पन्नास गुंठे शेतात कोथिंबीर पेरून मिळवले साडे आठ लाखाचे उत्पन्न

आजकाल कोथिंबीर या स्वयंपाक घरातील अती महत्वाच्या घटकाचे भाव गगनाला भिडल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र फक्त 50 गुंठे शेतात कोथिंबीर लागवड करून एका शेतकऱ्याने चक्क साडे आठ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळवले आहे. कधी कांदा, कधी लसूण कधी कोथिंबीर मध्यमवर्गीयांना परवडणे शक्य न होऊन त्यांच्या आहारातील या मासालेभाज्यांचा वापर कमी होण्यास वाढत्या किंमत मुळे भाग पडते.

मात्र अशा काळात एक गोष्ट चांगली होते, ती म्हणजे एरवी चांगल्या भावाअभावी बऱ्याच वेळा प्रचंड माल फेकून द्यावा लागून आपले प्रचंड नुकसान सो सावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अशा दिवसांत चांगले उत्पन्न होऊन त्यांची आर्थिक प्रगती होते. अशाच प्रकारे या शेतकऱ्याने कोथिंबीर लागवड करून कशाप्रकारे भरघोस उत्पादन घेतले याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

कोथिंबीर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे प्रचंड नफा

शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा गावाचे रहिवासी असलेल्या बाळासाहेब करपे यांची ही यशोगाथा आहे. प्रगतशील शेतकरी बाळासाहेब करपे यांनी त्यांच्या ५० गुंठे शेतजमिनीत कोथिंबिर लागवड केली होती. त्यातून त्यांना तब्बल साडेआठ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले. सध्याच्या काळात कोथिंबिरीचे दर प्रचंड वाढल्याने कोथिंबीर लागवड करणाऱ्या सर्वच शेतकरी बांधवांना तसेच व्यापाऱ्यांनाही कोथिंबिरीमध्ये चांगला नफा प्राप्त झाल्यामुळे सर्वच शेतकरी आनंदात आहेत. या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी करपे कुटुंबाने त्यांच्या शेतात गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

कुटुंबाचा लागला मोलाचा हातभार

प्रगतशील शेतकरी बाळासाहेब करपे यांनी मिळविलेल्या कोथिंबीर लागवड मधून मिळवलेल्या या भरघोस उत्पन्नात त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांचा मोलाचा हातभार लागला. बाळासाहेब करपे यांना एकूण चार मुले असून त्यांची नावे देविदास, मोहन, किरण व विशाल ही आहेत.त्यांच्या या चारही मुलांनी त्यांना कोथिंबीर शेतीत पूर्वमशागत पासून ते पीक काढणी अन् विक्री पर्यंत प्रत्येक बाबतीत मदत केली आहे. संपूर्ण कुटुंबाच्या प्रयत्नांमुळे आज मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झाले असे करपे साहेबांनी सांगितले.

करपे यांनी अशी केली कोथिंबीर लागवड

बाळासाहेब करपे यांनी शेतीची पूर्वमशागत करून ऑगस्ट महिन्यात ५० गुंठ्यात कोथिंबीर लागवड पूर्ण केली. त्यासाठी २० किलो धण्याची पेरणी केली. शिक्रापूर येथील मोरया ॲग्रोचे त्यांच्या ओळखीत असलेल्या मित्रांच्या मार्गदर्शन अन् मदतीने स्प्रिंकलर पद्धतीने त्यांच्या शेतात अशोका जातीचे कोथिंबीर बियाणे (धने) पेरले. शेतजमिनीची मशागत करताना दोन ट्रेलर कोंबड खत शेतीत टाकले. पेरणी केल्यानंतर ते पीक काढणी या कालावधीत एकूण तीन औषध फवारण्या केल्या. त्यांना या कोथिंबीर लागवड साठी सर्व मिळून एकूण ४० हजार रुपये खर्च आला.

करपे साहेबांनी स्पिंकलर पद्धतीने पिकाला आवश्यक तेवढे पाणी पुरविले. पीक काढणी केल्यानंतर सध्या कोथिंबिरीला प्रचंड मागणी असल्यामुळे त्यांचा संपूर्ण माल व्यापारी वर्गाने लगेच खरेदी केला. करपे कुटुंबाच्या शेतातील कोथिंबिरीला सर्वोच्च भाव मिळाल्याने परिसरातील अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. तसेच त्यांच्या गावात त्यांच्या या भरघोस उत्पन्न प्राप्त केल्याच्या आनंदाने गावात गप्पा रंगत आहेत. इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा आता नावीन्यपूर्ण शेतीची कास धरणे आवश्यक आहे. तुम्हाला जर आर्थिक प्रगती साधायची असेल तर पारंपारिक शेती फायद्याची नाही. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून नावीन्यपूर्ण शेतीकडे आपला मोर्चा वळविणे काळाची गरज आहे.

करपे साहेबांचे त्यांच्या या यशाबद्दल 2 शब्द

बाळासाहेब करपे यांनी कोथिंबीर लागवड मधून मिळविलेल्या या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबाला दिले असले तरी त्यांची नावीन्यपूर्ण शेती करण्याचा कल आणि जोखीम पत्करण्याच धाडस यामुळेच त्यांनी कोथिंबीर लागवड करून साडे आठ लाखाचे भरघोस उत्पन्न घेतले ही बाब वाखणाण्याजोगी आहे. करपे साहेब म्हणतात, “पिकाचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यामुळे महिनाभरातच कोथिंबिरीच्या १५ हजार पेंड्या (जुडी) उत्पादन प्राप्त झाले. हंगामानुसार योग्य व्यवस्थापन करून, कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत उत्पन्न निघणाऱ्या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी निश्चितच करावी. याच काळात जर शेतकऱ्यांच्या शेतमालाला यंदासारखा योग्य बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच लाभ होतो.” अशाप्रकारे बाळासाहेब करपे यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण घालून दिले आहे.

इंजिनीयरने 60 गुंठे शेतात रताळे लागवड करून 3 महिन्यात कमावले 6 लाख रुपये

कोथिंबीर लागवड साठी योग्य शेतजमीन

मित्रांनो, तुम्ही जर कोथिंबीर शेती करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगले उत्पन्न देणारे पीक आहे हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला कोथिंबीर लागवड पद्धती बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जमीन कशी निवडावी याबाबत काही माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोथिंबीर लागवडसाठी शेतजमीन भारी दर्जाची आणि पाण्याचा निचरा होणारी असणे आवश्यक असते. पाणी शेतजमिनीत एका ठिकाणी साचल्यास कोथिंबीर पिवळी पडून नुकसान होऊ शकते. भारी जमीन ही कमी तापते म्हणून उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर मरण्याचे शक्यता सुद्धा जास्त नसते. परिणामी उत्तम दर्जाच्या तसेच पाण्याचा निचरा होणाऱ्या शेतजमिनी कोथिंबीर लागवड साठी उपयुक्त ठरतात.

कोथिंबीर लागवड 2024 संपुर्ण माहिती , पुर्व मशागत, पेरणी प्रक्रिया, सुधारित बियाण्यांच्या जाती, खत व्यवस्थापन, योग्य शेतजमीन संपुर्ण माहिती

मात्र मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची शेतजमिन सुद्धा कोथिंबीर लागवड साठी योग्य असते. परंतु शेतीतील माती पोषणमूल्य भारित असल्यास हलक्या जमिनीतही कोथिंबीर शेती चांगल्या पद्धतीने करता येणे शक्य आहे. त्यामुळे तुमच्या शेतजमिनीचे एकदा माती परीक्षण करून जर योग्य खतांचा काळजीपूर्वक पुरवठा केल्यास शेतजमिनीचा पोत सुधारून हलक्या शेतजमिनीत सुद्धा कोथिंबिर लागवड करून भरघोस उत्पादन घेता येऊ शकते. हलक्या दर्जाच्या शेतजमिनीत उत्तम सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीची भौतिक गुणवत्ता वाढविणे शक्य होते. परिणामी उत्पादनात वाढहोऊन उत्तम गुणवत्ता असलेली कोथिंबिर उत्पादन घेता येते.

कोथींबीर लागवड साठी योग्य हवामान

तुम्हाला तुमच्या शेतात कोथिंबिरीची लागवड करायची असल्यास सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही हवामानात हे पीक घेता येते. परंतु एक लक्षात घ्या अतिवृष्टी तसेच तीव्र ऊन कोथिंबीरीची वाढ होण्यास पोषक नसते. तुमच्याकडे पाण्याच्या स्रोत चांगला असेल तर उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही
कोथिंबीर लागवड करून जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. मात्र उन्हाळ्यात तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षा वाढते अन् त्यामुळे कोथिंबिरीची वाढ थोड्या प्रमाणात खुंटते.

कोथिंबीर बियाण्यांच्या सुधारित जाती

1) लाम.सी.एस.2 ; कोथिंबीर बियाण्याची ही जात मध्यम उंचीची, भरपूर फांद्या असलेली असते तसेच ही कोथिंबीर
झुडुपासारखी वाढते.

2) कोकण कस्तुरी ; ही जात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली द्वारे २०१३ साली विकसित केल्या गेलेली आहे. सदर जातीची कोथिंबीर अधिक सुगंधी असून झाडांच्या पानांची संख्या अधिक असते. सदर जात सुद्धा भरघोस उत्पादन देणारी असून हिरव्या पानांसाठी तसेच ५० दिवसापर्यंत रोग आणि किडींपासून सुरक्षित असते. या जातीची लागवड उन्हाळी आणि रबी हंगामासाठी फायदेशीर ठरते.

3) लाम.सी.एस.3 ; ही जात झुडूपवजा वाढ होणारी असल्यामुळे या झाडाला भरपूर फांद्या तसेच पाने येतात. सदर जातीची मुख्य काडी रंगीत
असून ही जात रोग आणि किडींना प्रतिकार करण्याची क्षमता बाळगते.

4) को 1 ; कोथिंबिरीची ही जात तामिळनाडू कृषी विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेली असून कोथिंबीर आणि पन्यासाठी उत्कृष्ट असते. ही जात दीड महिन्यात हेक्टरी १० टन इतके उत्पादन देण्यास समर्थ असते.

5)लाम.सी.एस.4 ; कोथिंबिरीची ही जात सुद्धा झुडूप वजा वाढणारी असते. या जातीच्या झाडाला भरपूर फांद्या आणि
पाने येतात. वरील जाती प्रमाणेच या जातीची मुख्य काडी ही रंगीत
असते. सदर जात ही भुरी रोगास प्रतिकारक असते.

बीज प्रक्रिया आणि योग्य हंगाम

कोथिंबीर लागवड करण्याआधी बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे असते. जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर आठ ते नऊ दिवसानंतर हळूहळू पालवी फुटायला लागते. हळूहळू रोपांची वाढ व्हायला सुरुवात होते. या आठ ते नऊ दिवसांच्या कालावधीत बी जमिनीमध्ये कुजून सडू नये यासाठीच बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. तुम्हाला जर उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करायची आहे तर यासाठी 10 मार्च ते 25 एप्रिल पर्यंत हा कालावधी लागवडीसाठी उत्तम असतो. या मोसमात कोथिंबीरला बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो. कोथिंबीरीचे बी म्हणजे धने हे आपल्याला जास्त खोलात टाकायचे नसतात. दोन ते तीन इंच खोल भागातच पेरायचे असतात. दोन ओळीतला अंतर नऊ इंच इतके असेल याची काळजी घ्या. कोथिंबीर लागवड बैलाच्या साह्याने किंवा छोटा ट्रॅक्टरचा वापर करून करता येऊ शकते.

कोथिंबीर लागवड करण्याची पद्धत

नांगरणी केलेल्या शेतजमिनीत 5 ते 6 गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.त्यानंतर रोटव्हेटर मारून शेणखत तसेच रासायनिक खत जमिनीशी एकजीव करून घ्यावे. कोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरुन चांगले भुसभुशीत करून 3×2 मिटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्‍यावे. वाफे सपाट करुन बी सारखे पडेल या बेताने फेकून पेरणी करावी. बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे. म्हणजे रोपे समप्रमाणात वाढतील.

