नवीन द्राक्ष वाण का आहे आवश्यक? वाचा शेतकऱ्यांचे मनोगत

नवीन द्राक्ष वाण का आहे आवश्यक? वाचा शेतकऱ्यांचे मनोगत
नवीन द्राक्ष वाण का आहे आवश्यक? वाचा शेतकऱ्यांचे मनोगत

गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादनावर अस्मानी-सुलतानी संकटांचा डोंगर कोसळला आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, रोगराई आणि निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची नवीन द्राक्ष वाण कडे ओढ लागली आहे. हवामानाला तोंड देऊ शकणारा नवीन द्राक्ष वाण हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नवीन द्राक्ष वाणामध्ये पुरेशी क्षमता आहे, असे द्राक्षतज्ज्ञांचे मत आहे.

शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि अडचणी

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नैसर्गिक संकटांचा सामना करताना नवीन द्राक्ष वाण हीच त्यांची ढाल आहे. मग, त्या मिळविण्यासाठी अडथळे का निर्माण करावेत? आजच्या बदलत्या हवामानात पारंपरिक वाणांवर अवलंबून राहून द्राक्षशेती टिकवणे कठीण झाले आहे. जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा टिकवायची असेल, तर रोगप्रतिकारक, उच्च उत्पादनक्षम, कमी खर्चिक आणि निर्यातक्षम अशा नवीन द्राक्ष वाणांची गरज अनिवार्य आहे. शेतकरी समुदायाला असे वाण सहजतेने मिळावेत, यासाठी सध्याच्या किचकट प्रक्रियेत सुधारणा होणे आवश्यक आहे.

नवीन वाण मिळविण्यासाठीच्या अडचणी

नवीन द्राक्ष वाण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक बंधनांमधून जावे लागते. उच्च परवाना शुल्क, मर्यादित रोप उपलब्धता, करारनामा, निरीक्षणे, नियमावली, परदेशी कंपन्यांच्या परवानग्या यामुळे अनेक शेतकरी या पेटंटेड वाणांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. परिणामी, उद्योगाला आवश्यक असलेली प्रगत नवीन द्राक्ष वाण व्यापक प्रमाणात लागवडीखाली येत नाही. शेतकऱ्यांची मागणी आहे की, या अटी शिथिल करून त्यांना परवडणाऱ्या आणि सोप्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून द्याव्यात.

द्राक्षशेतीतील ऐतिहासिक क्रांती

द्राक्षशेतीत १९८० ते २००० दरम्यान मोठी क्रांती झाली. १९८०-८५ च्या काळात गणेश, सोनाका आणि शरद सिडलेस या जातींचे क्षेत्र झपाट्याने वाढले. १९९०- २००० पर्यंत ‘वनरुट’ क्षेत्र घटले आणि ‘डॉग्रीज’वर कलम करून नवीन प्रजातींचे संशोधन वेगाने पुढे गेले. अद्ययावत तंत्रज्ञान, आधुनिक लागवड पद्धती आणि प्रयोगशील वृत्तीच्या जोरावर नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे रूपांतर नंदनवनात झाले. शिकण्यासाठी, संशोधनासाठी आणि प्रगत द्राक्षशेतीचा अनुभव घेण्यासाठी शेतकरी परदेश दौऱ्यांवरही जाऊ लागले.

द्राक्ष पॅकेजिंग व्यवसाय कसा सुरू करावा? संपूर्ण मार्गदर्शन

रुटस्टॉकमुळे झालेली क्रांती

१९९५ नंतर द्राक्षशेतीत लक्षणीय बदल झाले. फायटोफ्थोरा, मिलीबग, नेमॅटोड्स यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी ‘रुटस्टॉक’ हा मोठा पर्याय पुढे आला. यावर कलम करून अनेक सुधारित, उच्च प्रतीचे नवीन द्राक्ष वाण विकसित झाले. त्यामध्ये माणिक चमन, काजू सोनाका, जम्बो, नाना पर्पल, क्रिमसन, ग्राफ्टेड हुंडी, आरा-३५, आरा-३६ या वाणांचा समावेश होता. या जातींचे वैशिष्ट्य म्हणजे ‘जीए’चा कमी-अधिक वापर न करता स्वतः विकसित होणे, रोगप्रतिकारक क्षमता, सातत्यपूर्ण उत्पादन, निर्यातक्षम गुणवत्ता यामुळे या नवीन द्राक्ष वाणांच्या लागवडीखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे.

द्राक्षतज्ज्ञांचे मत

द्राक्ष सल्लागार सुनील गवळी यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षीच्या अवकाळी पावसाच्या संकटानंतर बऱ्याच प्लॉटमध्ये द्राक्ष कमी आले आहेत. अशा परिस्थितीत नवीन द्राक्ष वाण ज्यांचा फूल-फ्रूटनेस चांगला आहे, तसेच माल तयार झाल्यानंतर येणारा पाऊस सहन करण्याची क्षमता काही व्हरायटींमध्ये जास्त आहे. याकडे बागायतदारांचा कल वाढतो आहे. परंतु, या नवीन द्राक्ष वाणाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल मशागत, पाण्याचा निचरा कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. ‘रूटस्टॉक’वर लागवड करताना जमिनीच्या प्रकारानुसार ‘रूटस्टॉक’ व्हरायटी निवडावी.

शेतकऱ्यांचे अनुभव

द्राक्ष उत्पादक अजित वडजे यांचे म्हणणे आहे की, पूर्वी द्राक्षाच्या जेमतेम दोन ते तीन व्हरायटी होत्या. त्याची टिकवण क्षमता होती. रोगास बळी पडत नव्हत्या. परंतु सध्या नवीन द्राक्ष वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. या व्हरायटींचा अनुभव नसल्याने त्या व्हरायटीच्या घडनिर्मितीस व रोग, क्रॅकिंगची मोठी समस्या आहे. या व्हरायटींसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे. तरच शेतकरी लागवड करतील. शेतकरी अंकित वाघ यांनी नमूद केले की, यंदा तीन महिने लवकर पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले. तरीही द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या कष्टाने आणि हिमतीने शेतकरी द्राक्षबागा वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

भविष्यातील संधी आणि आव्हाने

एकूणच नवीन द्राक्ष वाणांची लागवड ही द्राक्ष उद्योगासाठी आगामी दशकातील ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे यात शंका नाही. अटी शिथिल झाल्यास नाशिक जिल्ह्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील द्राक्षशेतीला नवी दिशा मिळेल आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची चमक आणखी वाढेल, यात शंका नाही. या वर्षीच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ‘आरा ३५’, ‘आरा ३६’, ‘ॲलिसन’ यांसारख्या पेटंटेड व्हरायटीमध्ये चांगला फ्रूटफुलनेस दिसून आला. परंतु, पेटंट असलेल्या व्हरायटींसाठी पेटंट रजिस्टर असणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सभासद असणे किंवा काही व्हरायटींसाठी मोठ्या क्षेत्राची अट यामुळे लागवडीसाठी शेतकऱ्यांना बंधन येत आहे. भविष्यात या अडचणी दूर झाल्यास नवीन द्राक्ष वाणांमुळे द्राक्षशेतीचे भवितव्य उज्ज्वल होणे निश्चित आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment