताफळ लागवड करण्याचा हा निर्णय त्यांच्या शेतीसाठी वरदान ठरला आहे. अधिकाधिक उत्पादन आणि दर्जेदार फळ निर्मिती यामुळे बेहरे यांच्या सीताफळ फळाला असलेली प्रचंड मागणी असते आणि बाजारपेठेत योग्य भाव मिळतो. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या या प्रेरणादायी यशोगाथा मधून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारखं आहे. जिद्दीने केलेली कुठलीही गोष्ट कधीच अपयशी ठरत नाही.
असे केले सीताफळ बागेचे व्यवस्थापन
बेहरे यांनी त्यांच्या तीन एकर शेतात सीताफळ लागवड केल्यानंतर त्याची योग्य निघा राखली. उन्हाळ्यात सुद्धा या रोपांना काळजीपूर्वक पाणी पुरवठा केला. त्यांच्या विहिरीला वर्षभर पाणी असते, त्यामुळे रोपांना योग्य वेळी पाणी देणे शक्य झाले. तसेच त्यांनी या सीताफळ बागेची वेळोवेळी खुरपणी करून बाग तणमुक्त केली. सुरुवातीच्या काळात सीताफळ झाडांची योग्यरीत्या छाटणी केली. सीताफळ पिकावर शक्यतो रोग वा कीड पडत नाही. मात्र पावसाळ्यात काडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. असे झाल्यास फळाची वाढ होताना ही कीड रस शोषून घेते याची इत्यंभूत माहिती असल्यामुळे त्यांनी यासंबधी योग्य ती पावले उचलली घेतली औषध फवारणी केली अन् फळबाग रोगांपासून संरक्षित ठेवली. या सर कारणांमुळे दर वर्षी त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे.
धुळे अन् गुजरात येथे सीताफळाची ठोक विक्री
बेहरे यांनी त्यांच्या मालाला सुरुवातीला धुळे येथील बाजारात विकले. असते कोठे जास्त भाव आहे याची माहिती मिळवून गुजरातला त्यांचे सीताफळ घेऊन जायला सुरुवात केली. सीताफळ या नगदी पीकाला योग्य बाजारभाव मिळत असला तरी हे फळ नाशवंत स्वरूपाचे असल्यामुळे मालाची योग्य काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे असते. एकदा फळ काढणीचा हंगाम सुरू झाला की दर पंधरा दिवसाला 40 ते 50 कॅरेट माल निघतो. एका कॅरेटमध्ये अंदाजे 20 किलो माल ठेवता येऊ शकतो. हा माल पॅकिंग करून ते धुळे आणि गुजरातमध्ये विक्रीसाठी नेत असतात. या बाजारपेठेत रोख व्यवहार होत असल्याने पैसे लगेच त्यांच्या हातात मिळतात.
कुटुंबाचा मिळतो संपूर्ण प्रतिसाद
बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी शेतमजुरांचा तुटवडा भासतो. त्यामुळे शेतीत कुटुंबाचा संपूर्ण सहभाग आवश्यक असतो. बेहरे यांना सुद्धा त्यांच्या या शेतीकामासाठी कुटुंबाची चांगली साथ मिळते त्यामुळे मजुरांची फारशी आवश्यकता पडत नाही. फळाची काढणी करताना मजुरांची गरज अधिक भासते. मात्र या काळात कुटुंबातला प्रत्येक सदस्य स्वतः काढणी करतात.
मशरूम लागवड करून हा शेतकरी कमावत आहे दिवसाला तब्बल 2 लाख रुपये
फळबाग लागवड एक यशस्वी व्यवसाय
आजच्या काळात अनेक शेतकरी फळबाग लागवड करण्याकडे मोर्चा वळविताना दिसत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. सरकार द्वारा भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अंतर्गत फळबाग लागवड साठी 100 टक्के अनुदान प्राप्त होते. तसेच याशिवाय सुद्धा फळबाग लागवड प्रसारासाठी अनेक कल्याणकारी योजना आणि कर्ज केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येतात. त्यामुळे शेती व्यवसायाला फळबागांची जोड अतिशय फायदेशीर ठरत आहे. कारण देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही बारमाही चांगला बाजारभाव मिळतो. आणि या उत्पादित केलेल्या फळांच्या निर्यातीसाठी सरकारकडून चालना मिळते.या सर्व कारणांमुळे सीताफळ लागवड सारख्या विविध फळबागांची शेती यशस्वी ठरत आहे.
सीताफळ लागवड साठी योग्य जमीन
सीताफळ हे खूपच काटक असे मुळे खोलवर न जाणारे फळझाड आहे. उथळ हलक्या मुरमाड डोंगर उताराच्या जमिनीत हे पीक तग धरते. सीताफळ लागवड साठी हलकी ते मध्यम दर्जाची आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी दोन ते तीन टक्के उताराची पण भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी शेतजमीन आवश्यक असते
सीताफळ लागवड साठी पोषक हवामान
महाराष्ट्रातील हवामान सीताफळ लागवडीसाठी पोषक आहे. अत्यंत कोरडया रखरखीत व उष्ण हवामानाच्या प्रदेशापासून मध्यम पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात अशा दोन्ही प्रदेशात सीताफळ पीक घेता येते. उष्ण आणि कोरडया हवामानातील सिताफळ चवीला गोड आणि उत्तम गुणवत्ता असलेली आढळून येतात. कोकणपट्टी सारख्या जास्त दमटपणा असलेल्या भागात सुद्धा हे पीक घेता येते. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये डिसेंबर ते फेब्रूवारी या काळात झाडाची पानगळती सुरु होते. मात्र कडक थंडी व धुके अशाप्रकारचे वातावरण या पिकाला अपाय करू शकते. थंड हवामानामध्ये फळे पक्व होण्यास विलंब होतो.
सिताफळ लागवड पूर्वमशागत
सिताफळ लागवड करण्यासाठी उन्हाळ्यातच चांगली पूर्वमशागत करून घ्यावी. मे महिन्यात 0.6×0.6×0.6 मीटर आकाराचे खडडे जमिनीचा मगदुर पाहून घ्यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर खडडे घ्यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी 400 झाडे बसतात. हेक्टरी खडडे पावसाळयापूर्वी शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, पोयटा मातीसह भरावेत.
सीताफळ लागवड साठी काही सुधारित जाती
सिताफळच्या जातींचे वर्गीकरण ठिकाण, फळाचा आकार, रंग, बियांचे प्रमाण यानुसार केले जाते. सीताफळच्या अस्सल जातींचा अभाव अजूनही आहे, मुख्यत: बियाणे प्रसारामुळे हा अभाव असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचे मत आहे.तरीदेखील भारतातील काही सिताफळाच्या काही प्रगत जाती पुढीलप्रमाणे आहेत.जाणून घेऊया
1) बालानगर: या जातीच्या सीताफळची फळे हलक्या हिरव्या रंगाची असतात. या जातीच्या फळांमध्ये बियांची संख्या अधिक प्रमाणात असते. या जातीच्या एका झाडापासून सुमारे 5 किलो फळे उत्पादन मिळू शकते.
2) अर्का सहान: सीताफळची ही एक संकरित जात आहे, या जातीची फळे इतर फळांच्या तुलनेत गुळगुळीत आणि मधुर चवीची आणि खूप रसाळ असतात. ही सीताफळे संथ गतीने पिकतात. या जातीच्या फळांमध्ये बियांचे प्रमाण अत्यल्प असून फळाचा आकार सुद्धा तुलनेने छोटा असतो. या जातीच्या फळाच्या आतील गर बर्फासारखा पांढरा दिसतो.
सिताफळ लागवड बियाण्याच्या प्रचलित जाती
सिताफळाच्या नामवंत प्रचलित जाती बहूधा संशोधनातून आपल्या राज्यात विकसित झालेल्या नाहीत. आंध्रप्रदेशातील बाळानगर किंवा मॅमॉथ हया जाती उत्पादन व दर्जाचे दृष्टीने फायदेशीर आहेत. याशिवाय वॉशिंग्टन पी-1, बारबाडोस या जातीच्या बियाण्याची लागवड केल्या जाऊ शकते. सिताफळ फळाच्या विविध प्रजाती असून अंदाजे 120 जाती आहेत. भरघोस उत्पादन घेण्यासाठी बाळानगर ही मोठया फळाची चांगल्या गराची (48 टक्के ) जात असून राज्याच्या हवामान आणि जमिनीचा विचार केल्यास उत्पादन चांगले होते. अर्का सहान, अनॉना आणि हायब्रीड 2, धारूर 3, 6 ऑयलॅड जेम्स, पिंक बुलक्स हाई, अर्टिमोया वॉशिंग्टन 10705, वॉशिंग्टन 98787 या जाती आपण सीताफळ लागवड साठी विचारात घेऊ शकता.
पाणी व्यवस्थापन
सिताफळाच्या झाडांस पाण्याची जास्तीची गरज पडत नाही. फळे पिकण्याच्या अवस्थेत असताना एक दोन वेळेस पाणी दिल्यास फळाचा आकार आणि गुणवत्ता वाढीस लागते. सिताफळ निसर्गतःच काटक फळझाड असल्याने या झाडांची पावसाच्या पाण्याशिवाय सुद्धा चांगल्याप्रकारे वाढ होऊ शकते.
सिताफळाच्या पिकाला नियमित पाण्याची गरज नसल्यामुळे फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून सुद्धा भरघोस उत्पादन घेता येऊ शकते. परंतु सीताफळ लागवड केल्यानंतर सुरुवातीची 3 ते 4 वर्ष उन्हाळयात बागेला पाणी दिल्यास झाडांची वाढ उत्तम प्रकारे होते. तसेच फळधारणेनंतर सामान्यतः सप्टेबर ऑक्टोबर महिन्यात पाण्याच्या 1 ते 2 पाळया दिल्यास भरपूर व मोठी फळे मिळून उत्पादन वाढते.
खत व्यवस्थपन
सीताफळाच्या पूर्णपणे विकसित झाडाला दर वर्षाला 30 ते 40 किलो शेणखत, नत्र 250 ग्रॅम, स्फुरद 125 ग्रॅम व पालाश 125 ग्रॅम नत्र प्रत्येक झाडास दोन समान हफ्त्यांमध्ये विभागून दिल्यास लाभदायी ठरेल. शेणखताबरोबर ॲझोस्पीरीलम व पी.एस.बी. या जीवाणू खतांचा वापर करावा.
सीताफळ पिकांत घेता येणारी आंतरपिके
सीताफळ पिकाच्या लागवडीनंतर पहिली दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्ये कांदा, मूग चवळी, सोयाबीन यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके घेता येऊ शकतात.
काही महत्वाच्या बाबी
१) सीताफळाच्या झाडाच्या एकसारख्या वाढीसाठी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पानगळ झाल्यानंतर हलकी छाटणी करावी.
२) पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
३) सिताफळाची फळे लवकर मिळण्याचसाठी तसेच अधिक बाजारभाव मिळण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाडाभोवती बाजरीची पेरणी केल्यास परिणामकारक ठरते.
सीताफळ लागवड करून अधिक उत्पादनासाठी बहराचे योग्य व्यवस्थापन
सीताफळ लागवड केल्यानंतर साधारणपणे जून महिन्यात नैसर्गिक बहार येतो. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडीमुळे झाडांची पानगळ सुरू होते आणि झाडे सुप्तावस्थेत जातात. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा फुले येण्यास सुरूवात होते. या दरम्यान तापमान आणि 80 टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असल्यामुळे फळधारणा उत्तम प्रकारे होऊन भरघोस उत्पादन मिळते.
बहरातील फळे येण्याचा कालावधी
सीताफळ झाडाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात फळे पक्व होण्यास सुरुवात होऊन त्यांची काढणी करता येते. या दिवसांत हवामान उबदार व कोरडे असल्याने ही सीताफळे चवीला स्वादिष्ट असतात. सीताफळ हे कमी पाण्यावर, हलक्या, मुरमाड जमिनीत लागवड केल्या जाऊ शकणारे फळझाड असल्यामुळे प्रचंड नफा मिळवून देण्याची क्षमता सीताफळ फळबागेत असते. मात्र त्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
सीताफळ झाडांची छाटणी कशी करावी?
सीताफळ बागेची पहिली छाटणी ही बहाराचे पाणी सुरू करण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर केली जाते. उन्हाळी बहाराचे पाणी जानेवारी ते मे मध्ये सुरू केल्या जाते. साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर झाडांवर फळे असताना दुसरी छाटणी करण्यात यावी.
सीताफळ या काळात झाडांना 8 ते 10 दिवसांत पालवी येते. त्या बहरातूनच नवीन फुलांची निर्मिती होते. नंतर त्या झाडांची फळधारणा होते अन् फळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत काढणीस योग्य होतात. परिणामी एकाच झाडापासून दोनदा फळे घेणे शक्य होते.
सीताफळ झाडाची फळे सामान्यपणे सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी करणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा आपण या झाडांची विरळणी करतो तेव्हा चांगल्या आकारमानाची देखणी फळे झाडाला ठेवून वेडीवाकडी, कीड व रोगग्रस्त फळांची झाडांपासून तोडून घ्यावीत.
सीताफळ पिकावरील कीड रोग नियंत्रण
सीताफळ लागवड केल्यानंतर पावसाळयात मुसळधार पावसाने सीताफळ बागांमध्ये आर्द्रता टिकून राहत असल्यामुळे रोग व किडींच्या प्रादुर्भावास पोषक वातावरण तयार होते. पूर्णपणे उमललेल्या कळ्या व लहान आकाराच्या फळांवर तपकिरी काळपट डाग आढळून येतात. हे डाग नेमक्या कोणत्या कीड किंवा रोगामुळे पडले आहेत हे जाणून घेऊन त्यानुसार वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असते. खाली काही रोगांची माहिती दिलेली आहे.
थ्रिप्स (फुलकिडी)
या रोगात फुलकिडीचे प्रौढ आणि पिले आकाराने लहान असतात आणि कोवळ्या कळ्या, नुकतीच फळधारणा झालेली कोवळी फळे, पानाच्या पाठीमागील बाजूची मुख्य शिरा येथील पृष्ठभाग खरवडून बाहेर पडणारा द्रव शोषून घेतात. यामुळे नुकसान झालेल्या भागाचा रंग तपकिरी होतो. हळूहळू तो काळपट होतो. झाडाची पाने वेडीवाकडी होतात. याशिवाय मोठ्या आकाराच्या फळांवर देखील खरवडल्यासारखे डाग दिसायला लागतात. फळाच्या वाढीनुसार खरवडल्याचे हे डाग वाढत जातात. प्रादुर्भावग्रस्त भाग कडक होऊन फळांचा आकार ओबढधोबड होतो. या सर्व कारणांमुळे फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही.
मावा कीड/रोग
सीताफळ पिकावर आलेल्या मावा किडीचे प्रौढ आणि पिले नवीन आलेल्या कळ्यांमधून रस शोषून घेऊन ही कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्रवते. त्यावर काळी बुरशी वाढते. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास फळधारणेवर नुकसानकारक प्रभाव टाकण्याचा धोका उद्भवतो.
थ्रिप्स व मावा किडीसाठी उपाययोजना कोणत्या?
वरील दोन्ही रोगांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आंतरप्रवाही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
राज्यातील भौगोलिक परिस्थिती फळबाग लागवडीस अनुकूल
आपल्या राज्यात एकूण लागवडीयोग्य शेतजमिनीपैकी सुमारे 80 टक्के शेतजमीन कोरडवाहू असल्यामुळं शेतीचे उत्पादन अनिश्चित स्वरुपाचे आहे. परिणामी हलक्या व उथळ जमिनीत पारंपारिक पिकांचा नाद सोडून कोरडवाहू फळझाडांची लागवड आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरू शकते. राज्यात डोंगर उताराच्या, हलक्या व मुरमाड पडिक शेतजमिनी अद्यापही मोठ्या प्रमाणात असल्याने मुख्यत्वेकरून अल्प पर्जन्यमान असलेल्या, दुष्काळग्रस्त भागात सीताफळ लागवडीस भरपूर वाव आहे.
राज्यात सीताफळ लागवड कुठे होते?
वरील सर्व कारणांमुळे दुष्काळी भागात सीताफळ शेतकर्यांसाठी तारणहार पीक म्हणून मान्यता आहे. महाराष्ट्रात सीताफळाची लागवड जळगाव, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, परभणी, पुणे या जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात केल्या जाते. पुण्यातील सासवड शिरूर, खंडाळा, फलटण, धारूर, बालाघाट ही गावे सिताफळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशीम, माहूर तर मराठवाड्यातील धारुर व नळदुर्ग सीताफळाच्या उत्पादनासाठी नावाजलेली आहेत.
सीताफळ फळातील पोषक घटक
सीताफळ लागवड का करावी याच उत्तर म्हणजे सिताफळ या फळाला असलेली प्रचंड मागणी. याशिवाय हे फळ आरोग्यास खूप लाभदायक असून यामध्ये अ जीवनसत्त्व, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्व ब 6, क जीवनसत्व तसेच कॅटेचिन, एपिकेटिन्स आणि एपिगॅलोकेटिचिन सारखे घटक असतात.
150 ग्रॅम सीताफळ मध्ये असलेले पोषक घटक पुढीलप्रमाणे
साधारणपणे 150 ग्रॅम सीताफळात 120 कॅलरी असतात. प्रथिनांचे प्रमाण 2.51 ग्रॅम तसेच कर्बोदके 28.34 ग्रॅम, मॅग्नेशियम 27 मिलीग्रॅम, फॉस्फरस 42 मिलीग्रॅम आणि पोटॅशियम 459 मिलीग्रॅम तसेच जस्ताचे प्रमाण 0.26 मिलीग्रॅम, कॅल्शियम – 16 मिलीग्रॅम लोहाचे प्रमाण 0.43 मिलीग्रॅम या प्रमाणत पोषक घटक आढळतात.
सीताफळ सेवनाचे शरीराला होणारे लाभ
सीताफळ खाल्ल्याने अनेक रोगांत लाभदायी परिणाम पाहायला मिळतात. मधुमेह आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना सीताफळ लाभदायक ठरते. याशिवाय उच्च रक्तदाब, हृदय विकार, दमा, वाढलेले वजन नियंत्रण, पचनक्रिया संबंधी आजार आणि बद्धकोष्ठता या विविध आजारांवर सीताफळ सेवन अत्यंत लाभदायक ठरते. सीताफळ या फळात मुबलक प्रमाणात फायबर आणि कॅल्शिअम असते. अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या फळाचे मूळ स्त्रोत वेस्ट इंडीज बेटे आणि दक्षिण अमेरिका या क्षेत्रात आहे.