खत व पाणी व्यवस्थापन

कोथिंबीर लागवड करण्याआधी आधी जमिनीत एकरी ६ ते ८ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे हे आपण सांगीतले. मात्र बी उगवल्यानंतर २० दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र शेतीस देणे गरजेचे असते. तसेच २५ दिवसांनंतर १०० लिटर पाण्यात २५० ग्रॅम युरिया मिसळून आपण दोन फवारण्या करू शकतो ज्या फवारण्यांमुळे कोथिंबीरीची वाढ उत्तम प्रमाणात होते. कोथिंबीर पिकाला नियमित पाणी देणे हे खूप महत्त्वाचे असते बर का. उन्हाळ्यामध्ये लागवड केलेली असल्यास दर ५ दिवसांनी पाणी देणे गरजेचे असते. तसेच हिवाळ्यामध्ये लागवड केलेली असल्यास आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे लागते.

कोथिंबीर पिकाची काढणी आणि उत्पादन

शेतजमिनीत कोथिंबीर लागवड केल्यानंतर ३५ ते ४० दिवसानी कोथिंबिरीच्या रोपांत १५ ते २० सेंटिमीटर वाढ होते त्यावेळी ती काढणी योग्य होते. ही रोपे उपटून किंवा कापून काढणी करता येते. पेरणीच्या २ महिन्यांनंतर कोथिंबीरीला फुले येण्यास प्रारंभ होतो. परिणामी त्याआधीच काढणी करणे आवश्यक असते. पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबीरीचे प्रती एकर अंदाजे ४ ते ६ टन उत्पादन प्राप्त होते. तसेच उन्हाळी हंगामात हेच उत्पादन थोडेफार कमी होते. उन्हाळ्यात हे उत्पादन एकरी २.५ ते ३.५ टन इतके होते.

कोथिंबीर लागवड साठी येणारा एकरी खर्च आणि उत्पादन

कोथिंबीर लागवड करण्यासाठी फार मोठा खर्च लागत नाही. शेतजमिनीच्या मशागतीला प्रती एकर अंदाजे 3 हजार रुपये खर्च येतो. यासाठी लागणारे बियाणे 200 रुपये किलो प्रमाणे एकरी 40 किलो प्रमाणे आठ हजार रुपये लागतात. ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करायची झाल्यास प्रती एकर 2 हजार रुपये खर्च होतात. खतासाठी दीड हजार रुपये प्रती पॅकेट प्रमाणे दोन पॅकेचे अंदाजे तीन हजार रुपये लागतात. दरम्यानच्या काळात दोन वेळा खुरपणी करायचा खर्च चार हजार रुपये पकडावा. कारण एका खुरपणीला सुमारे दोन हजार रुपये पर्यंत खर्च होतो. फवारणीसाठी औषध वगैरेचे तीन हजार रुपये लागतील. अशाप्रकारे सर्व मिळून अंदाजे प्रती एकर वीस हजार रुपये लागतात.

कोथिंबीर उत्पादनात भारत देशात चौथ्या क्रमांकावर

कोथिंबीरच्या बाबतीत नेहमीच पाने अन् बियाण्याची मागणी जास्त असते. कारण भारतीय स्वयंपाक घरातील एक मुख्य घटक म्हणून कोथिंबीर आणि धन्यांची ओळख आहे. आपला देश कोथिंबीर लागवडीमध्ये जगात चौथ्या क्रमांकावर येतो. आपल्या देशात कोथिंबीर उत्पादक आणि ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या सर्वच राज्यांत कोथिंबिरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्या जाते.

कोथिंबीर लागवडीचे फायदे

कोथिंबीर पाने म्हणजेच संभार विकून दररोज 600 ते 1500 रुपये कमावणे शेतकऱ्यांसाठी सहज शक्य आहे. कोथिंबीर पीक अल्प कालावधीत म्हणजेच दीड ते दोन महिन्यांत काढणी योग्य होते. शेतकरी आपले कोथिंबीर तसेच धने बाजारात विकून उत्तम उत्पन्न मिळवू शकतात याला कोणी नाकारू शकत नाही. कोथिंबीर बियाणे म्हणजेच धने 100 -120 दिवसात तयार होतात. सरासरी 7 ते 9 क्विंटल बियाणे शेतात मुबलक सिंचन सुविधा असल्यास आणि 50 ते 80 क्विंटल पाने उत्पादन मिळवून देण्यास काहीच अडचण येत नाही. कोरडवाहू शेतात मात्र एकरी 3 ते 5 क्विंटल उत्पादन मिळू शकते, ज्याचा अंदाजे बाजारभाव आठ ते बारा हजार रुपये इतका असतो.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment