आज कृषी क्षेत्रात सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाने उत्क्रांती घडवून आणली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शेतीतील प्रभावी वापरामुळे आता शेती व्यवसाय फायदेशीर तर ठरणार आहेच, शिवाय शेती करणे आधीपेक्षा कमी कष्टाचे होणार आहे. सरकारच्या वतीने कृषी ड्रोन अनुदान योजना कार्यान्वित करण्यात आली असून या योजने माध्यमातून शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. आजच्या या माहितीपूर्ण लेखातून आपण कृषी ड्रोन अनुदान योजना काय आहे, या योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे, या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तसेच या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेणार आहोत.
काय आहे कृषी ड्रोन अनुदान योजना?
राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणारी कृषी ड्रोन अनुदान योजना ही कल्याणकारी योजना शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कृषी क्षेत्रात करून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ करता यावी यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातील अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या क्षेत्रात पाहिलं पाऊल ठेवण्याची संधी मिळणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान हे नवीन आहे. ज्याचा उपयोग कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. या आधुनिक कृषी ड्रोनच्या वापरामुळे ज्या कामासाठी तासनतास लागत असत अशी कष्टाची कामे आता काही मिनिटांत पूर्ण होणार आहेत. पीक निरीक्षण करण्यापासून ते फवारणी करण्यापर्यंतचे काम ड्रोनच्या वापरामुळे अगदीच कमी वेळेत पूर्ण होत आहे.
![कृषी ड्रोन अनुदान योजना, सरकार देत आहे ड्रोन खरेदीसाठी 5 लाख अनुदान कृषी ड्रोन अनुदान योजना, सरकार देत आहे ड्रोन खरेदीसाठी 5 लाख अनुदान](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2025/01/Screenshot_2025-01-15-16-04-00-48.png)
काय आहे कृषी ड्रोन अनुदान योजना राबविण्याचा उद्देश?
शेतकरी मित्रांनो आपल्या देशातील बहुतांश शेतकरी बांधव बहुधा आर्थिक दृष्ट्या एवढे सक्षम नाहीत की ते कृषी ड्रोनच्या तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रणालिमधील आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त उपकरणे विकत घेऊ शकतील. याच गोष्टीचा विचार करून सरकारने ही कृषी ड्रोन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता ड्रोन खरेदी करण्यासाठी सरकार 5 लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देणार आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यासाठी ड्रोनसारखी यंत्रे सर्वात प्रभावी ठरत आहेत. या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने केंद्र सरकार शेतकऱ्यांना आणि एजन्सींना अनुदान किंवा आर्थिक मदत देऊन ड्रोन खरेदी करण्यास किंवा भाड्याने घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. आणि याच प्रोत्साहनासाठी त्यांना सरकार 5 लाख रुपये अनुदान कृषी ड्रोन विकत घेण्यासाठी उपलब्ध करून देत आहे.
असे आहे अनुदानाचे स्वरूप
कृषी ड्रोन अनुदान योजना आता केंद्र सरकारच्या वतीने देशातील बहुतांश राज्यात राबविण्यात येत असून ड्रोनला प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विज्ञान केंद्र, राज्य कृषी विद्यापीठे आणि इतर सरकारी कृषी संस्था ड्रोन खरेदीवर 100 टक्के किंवा 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देत आहेत. आयसीएआरच्या खेती या मासिकात दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी उत्पादक संघटनेला (एफपीओ) शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोनचे प्रात्यक्षिक (प्रदर्शन) देण्यासाठी 75 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. ड्रोन भाड्याने घेणाऱ्या एजन्सींना आकस्मिक खर्चासाठी प्रति हेक्टर 6 हजार रुपये देण्यात येणार असून या रकमेची कमाल मर्यादा 40 लाख रुपये आहे.
![कृषी ड्रोन अनुदान योजना, सरकार देत आहे ड्रोन खरेदीसाठी 5 लाख अनुदान, संपूर्ण माहिती कृषी ड्रोन अनुदान योजना, सरकार देत आहे ड्रोन खरेदीसाठी 5 लाख अनुदान, संपूर्ण माहिती](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2024/11/20241110_184435-1024x576.jpg)
कृषी ड्रोन अनुदान योजना संबंधी महत्वाची माहिती
आता तुमच्या मनात प्रश्न असेल की कोणत्या शेतकऱ्यांना या कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे? तर जाणून घ्या हे कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत अनुदान शेतकरी सहकारी संस्था, एफपीओ आणि ग्रामीण उद्योजकांना ड्रोन खरेदी करण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील पदवीधर पदवीधारकाला 50 टक्के किंवा 5 लाख रुपयांपर्यंतची मदत या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. लहान, सीमांत, अनुसूचित जाती किंवा जमाती, महिला आणि ईशान्येकडील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर 50 टक्के किंवा 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा 4 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत प्रदान केल्या जाते.
शेतकरी बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आधुनिक शेती करण्याकडे वळले तर शेती क्षेत्र भारताला लवकरात लवकर आर्थिक महासत्ता बनविल्या शिवाय राहणार नाही.जर तुम्ही शेतकरी असाल किंवा कृषी क्षेत्रात पदवीधर असाल तर कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत लाभ घेण्यास पूर्णपणे पात्र ठरता. मोठमोठ्या शेतकरी गटांपासून ते वैयक्तिक सामान्य शेतकऱ्यापर्यंत सर्वांसाठी ही केंद्र सरकारने राबविलेली कृषी ड्रोन अनुदान योजना लाभदायक ठरेल यात शंका नाही.
या योजनेचे नाव आहे नमो दीदी ड्रोन दीदी योजना. केंद्र सरकारने महिलांसाठी कृषी ड्रोन खरेदीची स्वतंत्र नमो ड्रोन दीदी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मध्यामातून फक्त महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना शेतीच्या कामासाठी ड्रोन दिले जातात. या ड्रोनद्वारे बचत गटांच्या महिला द्रव खते आणि कीटकनाशके फवारून पैसे कमवू शकतात. यामध्ये ड्रोन दीदींना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध करून देण्यात येते.
बचत गटातील दुसऱ्या महिलेला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याला विद्युत वस्तू, फिटिंग्ज आणि साधने दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण देऊन ड्रोन सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाते. सरकारच्या या महत्वपूर्ण योजनेमुळे देशात रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होताना दिसून येत आहेत. आता आपण कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्याची काय पात्रता असावी याबद्दल अधिक माहिती घेऊया.
कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत लाभासाठी पात्रता निकष
1) अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
2) अर्जदारकडे शेती असावी
3) अर्जदाराने याआधी कृषी ड्रोन खरेदीसाठी अनुदान घेतलेले नसावे.
4) उद्योजकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्यम आधार लागेल.
5) कृषी पदवीधर व्यक्तींना त्यांची कृषी पदवी अधिकृत शासनमान्य विद्यापीठातून घेतलेली असावी.
कृषी क्षेत्रात ड्रोनचा वाढता वापर आणि रोजगाराच्या संधी
कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत लाभ मिळवून तुम्ही स्वतःचा ड्रोन खरेदी करण्याचं स्वप्न साकार करू शकता. शिवाय ड्रोनच्या वापरात निपुण होऊन या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत त्याचा फायदा घेऊ शकता. आज देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे ड्रोन पायलटची मोठी मागणी आहे. या राज्यांमध्ये, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे आघाडीवर आहेत जिथे ड्रोन पायलटची मागणी जास्त आहे. परिणामी या राज्यातील तरुणांना या क्षेत्रात चांगल्या संधी मिळत आहेत.
![कृषी ड्रोन अनुदान योजना, सरकार देत आहे ड्रोन खरेदीसाठी 5 लाख अनुदान, संपूर्ण माहिती कृषी ड्रोन अनुदान योजना, सरकार देत आहे ड्रोन खरेदीसाठी 5 लाख अनुदान, संपूर्ण माहिती](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2024/11/Screenshot_2024-11-10-18-40-28-10.png)
एका अहवालानुसार वरील दोन्ही राज्यांमधील ड्रोन पायलट तरुण 60 हजार रुपयांपर्यंत दर महिन्याला कमाई करत आहेत. देशात ड्रोनची कमतरता असतानाही या राज्यांमध्ये ड्रोन पायलटची मागणी जास्त आहे. या कारणामुळे सरकार ड्रोन वैमानिकांच्या प्रशिक्षणावर अधिकाधिक खर्च करत असल्याचे पाहायला मिळते. राज्यातील युवकांनी सुद्धा कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत अर्ज करून ड्रोन मिळवायला पाहिजे. सरावाने त्यात पारंगत होऊन ड्रोन चालक रोजगाराच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली पाहिजे.
या योजनेसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी असा करा अर्ज
शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या महा डीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये ड्रोन हा घटक ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर यांना महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अधिक माहितीसाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या महा डी बी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्याची प्रक्रिया जाणून घ्या. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून घ्या. आता तुम्हाला “कृषी यांत्रिकीकरण” या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
लॉग इन करून झाल्यानंतर योजनेच्या अटी शर्ती मान्य करून लॉग इन प्रक्रिया पूर्ण होईल.आता अर्ज करण्यासाठी वेबसाईटच मुख्य डॅशबोर्ड ओपन केलं की उजव्या बाजूला “अर्ज सादर करा” जा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर “पहा” असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे.
त्यात कृषी ड्रोन अनुदान योजना निवडून घ्यायची आहे. आणि योजना निवडून झाली का “अर्ज सादर करा” या पर्यायवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन निवडून, 23.60 रुपयांचा ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करायचा आहे.
एवढे करून झाले तुमचा अर्ज हा पूर्णपणे सबमिट झालेला आहे असे समजावे. आता तुमच्या या कृषी ड्रोन अनुदान योजनाच्या अर्जाला प्रथम प्राधान्य देऊन द्यायचे आहे. म्हणजे सर्वात आधी इतर योजनांच्या तुलनेत या योजनेच्या अनुदानाचा लाभ तुम्हाला देण्याचा विचार संबंधित शासकीय अधिकारी करतील. तुम्ही तुमचा हा ऑनलाईन अर्ज “मी अर्ज केलेल्या बाबी” या मेनुवर जाऊन त्याची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.
कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत लाभासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
अर्जदार शेतकऱ्याच्या बँक खात्याचा तपशील
अर्जदाराचे रेशन कार्ड
अर्जदाराचा रहिवाशी दाखला
अर्जदाराची ईमेल आयडी
अर्जदाराची मोबाईल क्रमांक
अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
ड्रोन खरेदीचे कोटेशन बिल
अर्जदार शेतकऱ्याचे स्वयंघोषणापत्र
कृषी पदवीधर असल्यास आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वसंमतीपत्र