रेशीम शेती करून नाशिक जिल्ह्यातील युवक बनला लखपती

जामदरी हे एक इवलंसं गाव. नाशिक मधील नांदगाव तालुक्यातील वसलेलं. निसर्गरम्य वातावरण. गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती. त्यापैकीच एका तरुण शेतकऱ्याने रेशीम शेती करून प्रत्येक बॅचला खर्च वगळता 55 हजार रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाबद्दल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या होतकरू तरुण शेतकऱ्याचे नाव आहे महेश कैलासराव शेवाळे. चला तर आजच्या लेखातून जाणून घेऊयात महेश भाऊंची यशोगाथा

प्रयत्न करून थकला तरुण, नोकरी काही मिळेना

आजच्या या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी मिळणे हे एक दुष्कर कार्य झाले आहे. खेड्यातील होतकरू हुशार मुलांना जास्त सोई सुविधा उपलब्ध नसतात तसेच घरच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात त्यामुळे अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळत नाही. महेश भाऊ सुद्धा याला अपवाद नाहीत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरी मिळविण्यासाठी खूप प्रयत्न महेश कैलासराव शेवाळे यांनी केले. परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही. मात्र या होतकरू तरुणाने हार मानली नाही तर नोकरीचा नाद सोडून आपला मोर्चा शेतीकडे वळविला. पारंपरिक शेतीला रामराम ठोकत रेशीम शेतीची कास धरली अन् आपल्या शेतात अनेक आधुनिक प्रयोग सुरू केले. त्याचे फळ म्हणून आज रेशीम शेतीतून महेश भाऊ प्रगतीची नवनवीन शिखरे पार करत आहेत असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

रेशीम उत्पादन शेड
silk Cacoon production shed

रेशीम शेतीचे नियोजन असे केले

महेशरावांनी रेशीम शेती करण्याचा निर्धार केला तर थांबणार कसे बर? उठले अन् लागले कामाला. महेशरावांनी यासाठी लागणारे भांडवल उभे केले अन् घरच्या ५ लाखांच्या स्वखर्चातून रेशीम किटकांसाठी ५० बाय ३० फुट टुमदार शेड उभारणी केली. ज्या शेडमध्ये लोखंडी रॅक तयार केले. सोबतच ३१ मार्च २०२१ या दिवशी रेशीम शेतीकरिता २ एकर क्षेत्रावर पट्टा पद्धतीने ४ बाय ८ बाय १.६ अशा अंतरावर तुती लागवड पूर्णत्वास नेली. या तुती लागवडीस प्रवाही पाटपाणी देवून उच्च प्रतीचा गुणवत्तापूर्ण तुती पाला मिळण्यासाठी खत व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष पुरविले. एका एकरात एक बॅग डीएपी, २५ किलो युरिया देऊन अपेक्षित उत्पादन काढले.

रेशीम बॅचचे केले यशस्वी नियोजन

रेशीम शेती साकार करण्यासाठी महेश भाऊंनी १५० बाल्य किटक (चॉकी) विकत घेतले. त्यांचे २० ते २३ दिवस चांगल्या प्रकारे संगोपन करून रेशीम कोष उत्पादन घेतले. या कालावधीत अळीच्या अवस्थेनुसार एक, दोन, तीन वेळेस तुती पाला त्यांना खाण्यास दिला. ज्यात सहा ते सात फीडिंगवर या अळी मोड (शरीर अवस्था) बदलतात ज्यात शेवटच्या चौथ्या मोल्डला चंद्रिका पसरविली ज्यामध्ये ही अळी रेशीम कोष तयार करते. रेशीम कोष तयार झाल्यानंतर मजुरांच्या मदतीने हे रेशीम कोष वेचून जालना येथील रेशीम बाजारात विकले. अशा प्रकारे महेश शेवाळे यांनी आतापर्यंत या रेशीम शेती मधून 7 लाख रुपयांचे भरघोस उत्पादन घेतले आहे. रेशीम बॅच नियोजनाची हीच प्रक्रिया सुरू ठेवून महेश भाऊ वर्षाला रेशीमच्या ८ बॅच घेऊन नफ्यात भर घालत असतात.

प्रती बॅच मागे मिळतो 55 हजार रुपयांचा निव्वळ नफा

महेशरावांना हो रेशीम शेती करण्यासाठी जो खर्च येतो त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे, चॉकी खरेदी (प्रवास खर्चासहीत), निर्जंतुकीकरण, शेवटच्या मोल्डला पाला पुरविण्यासाठी अधिकचे मजूर, कोष वेचणी साठी लागलेले मजूर, रेशीम कोशाची जालना येथे विक्री करण्यासाठी येणारा प्रवास खर्च आदी सर्व खर्च विचारत घेतल्यास त्यांना प्रती बॅच साठी सुमारे १६ ते १८ हजारांचा खर्च येतो. तसेच १५० अंडीपुंज मधून सरासरी १५० ते १७० किलो रेशीम उत्पादन मिळते. त्यांच्या रेशीम कोषला प्रती किलो ४५० ते ६०० रुपये भाव मिळतो. मिळणाऱ्या रक्कमेतून त्यांचा झालेला खर्च वगळता महेशरावांना प्रति बॅच ४५ ते ५५ हजारांचा शुद्ध नफा मिळतो.

रेशीम शेती तुती उत्पादनास हवामान कसे असावे लागते?

आपल्या राज्यातील हवामानाची एकंदर परिस्थिती बघता तुती पाल्याचे बारमाही उत्पादन घेता येणे सहज शक्य आहे हे लक्षात येते. आपल्या रेशीम शेतीतील तुती लागवडीसाठी 750 मिलि मीटर ते 1000 मिलिमीटर पाऊस वर्षभर समप्रमाणात पडत असलेल्या भागात जर लागवड केली तर तुतीला पोषक वातावरण मिळून पाल्याचे उत्पादन वाढू शकते. तुती लागवडीस थंड व उष्ण दोन्हीही प्रकारचे हवामान मानवते. परंतू अतिउष्ण तापमान तुती झाडांच्या वाढीसाठी अपायकारक असते.

रेशीम शेतीत तुती लागवडीसाठी जमीन कशी असावी लागते?

कुठ्ल्याही प्रकारची शेतजमीन जसे, मध्यम, भारी, हलकी इत्यादी प्रकारची जमीन असली तरीही ती तुतीची लागवड करण्यासाठी योग्य असते. परंतु डोंगर उताराची तसेच खारट जमीन, ज्या जमीनीत पानी साचून राहते किंवा पाण्याचा निचरा होत नाही अशी जमीन मात्र तुती लागवडीसाठी पूर्णपणे अयोग्य असते. कारण अशा जमिनीत तुती कलमांची लागवड केली तर कलमे जास्त ओलाव्या मुळे कुजून बाद होण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांना तूतीची लागवड करायची आहे त्यांनी पाण्याचा उत्तम प्रकारे निचरा होणारी जमीन निवडून त्या जमिनीतच तुतीची लागवड करावी. तुतीच्या झाडाची मुळे जमीनीत खोलवर जात असल्याने ज्या जमीनीत तुती लागवड करायची आहे त्या जमिनीचा थर किमान 2 फुट खोल असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या जमीनीत तुती लागवड करता येत असली तरी देखील काळया कसदार मातीत तुती झाडाची वाढ अतिशय झपाटयाने होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

तुती झाडाच्या वाढीसाठी जमीनीतील सामुची (पी.एच.) हा 6.5 ते 7 पर्यंत मात्र योग्य असते. त्यासाठी शेतकरी बांधवांनी तुती लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतातील मातीचे परिक्षण करुन घेणे अनिवार्य आहे. ज्या शेतजमिनीत आम्लाचे प्रमाण जास्त असते म्हणजेच जमीनीचा सामु 5 पेक्षा कमी आहे तर अशा जमिनीत चुनखडीचा उपयोग करुन आधी आम्लता कमी करुन घ्यावी तसेच जमीनीचा सामू (पी.एच.) 7.5 पेक्षा जास्त असेल तर मात्र जीप्समचा वापर करुन अल्कतेचे प्रमाण कमी करावे.

रेशीम शेतीत गांडूळ खताचा वापर कसा करावा?

तुती लागवड केलेल्या जमिनीत गांडुळ खताचा वापर करणे अत्यंत उपयुक्त असते. गांडुळ खतामुळे जमिनीतील पाला-पाचोळा कुजविण्याचे काम गांडुळ करतात तसेच जमिनीत हवा खेळती राहण्यास पोकळी तयार करतात. परिणामी जमिनीच्या आतील सुक्ष्मजंतूंची कार्यप्रणाली वाढविण्यास मदत होते. त्यामुळे तुती झाडांना सुक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होतात अन् तुतीच्या पानामध्ये कर्बोदके आणि प्रोटीन यांच्या प्रमाणात वाढ होते.

गांडुळ खत वापरतांना घ्यावयाची काळजी

  1. गांडूळ खत रासायनिक खतामध्ये मिश्रण करुन टाकल्यास अपायकारक असते. अशाप्रकारचा वापर टाळावा.
  2. गांडुळ खतामध्ये शेणखत, कम्पोस्ट खत मिसळून टाकल्यास त्यांचा उत्तमप्रकारे फायदा दिसून येतो.
  3. गांडुळ खताचा वापर केल्यास रासायनिक खताची मात्रा कमी होण्यास मदत होते.
  4. रासायनिक खताचा वापर करण्याआधी 1 महिन्या अगोदरच गांडुळ खत तुती झाडांना देणे उपयुक्त ठरते.
  5. प्रथम वर्षी नविन तुती लागवडीकरीता डिसेंबर महिन्यात गांडुळ खत वापरण्यात यावे.

10 गुंठे शेतीत उगवलेला दुधी भोपळा देत आहे महिन्याला 70 हजाराचा नफा

पारंपरिक शेतीपेक्षा रेशीम शेती फायद्याची

महेश भाऊ सांगतात, वडीलोपार्जित पद्धतीने केलेली पापांपरिक गहू, कांदा, मका, पिकांसह काही अंशी कपाशी पिकाची असलेली नऊ एकर शेती आता तुती आणि रेशीम शेतीत रूपांतरित झाली आहे. अल्प कष्टाची अन् हमखास उत्पन्नाची रेशीम शेती इतर पिकांच्या तुलनेत अधिक फायद्याची असल्याचे महेश भाऊ त्यांना आलेल्या अनुभवातून ठामपणे सांगतात.

कुटुंबाचे मिळते शेतीकामात मोलाचे सहकार्य

महेशभाऊ यांना त्यांच्या या रेशीम शेती साठी यांच्या परिवारातील सर्व सदस्यांची मदत मिळते. त्यांच्या कुटुंबाने सामूहिक सहकार्यातून हे भरघोस उत्पन्न घेतले असल्याचं ते सांगतात. आजकाल आधुनिक शेतीची कास धरून आपले भविष्य उज्ज्वल करणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांची राज्यात काही कमी नाही. गरज आहे ती फक्त शेतकरी बांधवांनी आपली मानसिकता बदलण्याची अन् नावीन्यपूर्ण शेतीचा अवलंब करण्याची.

👉 हे सुध्दा वाचा

एक एकर शेतात दोडका लागवड करून 3 लाखाचे विक्रमी उत्पादन

रेशीम तुती उत्पादन, रेशीम शेती

रेशीम शेतीचे होणारे इतर फायदे

वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करून चांगल्या तऱ्हेने गॅसची निर्मिती होऊ शकते.

तुतीच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर इंधन म्हणून सुद्धा होतो. याव्यतिरिक्त खत म्हणून सुद्धा हा वाळलेला पाला वापरता येऊ शकतो.

रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या पाळीव प्राण्यांना सुग्रास प्रमाणे खाद्याच्या रुपात वापर होतो. यातून १ ते दीड लिटर दूध उत्पादन वाढण्यास हातभार लागतो.

रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते परिणामी देशाच्या विकासास मदत होते.

संगोपनासाठी वापरलेल्या चोथा करून त्यावर अळींबीची लागवड करता येऊ शकते तसेच चोथ्यापासून गांडूळ खत सुद्धा तयार करता येणे शक्य असते.

विदेशात तुतीच्या पानांचा चहा करतात त्याला मलबेरी टी असे म्हणतात . या आपल्यापैकी बहुतांश लोकांची आवडती वाईन सुद्धा बनवल्या जाते.

प्रत्येक वर्षाला तुतीची तळ छाटणी करावी लागत असते. या छाटणीपासून मिळणाऱ्या तुती कोषाची सुद्धा सरकारद्वारे खरेदी केली जाते. त्यामुळे एकरी रु ३५०० रुपये ते ४५०० रुपये वार्षिक उत्पन्नात वाढ होते.

तुतीच्या पानांमध्ये जीवनसत्त्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दृष्ट्या उपयुक्त ठरतो.

महत्वाची बाब म्हणजे, एका तुतीच्या झाडापासून अंदाजे १५ वर्षापर्यंत अखंड उत्पन्न मिळत राहते.

कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग होऊन करोडो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment